...तर किम यांच्याबरोबची चर्चा मध्येच सोडून देईन - ट्रंप

अमेरिका, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, जपान Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चर्चा फसली तर परिषद सोडून जाण्याचा इशारा डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे.

आण्विक अस्त्रांचं निशस्त्रीकरण करण्यासंदर्भात उत्तर कोरियाशी चर्चा अयशस्वी ठरली तर बैठक सोडून जाईन असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं. ट्रंप आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जाँग उन यांच्यात आण्विक अस्त्रांसंदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे.

आण्विक अस्त्रं नष्टं करण्याबाबत उत्तर कोरियावर सर्वतोपरी दडपण असायला हवं असं ट्रंप आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं.

फ्लोरिडातील ट्रंप यांच्या 'मार-अ-लागो' रिसॉर्ट याठिकाणी अबे यांचं वास्तव्य आहे.

सीआयए डायरेक्टर माइक पॉम्पेओ यांनी उत्तर कोरियात जाऊन किम यांची गुप्त भेट घेतल्याच्या वृत्त्ताला ट्रंप यांनी दुजोरा दिला. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं ट्रंप यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वीपर्यंत ट्रंप किम यांना लिटील रॉकेटमॅन असं म्हणत असत.

2000 सालानंतर पहिल्यांदाच अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात उच्चस्तरीय पातळीवर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जून महिन्यात ट्रंप आणि किम यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीचं ठिकाण अद्याप निश्चित नाही. दरम्यान दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेई इन पुढच्या आठवड्यात किम यांची भेट घेणार आहेत.

आण्विक अस्त्रांचं संपूर्णत: निशस्त्रीकरण करण्यासाठी उत्तर कोरिया राजी असल्याचं मून यांनी सांगितलं. उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात होणारी बैठक तसंच अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यादरम्यान होणारी चर्चा यशस्वी व्हावी यासाठी सर्व पर्याय पडताळले जात आहेत असंही मून यांनी स्पष्ट केलं.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा सीआयए डिरेक्टर माइक पॉम्पेओ, उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

बैठकीत फार काही निष्पन्न होणार नाही असं लक्षात आलं तर जाणार नाही, असं ट्रंप यांनी सूचित केलं. तसंच बैठकीला गेल्यानंतर चर्चा निष्फळ ठरतेय असं लक्षात आलं तर बैठक सोडून जाईन, असा इशाराही ट्रंप यांनी दिला आहे.

जोपर्यंत उत्तर कोरिया संपूर्ण निशस्त्रीकरण अवलंबत नाही, तोपर्यंत आम्ही दबाव आणत राहू असं ट्रंप यांनी स्पष्ट केलं. उत्तर कोरियानं अण्वस्त्रांचा त्याग केला तर त्यांच्यासाठी आणि जगासाठी ही अत्यंत चांगली आणि सकारात्मक गोष्ट असेल असं ट्रंप यांनी सांगितलं.

उत्तर कोरियाच्या आण्विक अस्त्रांच्या नि:शस्त्रीकरणाव्यतिरिक्त अमेरिका आणि जपान यांच्यात मुक्त आणि सर्वसमावेशक चर्चा व्हावी यादृष्टीनं ट्रंप आणि अबे यांच्यात चर्चा झाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)