आईच्या योनीतील स्राव नवजात बाळांना का लावण्यात येत आहे?

व्हजायनल सीडिंग

सिझेरियन पद्धतीनं जन्मलेल्या बाळाच्या शरीराला त्याच्या आईच्या योनीतून निघालेले स्राव लावणं हे आरोग्यदायी असू शकतं का?

'व्हजायनल सीडिंग' ही पद्धत वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत नाही, पण गेल्या काही महिन्यांपासून पाश्चिमात्य देशांत या पद्धतीची लोकप्रियता वाढत आहे.

सिझेरियन पद्धतीनं जन्मलेल्या बाळांची रोग प्रतिकार क्षमता वाढावी म्हणून त्यांच्या आईच्या योनीतील स्राव बाळांच्या संपूर्ण शरीराला आणि तोंडाला लावले जातात, याला व्हजायनल सीडिंग म्हणतात.

जेव्हा बाळ नैसर्गिक पद्धतीनं जन्म घेतं तेव्हा त्याचं शरीर या स्रावांनी माखलेलं असतं. त्यामुळं त्या बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते असं म्हटलं जाते. यामुळं जीवाणूंच्या संसर्गाचा धोका कमी होतो अशी मान्यता आहे.

जन्मानंतरचा काळ बाळासाठी महत्त्वपूर्ण असतो.

जेव्हा बाळ गर्भात असतं त्यावेळी तिथं वातावरण सुरक्षित असतं. त्या ठिकाणी जीवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता धूसर असते. पण जेव्हा बाळ जन्म घेतं तेव्हा त्याच्यात आणि जीवाणूंमध्ये एक प्रकारचं अदृश्य नातं निर्माण होतं.

त्यांच्या दोघातलं हे नातं दीर्घकाळ टिकणारं असतं आणि जसं पहिल्या डेटला गेल्यावर पहिला संपर्क महत्त्वपूर्ण असतो, त्याचप्रमाणे बाळ आणि जीवाणूंचा पहिला संपर्क महत्त्वाचा असतो.

"बाळ जेव्हा जन्म घेतं तेव्हा सर्वांत आधी त्याची रोगप्रतिकारक प्रणाली जीवाणूंना प्रतिसाद देते. त्या बाळाची रोगप्रतिकारक प्रणाली सुरळीतरीत्या चालण्यासाठी हे आवश्यक असतं," असं बर्मिंगहम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक पीटर ब्रॉकलहर्स्ट सांगतात.

सिझेरियन पद्धतीनं जन्मलेल्या बाळात आणि नैसर्गिक पद्धतीनं जन्मलेल्या बाळाच्या सूक्ष्मजीवांशी आलेल्या संपर्कात खूप फरक असतो. शास्त्रीय परिभाषेत त्याला Difference between the microbiomes असं म्हणतात. याचा अर्थ असा की दोन वेगळ्या पद्धतीनं जन्मलेल्या बाळांचे मायक्रोबायोम हे वेगळं असतात. जीवाणू, विषाणू इत्यादी सूक्ष्मजीव ज्या वातावरणात एकत्रितरीत्या वाढतात त्या प्रणालीला मायक्रोबायोम म्हणतात.

जन्मानुसार त्या बाळांच्या मायक्रोबायोमची अवस्था वर्षभर तशीच राहते.

नैसर्गिक पद्धतीनं जन्मलेल्या बाळाचा संपर्क त्याच्या आईच्या योनीतून स्रवलेल्या द्रवांशी होतो त्या स्रावांमध्येच अनेक सूक्ष्मजीव असतात. त्या सूक्ष्मजीवांशी बाळाचा संपर्क येतो.

पण सिझेरियन पद्धतीनं जन्मलेल्या बाळांचा सूक्ष्मजीवांशी संपर्क खूप उशिरा येतो. हे सूक्ष्मजीव त्या बाळाच्या आईच्या शरीरावरील नसतात, असं ब्रॉकलहर्स्ट सांगतात.

सिझेरियन पद्धतीनं जन्मलेल्या बाळांमध्ये दमा आणि अॅलर्जीचं प्रमाण का जास्त असतं यावर ब्रॉकलहर्स्ट सध्या काम करत आहेत. त्यांच्या या संशोधन प्रकल्पाचं नाव 'बेबी बायोम स्टडी' असं आहे.

"मायक्रोबायोम"

  • आपलं शरीर सूक्ष्मजीवांपासूनच बनलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. जर आपण आपल्या शरीरातल्या पेशी मोजल्या तर आपल्या लक्षात येईल की शरीरातील केवळ 43 टक्के पेशी या मानवी असतात.
  • इतर पेशी या जीवाणू, विषाणू आणि एकपेशीय जीवांच्या बनलेल्या असतात.
  • मानवी जिनोम हे 20,000 जीन्सपासून बनलेलं असतं. जिनोम द्वारेच मानवाला अणुवंशीय सूचना मिळतात.
  • पण जर आपण मायक्रोबायोममधले सर्व जीन्स एकत्र केले तर त्यांची संख्या 20 लाख ते 2 कोटी इतकी भरू शकते.
  • याच स्थितीला द्वितीय जिनोम म्हणतात. या जिनोमच्या सेटवरूनच ठरतं की आपल्याला अॅलर्जी, दमा, स्थूलता, पार्किनसन, पोटाचे विकार, नैराश्य किंवा ऑटिजम इत्यादी रोग होतील की नाही.

त्यामुळेच रोगप्रतिकारक प्रणाली आणि सूक्ष्मजीवांमध्ये संपर्क निर्माण होणं महत्त्वपूर्ण ठरतं.

आपलं शरीर रोगाचा प्रतिकार करू शकतं. अर्थात, आपलं शरीर धोकादायक हल्ल्याला परतावून लावू शकतं. पण सूक्ष्मजीव आणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशींचं नातं हे संघर्षमय असतं.

याही पुढं जाऊन युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे मेडिकल मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक ग्राहम रूक म्हणतात, "मायक्रोबायोम हा आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीचा शिक्षक असतो."

"या दोघांतलं नातं हे अनोखं असतं. असं समजा की ही शिक्षण प्रणाली आहे. आपल्या मेंदूसारखी. जितकी तुमच्याकडं माहिती अधिक आणि अनुभव अधिक तितका मेंदू चांगल्या प्रकारे काम करू शकतो. अगदी तसंच काम इथं देखील होतं. जसं मेंदूला डेटा हवा असतो तसाच रोगप्रतिकारक प्रणालीला देखील डेटा हवा असतो," असं रूक सांगतात.

हा डेटा कुठून येतो हे तुम्हाला ठाऊक आहे का?

शरीरातले सूक्ष्मजीव जी रसायनं तयार करतात त्यातून हा डेटा तयार होतो. हे सूक्ष्मजीव शरीरातल्या रासायनिक प्रक्रियांना चालना देतात. काही रासायनिक प्रक्रिया तर जन्मभर चालतील इतक्या दीर्घ स्वरूपाच्या असतात.

आपली रोगप्रतिकारक प्रणाली कशी चालेल हे आपल्या जन्मानंतरच्या पहिल्या काही आठवड्यांवर अवलंबून असतं असं रूक सांगतात.

जेव्हा बाळांना पहिल्यांदा प्रतिजैविकं (अॅंटीबायोटिक्स) दिली जातात तेव्हा त्यांच्या नैसर्गिक मायक्रोबायोमला एक धक्का पोहोचतो. जेव्हा ही बालकं किशोरवयात येतात तेव्हा त्यांना रोगप्रतिकारक प्रणालीशी निगडित अडचणींचा सामना करावा लागू शकतो, तसेच या मुलांना लठ्ठपणाचा धोका असतो, असं रूक सांगतात.

याच कारणामुळं अनेकजण व्हजायनल सीडिंग करत आहेत.

कुत्र्यांसोबत खेळल्यानं रोगप्रतिकारक क्षमता वाढू शकते का?

जेव्हा तुम्ही बाळाला घरी घेऊन येता तेव्हा घरी असलेल्या वातावरणाचा देखील त्याच्यावर परिणाम होतो. ज्या घरी कुत्री असतात त्या घरातील मुलांना दम्याचा त्रास कमी होतो असं संशोधक सांगतात.

"कुत्र्यांच्या पावलांना लागणारी माती आणि कुत्र्यांना प्रत्येक ठिकाणी जी खुपसायची सवय असते त्यामुळं बाळांच्या रोगप्रतिकारक प्रणालीला संघर्ष करण्याची सवय लागते आणि ती क्षमता सुधारते," असं अल्बेर्टा युनिव्हर्सिटीच्या अनिता कोझिरस्की सांगतात.

सध्या अनिता कोझिरस्की एक संशोधन करत आहेत. अंदाजे 3,500 कुटुंबांच्या डेटाचं त्या विश्लेषण करत आहेत. त्यांच्या या प्रकल्पाचं नाव 'कॅनेडियन हेल्दी इंफंट लाँजिट्यूडनल डेव्हलपमेंट,' असं आहे.

जर घरात पाळीव कुत्रं असेल तर त्या घरातील साडे-तीन महिन्याच्या बाळाचं मायक्रोबायोम हे अधिक वैविध्यपूर्ण असतं असं निरीक्षण त्यांनी मांडलं आहे.

घरात कुत्रं असेल तर दोन प्रकारचे उपयोगी जीवाणू मोठ्या प्रमाणात आढळतात असं त्या सांगतात.

वजन संतुलित ठेवणारा ऑसिल्लोस्पायरा आणि दम्यापासून वाचवणारा रुमिनोकोक्कस हे दोन जीवाणू पाळीव कुत्रं असणाऱ्यांच्या घरात आढळतात.

लहान बाळाच्या मायक्रोबायोमला प्रभावित करणारे अनेक घटक असतात, जसं की स्तनपान, अॅंटिबायोटिक्सचा वापर किंवा त्याची जन्म घेण्याची पद्धत इत्यादी पण नेमके कोणते घटक कसा परिणाम करतात याबाबत अद्याप पूर्ण संशोधन उपलब्ध नाही.

या नव्या अभ्यासानुसार अंदाजे 80,000 बाळांच्या विष्ठेचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत. हे नमुने गोळा करणं हे अतिशय कठीण काम असेल पण या अभ्यासामुळे अनेक गोष्टींचा भविष्यात उलगडा होईल. या अभ्यासामुळं डॉक्टरांना अॅंटिबायोटिक्सच्या वापरासंदर्भात अनेक निर्णय घेता येऊ शकतील.

आईच्या दुधामुळं वाढते रोगप्रतिकारक क्षमता

शरीराचा संपर्क पहिल्यांदा कशा प्रकारच्या सूक्ष्मजीवांशी येतो याचा अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरू शकतो. म्हणजेच एखाद्या सूक्ष्मजीवाने जर शरीरावर हल्ला केला तर होणारं नुकसान टाळता येण्यासाठी प्रयत्न करता येतील.

या प्रयोगादरम्यान गोळा करण्यात आलेले विष्ठेचे नमुने केंब्रिजच्या वेलकम सॅंगर इन्स्टिट्यूटमध्ये ठेवले जातील. हे नमुने डॉ. ट्रेव्हर लॉली यांच्या देखरेखीखाली ठेवले जातील.

"माझा अलीकडच्या काळातला सर्वांत आवडता सूक्ष्मजीव कुठला आहे माहीत आहे का? त्याचं नाव आहे बायफिडोबॅक्टेरिअम," लॉली सांगतात.

"या सूक्ष्मजीवाने इतर सूक्ष्मजीवांच्या तुलनेत मानवी जीवनात सर्वांत आधी प्रवेश केला आहे आणि हा सूक्ष्मजीव मानवी दूधात असलेल्या शर्करेवर जगतो अशी आमची धारणा आहे."

जेव्हा बाळ आईचं दूध पितं त्यावेळी ते बाळ या सूक्ष्मजीवाच्या संपर्कात येतं आणि त्या बाळाचं मायक्रोबायोम अधिक वैविध्यपूर्ण होतं.

लहान बाळाच्या आयुष्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक सूक्ष्मजीवाचा अभ्यास करण्याचा डॉ. लॉली आणि त्यांच्या टीमचा प्रयत्न आहे. या सूक्ष्मजीवांचा आयुष्यात नंतर काय प्रभाव पडतो याचा अभ्यास देखील केला जाणार आहे.

"या प्रयोगाअंती अॅंटीबायोटिक्सचा वापर आणि सिझेरिअन पद्धतीनं जन्म देण्याबाबतचं जे धोरण आहे त्या धोरणांमध्ये काही बदल घडवता येतील का, याबाबत विचार केला जाणार आहे," असं लॉली सांगतात.

"...किंवा आपण असं देखील करू शकतो, आईच्या शरीरातील सूक्ष्मजीवांना वेगळं करून आपण ते बाळाच्या संपर्कात आणू शकतो. यामुळं त्यांचं मायक्रोबायोम हे परिपक्व होईल आणि त्यांच्या मायक्रोबायोमचा विकास होईल. थोडक्यात ही प्रक्रिया म्हणजे व्हजायनल सीडिंगचं शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिकरीत्या नियंत्रित असं रूप आहे," लॉली सांगतात.

"काही पालक हे काळाच्या पुढं आहेत असं आपण म्हणू शकतो का?"

"सध्या जी व्हजायनल सीडिंगची पद्धत प्रचलित आहे त्यानुसार आजकाल पालक व्हजायनल सीडिंग करत आहेत. पण या पद्धतीचे काही गंभीर परिणामदेखील होऊ शकतात," असं ब्रॉकलहर्स्ट सांगतात.

एखादा धोकादायक सूक्ष्मजीव त्या बाळाच्या संपर्कात येऊ शकतो. एक चतुर्थांश महिलांच्या योनीमध्ये ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस हा बॅक्टेरिया असतो. हा जीवाणू बाळाच्या संपर्कात आला तर त्याला धोका निर्माण होऊ शकतो.

"एखाद्या लहान बाळाला कृत्रिमरीत्या सूक्ष्मजीवांच्या संपर्कात आणणं कितपत योग्य आहे. जर त्या सूक्ष्मजीवाचा प्रादुर्भाव झाला तर आपण काय उपाययोजना करू शकतो? याचा विचार करूनच ही पद्धत अवलंबली पाहिजे की नाही याचा विचार व्हायला हवा," असं प्रा. ब्रॉकलहर्स्ट सांगतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)