ब्लॉग: व्हिएतनामसारखा सन्मान महिलांना भारतात मिळेल का?

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा व्हिएतनाममध्ये महिलांना समान हक्क

काही दिवसांपूर्वी मी व्हिएतनामच्या दौऱ्यावर होतो.

तिथली एक गोष्ट भारतापेक्षा खूपच वेगळी दिसली, ती म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कुठेही महिलांसाठी जागा राखून ठेवलेल्या नव्हत्या.

बस स्थानकं किंवा विमानतळावरही महिलांसाठी वेगळ्या रांगा नव्हत्या.

एकंदरीतच सार्वजनिक ठिकाणी कुठेही त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था नव्हती.

काही स्थानिक लोकांना मी याविषयी विचारलं तर त्यांचं उत्तर होतं, "आपण माणसंच आहोत. मग महिलांसाठी वेगळ्या रांगा आणि जागा कशाला?"

प्रतिमा मथळा महिलांना समान हक्क आणि समान दर्जा

व्हिएतनाममध्ये फिरताना ही गोष्ट तुम्हाला सतत जाणवते. महिला आणि पुरुषांमध्ये असलेली समानता. सगळ्याच ठिकाणी महिला पुरुषांबरोबरच सक्रिय आहेत.

त्या दुकान चालवतात. फूटपाथवर स्ट्रीट फूड विकतात. हॉटेलं आणि कॉफी हाऊसमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं कामं करतात.

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्याही भरपूर आहे आणि खेळाच्या मैदानातही मुली मागे नाहीत.

शाळेत मुलां एवढ्याच मुलीही पटावर आहेत. तर राजकारणातही त्यांची दखल घ्यावी अशी कामगिरी आहे.

व्हिएतनाममध्ये महिला प्रत्येक जागी सुरक्षित आहेत.

रात्री उशिरा काम करताना त्यांना काळजी वाटत नाही. अनोळखी कुणी हल्ला करेल याची भीती नाही.

प्रतिमा मथळा महिलांचं आरोग्यही चांगलं

मूळातच व्हिएतनाममध्ये गुन्हेगारीचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.

बलात्कार किंवा छेडछाडीच्या घटना इथं खूप चर्चेत येतात कारण, त्यांचं प्रमाण खूपच कमी आहे.

घर सुखी ठेवण्यासाठी व्हिएतनामी महिला सर्वतोपरी प्रयत्न करतात. जशा त्या घराबाहेर काम करतात, तसंच त्या घरीही कामात असतात.

देशात अजून फास्ट फूडचं फारसं प्रस्थ नाही. घरी शिजवलेलंच अन्न खाल्लं जात असल्यामुळे लोकांची तब्येत चांगली राहते. पण, महिलांची तब्येत खासकरून चांगली असल्याचं माझ्या लक्षात आलं.

प्रतिमा मथळा महिलांचं सैन्यातही मोठं योगदान

व्हिएतनाम युद्धाच्या वेळी महिलांनी अमेरिकन सैन्याचा नेटानं मुकाबला केला. वीस वर्षं चाललेल्या या युद्धात लाखो महिलांनी आपला प्राण वेचले.

तेव्हाच्या कम्युनिस्ट पार्टीनं महिलांना सैन्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहनच दिलं. युद्ध संपल्यावर राष्ट्र निर्मितीत त्यांचा सहभाग असावा म्हणून त्यांच्यासाठी नोकरीत राखीव जागा ठेवण्यात आल्या.

तिथेही समाजात मुलीपेक्षा मुलाला जास्त महत्त्व आहे. पण, मुलगी जन्माला आली तर तिच्याशी भेदभाव केला जात नाही.

देशात महिलांचं प्रमाण लोकसंख्येच्या 49% आहे आणि येणाऱ्या काळात हे प्रमाण वाढेल असा अंदाज आहे.

प्रतिमा मथळा महिलांना समान हक्क आणि समान दर्जा

सध्या महिलांसाठी इतकं सकारात्मक चित्र दिसत असलं, तरी कधीकाळी समान हक्क्यांसाठी इथंही महिलांना लढा द्यावा लागला होता.

बरोबरीचे हक्क त्यांनी झगडूनच मिळवले. 1930 साली महिलांनी एकत्र येऊन व्हिएतनाम महिला संघ नावाचा एक पक्ष बनवला. त्याच्या मार्फत आपल्या मागण्या मांडल्या.

भारताप्रमाणेच व्हिएतनाममध्येही 50% जनता तरुण आहे. त्यात महिलांची संख्या पुरुषांच्या बरोबरीनं आहे.

मी एक असं कॉल सेंटर पाहिलं जिथे 80% महिलाच होत्या.

प्रतिमा मथळा चिनी राजवटीच्या काळात बदलली परिस्थिती

व्हिएतनाममध्ये काही बुजुर्ग लोकांशी मी याविषयी बोललो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फार पूर्वीपासून तिथला समाज मातृसत्ताक होता.

पण, चीनच्या 1000 वर्षांच्या राजवटीत परिस्थिती हळूहळू बदलली. पुरुषांचं वर्चस्व वाढलं.

त्यांनी असंही सांगितलं की, आता पुन्हा एकदा महिलांच्या बाजूनं परिस्थिती झुकताना दिसत आहे.

मलाही तसंच वाटलं. शिवाय असंही वाटून गेलं, भारतीय समाज यातून काही शिकेल का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)