किम जाँग उन यांनी क्षेपणास्त्र चाचण्या का थांबवल्या?

किम जाँग उन Image copyright Getty Images

यापुढे क्षेपणास्त्रांच्या चाचण्या तसंच अण्वस्त्र चाचणी केली जाणार नाही, असं उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांनी स्पष्ट केलं आहे.

21 एप्रिलपासून उत्तर कोरिया सर्व प्रकारच्या अणुचाचण्या थांबवणार, तसेच आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी थांबवणार असं कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीनं सांगितलं.

आता या चाचण्या घेण्याची आवश्यकता उरलेली नाही, असं किम जाँग उन यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. आमचं उद्दिष्ट सफल झालं आहे, कोरियाची प्रगती व्हावी आणि या क्षेत्रात शांतता नांदावी यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचंही प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट केलं आहे.

ट्रंप यांनी किम जाँग उन यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

उत्तर कोरिया आणि संपूर्ण जगासाठी ही चांगली बातमी असल्याचं ट्वीट ट्रंप यांनी केलं आहे.

पुढच्या आठवड्यात किम जाँग उन हे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांची भेट घेणार आहेत.

तसेच जूनमध्ये ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेणार आहेत.

जर त्यांनी ट्रंप यांची भेट घेतली तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा यांच्यातली ही पहिलीच भेट ठरेल.

Image copyright Reuters

उत्तर कोरियानं जर आण्विक निशस्त्रीकरण केलं तर त्यांच्यासाठी प्रगतीची दारं खुली होतील असं ट्रंप म्हणाले होते.

दक्षिण कोरियानं देखील उत्तर कोरियाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हे एक अर्थपूर्ण पाऊल आहे असं दक्षिण कोरियाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

पुढच्या आठवड्यात उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये शिखर परिषद होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे सकारात्मक पाऊल असल्याचं दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयानं म्हटलं आहे.

किम जाँग उन यांनी चाचण्या का थांबवल्या?

किम जाँग उन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अण्वस्त्र चाचण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भविष्यात या चाचण्या घेण्याची आवश्यकता उरली नाही असं किम जाँग उन यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं. आमचं उद्दिष्ट सफल झालं आहे असं देखील त्यांनी म्हटलं.

उत्तर कोरियाचा आंतरखंडीय क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र चाचणी कार्यक्रम पूर्ण झाला असं किम जाँग उन यांनी नववर्षाला केलेल्या भाषणात म्हटलं होतं.

सहा चाचण्या पूर्ण केल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेली अण्वस्त्र अद्ययावत करण्याची गरज नाही, असं उत्तर कोरियाला वाटत आहे, त्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं मत बीबीसीच्या सेऊल प्रतिनिधी लॉरा बिकर यांनी व्यक्त केलं.

सध्या फक्त अण्वस्त्र कार्यक्रमावर बंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अस्तित्वात असलेली अण्वस्त्र नष्ट करण्याबाबत त्यांनी काहीच सांगितलं नाही.

उत्तर कोरियाला आपलं लक्ष आर्थिक प्रगतीवर केंद्रित करायचं आहे. त्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे असं म्हटलं जात आहे.

डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग उन यांची जूनमध्ये भेट होणार आहे. ही भेट डोळ्यासमोर ठेऊनच किम जाँग उन यांनी हा निर्णय घेतला असल्याचं मत फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टचे सीनिअर फेलो अंकित पांडा यांनी व्यक्त केलं आहे.

किम जाँग उन यांच्या आजोबांना आणि वडिलांना जे शक्य झालं नाही ते किम जाँग उन यांना साध्य होईल का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

Image copyright AFP

अण्वस्त्र कार्यक्रमामुळं उत्तर कोरियावर वेळोवेळी आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले गेले आहेत. त्याचा उत्तर कोरियानं नेहमीच विरोध केला आहे.

आम्ही असं क्षेपणास्त्र तयार केलं आहे, ज्याचा मारा अमेरिकेपर्यंत होऊ शकतो, असं उत्तर कोरियानं नोव्हेंबरमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायानं त्यांच्यावर टीका केली होती. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅंटोनियो गुटेरेस म्हणाले होते, "उत्तर कोरियानं उचललेलं हे पाऊल म्हणजे आंतराष्ट्रीय समुदायानं आखलेल्या कार्यक्रमाची पायमल्ली करणारं आहे."

त्यानंतर लगेचच अमेरिकेची सगळी राज्य त्यांच्या माऱ्याच्या टप्प्यात आल्याचा दावा प्योंगयांगमधल्या अधिकृत सूत्रानीं केला होता. अमेरिकी लष्करी सूत्रांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलं आहे.

तरी उत्तर कोरियानं डागलेली क्षेपणास्त्र अमेरिका आणि अलास्कापर्यंत पोहोचू शकतील, अशी भीती काही अमेरिकेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम

दुसऱ्या महायुद्धानंतर उत्तर कोरियाच्या शस्त्रागारात नव-नव्या शस्त्रांची भर पडली आहे. सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्तर कोरियानं क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे. यात प्रामुख्यानं लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.

इजिप्तमधून 1976च्या सुमारास उत्तर कोरियाला क्षेपणास्त्र निर्मितीसाठी मदत मिळाली. व्हॉसाँग हा क्षेपणास्त्रांचा प्रमुख कार्यक्रम 1984 साली उत्तर कोरियानं सुरू केला.

या व्हॉसाँग क्षेपणास्त्रांचा पल्ला 1,000 किमीपर्यंत आहे. तसंच ते रासायनिक आणि जैविक हल्लेही करू शकतात.

26 जुलै 2017 ला उत्तर कोरियानं जपान नजीकच्या सागरी क्षेत्रात 3,000 किमी मारक क्षमतेच्या एका आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

प्रतिमा मथळा उत्तर कोरियाच्या शस्त्रागारात वेगवेगळ्या माऱ्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत.

यानंतर उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल जगभरात उलटसुलट चर्चा सुरू झाली. काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते तर उत्तर कोरियाचा हा कार्यक्रम त्यांची अमेरिकेवर हल्ला करण्याची पूर्वतयारी आहे.

आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे

संपूर्ण जगात आपल्या अस्तित्वाची झलक दाखवण्यासाठी तसंच अमेरिकेवर दबाव ठेवण्यासाठी उत्तर कोरियानं पहिल्यापासूनच आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या निर्मितीवर भर ठेवला.

2012 मध्ये उत्तर कोरियात झालेल्या लष्करी संचलनात वेगवान माऱ्याची क्षमता असलेल्या आधुनिक KN-08 आणि KN-14 ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रं प्रदर्शित केली होती.

तीन टप्प्यात विभागलेलं KN-08 क्षेपणास्त्र विशिष्ट ट्रकवर तैनात केलेलं असतं. त्याची मारक क्षमता ही तब्बल 11,500 किमी आहे.

KN-14 क्षेपणास्त्र हे दोन टप्प्यात विभागलेलं असून त्याची मारक क्षमता ही 10,000 किमी आहे. या क्षेपणास्त्राची अद्याप चाचणी झालेली नसली तरी सध्याचे प्रमुख अस्त्र व्हॉसाँग-14 आणि त्यामधील फरक स्पष्ट झालेला नाही.

अणवस्त्रांचीही निर्मिती?

अमेरिकेतील माध्यमांच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियानं लहान अणवस्त्रांची निर्मिती केली आहे. पण त्याला अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.

तर काही तज्ज्ञांच्या मते उत्तर कोरियाला अणवस्त्रांची निर्मिती अजून शक्य झालेली नाही.

उत्तर कोरियाच्या अणवस्त्र कार्यक्रमाबाबत वॉश्गिंटन पोस्टनं अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्यानं एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

या वृत्तानुसार उत्तर कोरियानं अमेरिकेवर मारा करू शकणारी वेगवान अणवस्त्रं तयार केली आहेत. तसंच त्यांचा ते वापर करण्याची शक्यता आहे.

जपान सरकारच्या सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रां पुरताच मर्यादित राहिलेला नाही. त्यांनी अणवस्त्रांचीही निर्मिती केल्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची आवश्यकता

जगाला आपल्या सामरिक ताकदीची चुणूक दाखवण्यासाठी आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात जगातील प्रमुख देश गुंग आहेत.

तसंच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील विरोधी देशाला धाकात ठेवण्यासाठीही यांचा वापर केला जातो.

त्याचबरोबर अणवस्त्रं वाहून नेण्याची क्षमता आंतरखंडीय क्षेपणास्त्रांमध्ये असल्यानं त्यांच्या निर्मितीवर वेळ आणि पैसा खर्च केला जातो.


कोणत्या राष्ट्राकडे किती आतंरखंडीय क्षेपणास्त्रे

  • अमेरिका - ४५० (सिलो सिस्टमवर तैनात)
  • रशिया - ३६९ (सिलो सिस्टम आणि मोबाईल लाँचर्सवर तैनात)
  • चीन - ५५-६५ (विशेष टनेल नेटवर्कमध्ये तैनात)

रशिया आणि अमेरिकेनं शीतयुद्धाच्या कालखंडात एकमेकांवर दबाव ठेवण्यासाठी ही क्षेपणास्त्र एकमेकांविरोधात आपापल्या देशात तैनात केली होती.

आंतरखंडीय क्षेपणास्त्र ही एकाच पद्धतीनं निर्माण करण्यात येतात. हे क्षेपणास्त्र अनेक टप्प्यात विभागलेलं रॉकेट असतं. त्यात घन आणि द्रवरूपातील इंधनाचा वापर केलेला असतो.

प्रतिमा मथळा उत्तर कोरियानं देशातील विविध भागात आंतरखंडीय क्षेपणास्त्रं तैनात केली आहेत.

हे रॉकेट वातावरणाबाहेर अवकाशात झेपावताना त्याच्यासोबत जोडलेलं अस्त्रही पेलोडच्या स्वरूपात वर जातं. रॉकेट या पेलोडसह अवकाशात जाऊन संबंधित देश अथवा आपल्या निर्धारीत लक्ष्याच्या वर येतं आणि पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात येऊन थेट आपल्या लक्ष्यावर आदळतं.

काही अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्रांतल्या रॉकेटमध्ये अनेक स्फोटकं असू शकतात.

तसंच सोडल्यानंतर लक्ष्य बदलण्याची क्षमताही त्यात असते. मुख्य म्हणजे शत्रूच्या 'मिसाईल डिफेन्स सिस्टम'ला गुंगारा देण्यातही ही क्षेपणास्त्रं यशस्वी होतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)