या जपानी आजी 19वं शतक पाहणाऱ्या शेवटच्या व्यक्ती होत्या का?

नबी ताजिमा Image copyright YOUTUBE

तब्बल 117 पावसाळे पाहणाऱ्या जपानच्या नबी ताजिमा यांचं निधन झालं. 117 वर्षं आणि 261 दिवस एवढं दीर्घ आयुष्य लाभलेल्या ताजिमा यांचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही 'सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती' म्हणून नोंदवण्यात आलं होतं.

त्या जपानच्या आग्नेयेला असलेल्या किकाई बेटांवर राहत होत्या.

या वर्षी जानेवरी महिन्यात ताजिमा यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या वैद्यकीय अहवालानुसार त्यांचा मृत्यू याच हॉस्पिटलमध्ये झाला.

त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. आशिया खंडातल्या सर्वांत वयोवृद्ध जिवंत व्यक्ती म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली. तसंच त्यानंतर या निकषावर संपूर्ण जगात त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या.

गिनिज बुकच्या नोंदीनुसार 19व्या शतकात जन्माला आलेल्या आणि 21व्या शतकातही जिवंत असलेल्या ताजिमा या एकमेव व्यक्ती होत्या. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1900 रोजी झाला. म्हणजे त्यांनी 19व्या शतकातले शेवटचे काही दिवस बघितले, विसावं शतक पूर्ण बघितलं आणि 21व्या शतकही त्या तब्बल 17-18 वर्षं जगल्या.

जपानमधल्या प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार ताजिमा यांचे सध्या 160 वंशज आहेत, ज्यात नऊ मुलं, 28 नातवंडं, 56 पंतवंडं आणि त्यांची 35 मुलं यांचा समावेश आहे.

ताजिमा यांच्यानंतर जगातली सर्वांत वयोवृद्ध व्यक्तीही जपानमध्येच आहे. जपानच्या चियो योशिदा या आता जगातल्या सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती बनल्या आहेत. त्यांचं वय 116 वर्षं एवढं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा नबी ताजिमा

जपानची वृत्तवाहिनी NHK यांच्या वृत्तानुसार आपल्या आयुष्याच्या काही शेवटच्या दिवसांमध्ये ताजिमा जास्त वेळ झोपूनच होत्या. प्रदीर्घ काळ त्या बोलतही नव्हत्या. त्यांचा आहार मात्र व्यवस्थित होता, दिवसातून तीन वेळा.

शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असलेले 67,000 लोक सध्या जपानमध्ये आहेत, असं जपानच्या स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. संपूर्ण आशिया खंडातल्या देशांमध्ये शंभरी पार केलेले एवढे जास्त लोक इतर कोणत्याही देशात नाहीत.

एवढंच नाही, तर वयोवृद्ध नागरिकांच्या बाबतीत इतर कोणत्याही देशांची तुलना जपानशी होऊ शकत नाही. जपान सरकारच्या आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्येच्या 26 टक्के लोकसंख्या 65 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त वयाची आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)