कोरिया बैठक: किम म्हणाले, 'ही नवीन नात्याची सुरुवात'

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : कॅमेरांचा क्लिकक्लिकाट, स्मितहास्य आणि थोडाचा विनोद...

सहा महिन्यांपूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांनी आता युद्ध टाळण्यासाठी अण्वस्त्र नष्ट करण्याचा निर्धार केला आहे.

स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे 9 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी साडे 5 वाजता) उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जाँग-उन यांनी दक्षिण कोरियात प्रवेश केला. त्यावेळी दक्षिण कोरियाचे राष्ट्रध्यक्ष मून जे-इन त्यांच्या स्वागतासाठी सीमेवर उभे होते.

सीमेजवळच झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत त्यांनी कोरिया द्विपकल्पात शांतात प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं. 1953 साली दोन्ही कोरियांमधलं युद्ध संपलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमधलं वैर दिवसेंदिवस वाढतंच गेलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा यशस्वी बैठकीनंतर किम जाँग-उन यांनी उत्तर कोरियात परतले.

गेल्या वर्षभरात उत्तर कोरियाने अनेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेत अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियावर हल्ले करण्याची भाषा केली होती. त्याला उत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरिया बेचिराख करून, असं ट्वीट केलं होतं.

आजच्या चर्चेतून हे स्पष्ट नाही होऊ शकलं की आण्विक निःशस्त्रीकरण कोणत्या पद्धतीने आणि कधीपर्यंत केलं जाईल. यापूर्वीही असे निर्धार व्यक्त केले होते, पण वास्तवात काही घडलं नव्हतं, त्यामुळे अनेक जाणकार साशंक आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऐतिहासिक हास्य!

दक्षिण कोरियाला अमेरिकेने दिलेलं सुरक्षाकवच आणि दक्षिण कोरियातली अमेरिकन सैनिकांची उपस्थिती यांना उत्तर कोरियाने यापूर्वीही आक्षेप घेतला आहे.

शुक्रवारच्या बैठकीनंतर किम म्हणाले की "दुर्दैवी इतिहासाची" पुनरावृत्ती टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. "चर्चेत अनेक अडचणी येतील, पण वेदनेशिवाय विजय मिळत नाही," असंही ते म्हणाले.

"दोन देशांतल्या गोठलेल्या संबंधांना आम्ही निरोप दिला आहे. ते एक दु:स्वप्न होतं. आता नवीन नात्याची सुरुवात होत आहे," असं किम यांनी म्हटलं.

शुक्रवारी दिवसभरात काय काय घडलं ते पाहूया.


दुपारी 4.30 - ट्रंप म्हणतात युद्ध टळलं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलंय की आता कोरियातलं युद्ध थांबणार आहे. आधी कोरियाविरुद्ध कडक भाषा वापरणारे ट्रंप लवकरच उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन यांना भेटणार आहेत.

निवडणुकीच्या प्रचारात चीनविरोधात आगपाखड करणाऱ्या ट्रंप यांनी आजच्या कोरियातल्या भेटीसाठी चीनचंही कौतुक केलं.


दुपारी 2.45 - आण्विक निःशस्त्रीकरण

उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांनी कोरियन द्विपकल्पातून सर्व अण्वस्त्र काढून टाकण्याचा निर्धार केला आहे.

किम जाँग-उन आणि मून जे-इन यांनी चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची घोषणा केली.


प्रतिमा मथळा उत्तर कोरियाचे किम जाँग-उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन

दुपारी 12 वाजता - उत्तर कोरियात थंड स्वागत

उत्तर कोरियातल्या सरकारी टीव्ही चॅनलवर नेहमीप्रमाणे स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता कार्यक्रम सुरू झाले. आजच्या विशेष भेटीसाठी त्यांनी कार्यक्रमात कोणताही बदल केला नाही, असं BBC मॉनिटरिंगचे अॅलिस्टेअर कोलमन सांगतात.

दररोजप्रमाणे पेकटू पर्वताच्या दृश्यांवर लष्करी संगीताने कार्यक्रम सभेची सुरुवात झाली. सुरुवातीला झालेल्या बातम्यांमध्ये राष्ट्रप्रमुख किम जाँग-उन दक्षिण कोरियात गेल्याची बातमी दिली खरी, पण त्यात एक फोटो देखील दाखवला नाही.


सकाळी 7.45 - व्हाईट हाऊस आशावादी

या ऐतिहासिक चर्चेकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. यासंबंधी व्हाईट हाऊसने एक निवेदन जाहीर करत म्हटलं आहे - "उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांच्या ऐतिहासिक भेटीच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोरियाच्या जनतेचं अभिनंदन करतो. ही चर्चा कोरियाच्या दृष्टीने एक उज्ज्वल भविष्य आणि प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असेल, अशी आम्हाला आशा आहे"

"दक्षिण कोरिया या आमच्या मित्रराष्ट्राशी उत्तर कोरियाची होत असलेली सौहार्दपूर्ण चर्चा स्वागतास पात्र आहे. आता आम्ही येत्या काही आठवड्यांत डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-उन यांच्यात होणाऱ्या नियोजित भेटीची वाट पाहत आहोत."


सकाळी 7.27 - DMZ - शांतीचं प्रतीक

दक्षिण कोरियाच्या 'योहांप' वृत्तसंस्थेने या दोन नेत्यांमध्ये होत असलेल्या सौजन्यपूर्ण बैठकीची आणखी माहिती दिली आहे. त्यानुसार किम जाँग-उन म्हणाले, "मी राष्ट्राध्यक्ष मून यांच्याबरोबर अत्यंत मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे चर्चा करेन आणि त्याचे चांगले परिणाम दिसतील."

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा सैन्याचा प्रभाव नसलेला DMZ परिसरात दोघे नेते

मून जे इन म्हणाले, "ज्या क्षणी किम यांनी लष्करी सीमा ओलांडत सैन्याचा प्रभाव नसलेला DMZ परिसरात प्रवेश केला, तेव्हाच पॅममुनजन हे एक विभाजनाचं नाही तर शांततेचं प्रतीक झालं. मी किम जाँग-उन यांच्या निर्णयाचं पुन्हा एकदा स्वागत करतो, कारण त्यांच्या या निर्णयामुळे आजची ही चर्चा शक्य झाली."


सकाळी 7.00 - 'नूडल्स एंजॉय कराल'

या बैठकीला दोन्ही राष्ट्राच्या नेत्यांनी आपापल्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः केली आहे.

किम यांनी उत्तर कोरियातले प्रसिद्ध थंड नूडल्स आणले आणि त्यावर त्यांनी स्वत:च विनोद केला. दक्षिण कोरियाच्या नेतेही या विनोदावर चांगलंच हसले.

"मला वाटंत मी आणलेले नूडल्स तुम्ही नक्की एंजॉय कराल," असं ते म्हणाले.

या नेत्यांनी मग प्रसारमाध्यमांना तिथून जाण्यास सांगितलं जेणेकरून त्यांना "थोडं आरामात बोलता येईल".


सकाळी 6.53 - 'मोकळी चर्चा'

दोन्ही नेत्यांमध्ये मोकळी चर्चा सुरू आहे. चर्चेच्या वेळी दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळाचे दोन प्रतिनिधी आहेत.

किम यांना मोकळ्या चर्चेची अपेक्षा आहे. या चर्चेतून चांगला परिणाम निघेल, असंही त्यांना वाटतं.


सकाळी 6.23 वाजता - बंद दरवाजाआड

आता हे दोन्ही नेते खासगी चर्चेसाठी रवाना झाले आहेत.

आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा दक्षिण कोरियाने जाहीर केली आहे. आधी स्वागत समारंभ असेल, मग चर्चा होईल. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडेल (प्रत्येक बाजू स्वतंत्रपणे भोजन घेईल.)

नंतर संयुक्त पत्रकार परिषद होण्याबदद्ल साशंकता आहे. पॅममुनजन डिक्लरेशन नावाने ओळखल्या जाणाऱ्या चर्चेत काय होतं, यावर ते अवलंबून आहे.


सकाळी 6.15 - बहिणीकडे बघून स्मितहास्य

दक्षिण कोरियाचे मून यांनी किम यांच्या बहिणीबरोबर हस्तांदोलन केलं. गेल्या काही महिन्यात उत्तर कोरियाच्या राजकीय पटलावर त्यांचंही महत्त्व वाढलं आहे.

दक्षिण कोरियात झालेल्या विंटर ऑलिंपिक्समध्ये किम यांच्या बहिणीने उत्तर कोरियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळे दक्षिण कोरियात आता त्या सेलिब्रिटी आहेत तसंच त्या किम यांच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख आहेत, असं बीबीसी प्रतिनिधी रूपर्ट विंगफिल्ड-हेज यांनी सांगितलं.


सकाळी 6.00 - इतिहासात एक महत्त्वाचा क्षण

प्रतिमा मथळा किम जाँग-उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन

किम जाँग-उन यांनी दक्षिण कोरियात प्रवेश केला. मून जे-इन यांच्याशी हस्तांदोलन केलं. अशा प्रकारे कोरियन द्वीपकल्पाच्या इतिहासात एक महत्त्वाच्या क्षणाची नोंद झाली .

(ही ब्रेकिंग न्यूज असून ती क्षणाक्षणाला अपडेट केली जात आहे)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)