कोरिया बैठक : टेबलापासून केकपर्यंत सगळ्यांत दडला होता अर्थ

दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीचे स्थळ

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये झालेल्या ऐतिहासिक बैठकीची रचना विशिष्ट पद्धतीनं करण्यात आली होती. या बैठकीत वापरण्यात आलेल्या वस्तूंमागे विशेष सांकेतिक अर्थ दडला आहे.

बैठकीतले खाद्यपदार्थ, फुलं, टेबलाचा आकार आणि पाईन वृक्षाच्या बुंध्यावर माती टाकणं या सगळ्यामागे खास अर्थ दडला आहे.

"किम यांच्या रुपानं कोरियाई द्विपकल्पात जणू शांततेचा प्रवेश झाला आहे, यामुळे भविष्यात दोन्ही देशांत सहकार्य आणि शांतता वाढीस लागणार आहे," असं दक्षिण कोरियातल्या या बैठकीच्या आयोजनाच्या सूत्रधारांनी सांगितलं.

बैठकीचं ठिकाण

दक्षिण कोरियातल्या सैन्यविरहीत प्रदेशाजवळच्या (Demilitarized Zone - DMZ) पॅममुनजन गावात ही भेट झाली. या गावात भेट होण्यालाही विशेष सांकेतिक अर्थ आहे.

यापूर्वीच्या दोन भेटींवेळी दक्षिण कोरियातले राजकीय नेते उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग इथे गेले होते. यावेळी मात्र हे राष्ट्रप्रमुख दोन्ही देशादरम्यानच्या सैन्यविरहीत भागात भेटले आणि तिथून 'पिस हाऊस' या बैठकीच्या ठिकाणी रवाना झाले.

Image copyright SOUTH KOREAN GOVERNMENT

सीमारेषेच्या दक्षिणेला असलेल्या या हाऊसमध्ये जाण्यासाठी किम जाँग-उन यांनी पहिल्यांदाच सीमा ओलांडली.

किम जाँग-उन यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यासाठी दक्षिण कोरियाचे पारंपरिक रंगीत कपड्यांतील सैनिक आघाडीवर होते. तर, या नेत्यांच्या संरक्षणार्थ दक्षिण कोरियाचे सैनिक रस्त्याच्या दोन्ही बाजूनं चालत होते.

बैठकीतली फुलं

बैठकीच्या हॉलमध्ये सजावटीसाठी पारंपरिक फुलदाणीत मांडण्यात आली होती. या फुलदाणीत शुभेच्छांचा संदेश देण्यासाठी पिओनीजची फुलं ठेवण्यात आली होती.

तर, शांततेचा संदेश देण्यासाठी युरोपात आढळणारी डिझी ही फुलं आणि ज्या सैन्यविरहीत भागात ही बैठक झाली तिथली जंगली फुलं ठेवण्यात आली होती.

बैठकीतलं टेबल

दोन्ही नेते ज्या गोलाकार टेबलावर बसले होते त्या टेबलाचा आकारही वैशिष्ट्यपूर्ण होता. या टेबलाचं व्यास 2018 मिलीमीटर ठेवण्यात आला होतं. कारण, 2018मध्ये या दोन नेत्यांची बैठक झाली हे यासाठी निमित्त होतं.

Image copyright Getty Images

बैठकीसाठीच्या खुर्च्याही खास तयार करण्यात आल्या होत्या आणि विशेष म्हणजे त्या खुर्च्यांची रचना ही जपानला हिणवणारी होती. इथे लावण्यात आलेल्या कोरियन द्विपकल्पाच्या नकाशात डोको़डो हे वादग्रस्त बेटही दाखवण्यात आलं होतं. या बेटाचं नियमन सेऊलतर्फे केलं जात असलं तरी त्याच्यावर जपाननं आपला अधिकार सांगितला आहे. दोन्ही देश जपान विरोधासाठी ओळखले जातात.

बैठकीतली सजावट

बैठकीच्या सभागृहातली ही सांकेतिक सजावट टेबल आणि खुर्च्यांच्याही पुढे गेली आहे. कोरियातल्या पारंपरिक अशा कोरियाई 'हॅनोक हाऊस'प्रमाणे या संपूर्ण वास्तूची रचना करण्यात आली होती. इथल्या खिडक्यांचे पडदे हे कागदाने बनवण्यात आले होते.

कोरियाई द्विपकल्पातील निळ्याशार पर्वतराजींचं वर्णन करण्यासाठी सभागृहात निळं कार्पेट अंथरण्यात आलं होतं. तसंच या सभागृहात माऊंट कुमगँगचं भव्य चित्र लावण्यात आलं होतं. कोरियाई नागरिकांना एकदा तरी या पर्वतरांगांना भेट देण्याची इच्छा असते, असं दक्षिण कोरियाचे प्रवक्ते याबद्दल सांगतात.

Image copyright EPA

दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या सहकार्य आणि मैत्रीपूर्ण वाटचालीचा संकेत म्हणजे हा कुमगँग पर्वत असल्याचंही या प्रवक्त्यानं सांगितलं.

पाईन वृक्ष

भेटीच्या दुपारी या दोन्ही नेत्यांनी एकत्र पाईन वृक्षाच्या बुंध्यावर माती घातली. AFP च्या रिपोर्टनुसार, हा वृक्ष 1953 सालातला आहे आणि कोरियन युद्धाची याच वर्षी सांगता झाली होती.

दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी आपापल्या देशांमधून आणलेली माती बुंध्यापाशी घातली. त्यानंतर दोन्ही देशांतून आणलेलं पाणी ही घालण्यात आलं.

Image copyright AFP

तसंच, त्या झाडापुढे एक फलकही उभारण्यात आला. या फलकावर 'शांतता आणि भरभराटीची लागवड' असा उल्लेख करण्यात आला आहे.

बैठकीतलं खाद्य

या बैठकीचा कार्यक्रम ठरवताना रात्रीच्या जेवणालाही विशेष महत्त्व देण्यात आलं होतं. खाद्यपदार्थ आणि त्यांची पाककृती दोन्ही नेत्यांच्या मूळच्या शहरांमधली होती. तर, काही पदार्थ ज्या सैन्यविरहीत भागात बैठक सुरू होती, त्या भागातले होते.

Image copyright KOREA SUMMIT PRESS POOL

उत्तर कोरियातल्या प्योंगयांग नेंगम्युन इथल्या सुप्रसिद्ध कोल्ड नूडल्स जेवणात होत्या. तर, स्वित्झर्लंडमधील वास्तव्यात किम यांना आवडलेला स्विस पोटॅटो रोस्टी हा पदार्थही त्यात होता.

Image copyright Getty Images

तसंच, मून जे-इन यांच्या शहरातला पारंपरिक बिबिमबाब राईस आणि मासे, शिवाय सैन्यविरहीत प्रदेशातल्या भाज्या या जेवणात ठेवण्यात आल्या होत्या.

Image copyright NEWS 1
प्रतिमा मथळा कोल्ड नूडल्स

या शाही जेवणातल्या गोड पदार्थामुळे जपाननं नाराजी व्यक्त केली. कारण, या गोड पदार्थावर म्हणजेच मँगो मूस केकवर, डोको़डो हे वादग्रस्त बेटासह कोरियाई द्विपकल्पाचा नकाशा कोरण्यात आला होता. दक्षिण कोरिया नियमन करत असलेल्या या वादग्रस्त बेटावर जपाननंही दावा सांगितला आहे. या पदार्थाविरोधात जपानच्या परराष्ट्र मंत्रालयानं कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)