उत्तर कोरियाचं अणू चाचणी स्थळ 'मेमध्ये बंद होणार'

अण्वस्त्र Image copyright Getty Images

उत्तर कोरिया मे महिन्यात त्यांच्या देशातील अणू चाचणी परीक्षण स्थळ बंद करणार असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातर्फे देण्यात आली.

उत्तर कोरियातील पूंगेरीचे अणू चाचणी परीक्षण स्थळ जाहिररित्या बंद केलं जाणार आहे. यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या तज्ज्ञांना निमंत्रित केलं जाणार असल्याचं एका प्रवक्त्यानं सांगितलं.

उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे-इन यांनी शुक्रवारी कोरियन द्वीपकल्पात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आण्विक निःशस्त्रीकरणाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता.

उत्तर कोरियाकडून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यात आल्यानंतर दोन्ही राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेली ही बैठक महत्वपूर्ण ठरली.

उत्तर कोरियाच्या नेतृत्वाबरोबर आगामी तीन किंवा चार आठवड्यांमध्ये कोरियन द्वीपकल्पाचं आण्विक निःशस्त्रीकरण करण्यासाठी आपण चर्चा करणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी शनिवारी म्हटलं होतं.

दक्षिण कोरिया काय म्हटलं?

राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते यून याँग-चान यांच्या म्हणण्यानुसार किम जाँग-उन यांनी मे महिन्यात अणू चाचणी परीक्षण स्थळ बंद करणार असल्याचं सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांची ऐतिहासीक भेट.

उत्तर कोरियाच्या नेतृत्वानं हेही सांगितलं की, "आंतरराष्ट्रीय समुदायाला या प्रक्रियेतील पारदर्शकता लक्षात यावी म्हणून ते दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या तज्ज्ञांनाही निमंत्रित केलं जाणार आहे," अशी माहिती यून यांनी दिली.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या टाइम झोनमध्ये अर्ध्या तासाचा फरक आहे. दक्षिण कोरियाच्या टाइम झोननुसार उत्तर कोरिया टाइम झोनमध्ये बदल करणार असल्याचंही राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.

असं असलं तरी या मुद्द्यावर उत्तर कोरियानं अद्यापह कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

परीक्षण स्थळ कुठं आहे?

उत्तर कोरियाचे हे अणू चाचणी स्थळ हे पर्वतीय क्षेत्रात येते. उत्तर कोरियाचे हे प्रमुख परीक्षण स्थळ असल्याचंही म्हटलं जातं.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा उत्तर कोरियातील पूंगेरी इथं असलेल्या अणू चाचणी परीक्षण स्थळाची सॅटेलाइट इमेज.

पूंगेरी स्थळाजवळच्या मंटाप पर्वताच्या पायथ्याशी बोगदा खणून अणू चाचणीही घेण्यात आली आहे.

2006 नंतर तिथे सहावेळेस अणू चाचणी घेण्यात आली.

सप्टेंबर 2017मध्ये अखेरच्या वेळेस घेण्यात आलेल्या चाचणीदरम्यान भूकंपांचे हादरेही बसले होते. पर्वताचा आतील भाग या भूकंपामुळे कोसळला असल्याचं भूकंप निरीक्षकांचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)