मृत्यूनंतर एखाद्याचा मेंदू जिवंत ठेवणं योग्य आहे का?

मेंदू Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तुम्हाला तुमचा मेंदू मरणानंतर जिवंत करता आला तर?

एखाद्या प्राण्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या मेंदूला रक्त पुरवून जिवंत ठेवणं शक्य आहे का? हेच जाणून घेण्याचा एक प्रयोग नुकताच अमेरिकेच्या येल विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.

मृत डुकरांच्या मेंदूमधला रक्त प्रवाह चालू ठेवून त्यांनी मेंदू तसंच डुकरांचे इतर काही अवयवही काही तासांसाठी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. हे वाचून तुम्ही थोडं अस्वस्थ झाले असाल. सोबतच त्यांनी असं का केलं असावं, हाही प्रश्न तुम्हाला पडला असेलच.

तर भविष्यात मानवी मेंदू अशा पद्धतीने प्रयोगशाळेत जिवंत ठेवता येणं शक्य आहे का, हे जाणण्यासाठी हा प्रयोग करण्यात आल्याचं शास्त्रज्ञ सांगत आहेत.

जर मेंदू जिवंत होता तर त्या प्राण्यांना याबाबतची जाणीव होती का? याबाबत कोणतीच ठोस माहिती उपलब्ध नाही. पण काही प्रमाणात त्यांची संवेदना जागृत राहिली असावी, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

मेरीलँडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये (NIH) 28 मार्चला ब्रेन सायंस एथिक्स विषयावर पार पडलेल्या एका परिषदेत या प्रयोगाच्या निष्कर्षांवर चर्चा करण्यात आली. गेल्या आठवड्यात MITच्या टेक्नोलॉजी रिव्ह्यू अहवालातही या संशोधनाबद्दल चर्चा करण्यात आली.

येल विद्यापीठातल्या प्रा. नेनॅड सेस्टन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास 100 डुकरांच्या मेंदूवर हा प्रयोग केला. या प्रयोगाच्या नैतिकतेबद्दल NIHने चर्चा केली.

प्रा. सेस्टन यांनी सांगितलं की, या अभ्यासाद्वारे त्यांना कळलं की एक पंप, हिटर आणि कृत्रिम रक्ताच्या पिशव्यांच्या सहाय्याने डुकरांच्या मेंदूमधला रक्तप्रवाह सुरळीत करणं शक्य आहे.

या संशोधकांच्या टीमला डुकरांच्या मेंदूमधल्या पेशी जवळपास 36 तासांसाठी कार्यान्वित ठेवता आल्या. यावेळी या पेशीचं कार्य नैसर्गिकरीत्या सुरू असल्याचं त्यांना आढळून आलं.

Image copyright Reuters

या प्रयोगाचे निष्कर्ष थक्क करणारे असल्याचं प्रा. सेस्टन यांनी सांगितलं. जर मानवी मेंदूबद्दल असे प्रयोग शक्य झाले तर संशोधकांना मानवी मेंदूशी निगडीत उपचार पद्धतींमध्ये त्याचा उपयोग करता येऊ शकेल.

पण या प्रयोगांच्या नैतिकतेवरही प्रा. सेस्टन यांनीच पहिलं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते विचारतात की या मेंदूंना जर संवेदना जाणवत असतील तर त्यांना विशेष संरक्षणाची गरज आहे का? आणि एखाद्याचं आयुष्य वाढवण्यासाठी त्याच्या शरीरात दुसऱ्याचा मेंदू प्रत्यारोपणासाठी या तंत्राचा वापर कोणी केला तर?

प्रा. सेस्टन आणि अमेरिकेतल्या 15 अन्य न्यूरोसायंटिस्ट्सनी या विषयी त्यांना मार्गदर्शन करणारी नियमावली प्रसिद्ध व्हायला हवी, अशी मागणीही आता केली आहे. या आठवड्यात नेचर नावाच्या एका साप्ताहिकात त्यांनी ही मागणी मांडली आहे.

या साप्ताहिकात हे संशोधक एक प्रश्न उपस्थित करतात - "संशोधकांनी मेंदूच्या पेशींची निर्मिती प्रयोगशाळेत केल्यास त्या पेशींमध्ये संवेदना असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानवाच्या किंवा प्राण्यांसाठीच्या अशा प्रयोगांमध्ये जी संरक्षण किंवा काळजी घ्यावी लागते, ती या पेशींबद्दलही घ्यावी लागेल काय?"

Image copyright Reuters

हे संशोधक पुढे सांगतात, "हा प्रश्न कदाचित अनोळखी वाटू शकेल. मात्र आजच्या प्रयोगाच्या यंत्रणा अशा क्षमतेपासून अजून दूर आहेत. पण मानवी मेंदूचा सखोल अभ्यास करण्यासाठी सध्या अनेक नव-नवे प्रयोग होत आहेत. यात स्टेम सेलपासून मेंदूच्या पेशी वाढवण्याच्या प्रयोगाचा समावेश आहे. यात कालानुरूप बदलही होत आहेत."

या मेंदूच्या पेशींची संवेदनशीलता किंवा जागृतता तपासण्यासाठी ठोस नियमावली तयार करण्यात यावी, जेणेकरून हे प्रयोग लोकांच्या पाठिंब्यानं कायम सुरू राहतील, असंही या संशोधकांना वाटतं.

या विषयावर जनतेत आणि तज्ञांमध्ये चर्चा व्हावी संशोधकांच्या या मागणीचं युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजच्या प्रा. कोलीन ब्लेकमोर यांनी केलं आहे.

ब्लेकमोर बीबीसीशी बोलताना सांगतात, "या तंत्रावर अवलंबन संशोधकांसाठीही अवघड जाणार आहे. त्यामुळे याबद्दल जनतेत आणि तज्ञांमध्ये चर्चा होणं आवश्यक आहे. आणि हे तंत्र का विकसित करण्यात यावं याबाबतची चर्चाही सगळ्यांपुढे येणं गरजेचं आहे. इथे एक विरोधाभास देखील आहे. देहाशिवाय मेंदूला कार्यरत ठेवणं हे या तंत्रानुसार करता येतं. पण हे प्रयोगासाठी झालं. जर या मेंदूला संवेदना जाणवत असतील तर ही खूप चिंताजनक बाब आहे."

ब्लेकमोर पुढे सांगतात, "यामुळे अमर होता येण्याची शक्यताच अस्वस्थ करणारी आहे. कारण हे तंत्र प्रगत झाल्यास मेंदूचं जतन करून तो दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करण्याचा विचार बळावू शकेल."

"आपल्या ग्रहावरील लोकसंख्या खूप वाढली आहे. इथे नव्या तरुणांसाठी, नव्या विचारांसाठी जागा निर्माण होणं आवश्यक आहे. मानवामध्ये सदासर्वकाळ जिवंत राहण्यासाठी शक्य असलेल्या कोणत्याही यंत्रणेवर पकड मिळवण्याची नेहमी ओढ लागलेली असते. ही बाब मला अस्वस्थ करणारी आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)