यंदा साहित्यातलं नोबेल न देण्याचा स्वीडिश अॅकॅडमीचा निर्णय

नोबेल Image copyright ALFREDNOBEL.ORG

स्वीडिश अॅकॅडमीनं यंदा साहित्यातलं नोबेल न देण्याचा निर्णय घेतला आहे. अॅकॅडमीतल्या सदस्याच्या पतीवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढच्या वर्षी 2018 आणि 2019 या दोन्ही वर्षांचा पुरस्कार जाहीर करण्यात येईल असं अॅकॅडमीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आतापर्यंत फक्त सात वेळा हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला नाही. महायुद्धाच्या काळातली सहा वर्ष आणि 1935 मध्ये योग्य पुरस्कारार्थी नसल्यानं हा पुरस्कार कुणालाही देण्यात आला नव्हता.

नेमकं प्रकरण काय?

स्विडीश अॅकॅडमीच्या साहित्याचं नोबेल ठरवणाऱ्या समितीच्या तत्कालीन सदस्य कॅटरिना फ्रोस्टेन्सन यांचे पती जीन क्लाउड अरनॉल्ट यांच्याविरोधात 18 महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला.

इतकंच नाही तर अरनॉल्ट यांनी स्विडीश अॅकेडमीकडून अर्थसहाय्य घेऊन एक प्रकल्प देखील हाती घेतला होता. म्हणजेच त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत तेव्हा फ्रोस्टेन्सन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

त्यानंतर 7 सदस्यांनी आपला राजीनामा दिला होता. सदस्यांच्या आणि माध्यमांच्या दबावामुळं फ्रोस्टेन्सन यांना राजीनामा देणं भाग पडलं.

या समितीमध्ये एकूण 18 सदस्य असतात. नोबेल पुरस्कारासाठी 12 सदस्यांनी मतदान करणं आवश्यक असतं पण सध्या समितीमध्ये फक्त 11 सदस्य आहेत. त्यामुळे हा पुरस्कार पुढील वर्षी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नोबेल पुरस्काराचा इतिहास आणि तो कोण देतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्ही़डिओ : नोबेल पुरस्कारांबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)