अमेरिकेत चक्क रस्त्यातून उसळतायेत लाव्हा रसाचे 100 फुटांचे कारंजे

रस्त्यातून लाव्हा उसळत आहे. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रस्त्यातून लाव्हा उसळत आहे.

ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील, पण हवाईतल्या बिग आयलँड या बेटावरची परिस्थिती त्याहूनही गंभीर आहे. फक्त ज्वालामुखीतूनच नाही तर आसपासच्या जमिनीतूनही साधारण 100 फूट उंचीचे लाव्हा रसाचे कारंजे सध्या तिथं उडत आहेत.

ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने मोठं नुकसान झालं आहे आणि शेकडो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. इथल्या 3 रस्त्यांवर मोठाले तडे गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या सिव्हिल डिफेन्स एजन्सीनं नागरिकांना ज्वालामुखीच्या आसपासचा परिसर खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ज्वालामुखी उद्रेक.

माउंट किलावेया या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर आता जमिनीतूनही लाव्हा उसळू लागला आहे, वातावरणात सल्फर डायॉक्साईड या विषारी वायूचं प्रमाण वाढत असल्यानं मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

नुकतेच बिग आयलँडला एकापाठोपाठ एक भूकंपाचे तीव्र धक्के बसले. यू.एस. जिऑलोजिकल सर्व्हेनं 6.9 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद केली आहे.

या उद्रेकामुळे दोन घरांचं मोठं नुकसान झाल्याचं हवाईचे महापौर हॅरी किंग यांनी एबीसी न्यूज ला सांगितलं.

उद्रेकानंतर पळ काढताना एका रहिवाश्यानं एबीसी न्यूज ला सांगितलं, "माझे कुटुंबीय सुरक्षित आहेत, वस्तूंचं काय... त्या नवीन घेता येतात. मी 14 वर्षांपूर्वी इथे आलो तेव्हा हा दिवस उगवेल याची कल्पना होती. पण हे वास्तव अजूनही पूर्णतः पचलेलं नाहीये."

Image copyright USGS
प्रतिमा मथळा माउंट किलावेया.

लाव्हा रस उसळत असल्यानं जमिनीचा आकार बदलतोय आणि भूकंपजन्य हालचाली वेगानं होत आहेत, असं यू.एस. जिऑलोजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. त्याचबरोबर माउंट किलावेयामधली लाव्हा रसाची पातळी कमी होत चालली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

गुरुवारी सुरू झालेल्या उद्रेकानंतर जवळपासच्या परिसरात आणीबाणी लागू केली गेली आणि 1700 लोकांना तातडीनं हलवून सुरक्षित स्थळी नेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या.

Image copyright USGS
प्रतिमा मथळा जमिनीतून लाव्हा उसळतो आहे.

माउंट किलावेया हा जगातल्या सर्वाधिक जागृत ज्वालामुखींपैकी एक आहे. अलिकडेच झालेल्या लागोपाठच्या भूकंपांनंतर हा उद्रेक सुरू झाला.

'पू ओ (Puu Oo)' नावाचा ज्वालामुखीय हालचालींनी तयार झालेला खोलगट कडा कोसळल्यानं माउंट किलावेयामधून उसळणारा लाव्हा लोकवस्ती असलेल्या भागांकडे येऊ लागला.

हवाई राज्याचे गव्हर्नर डेव्हिड आयगी यांनी हजारो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी नॅशनल गार्डच्या सैनिकांची मदत घेण्यात येत असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)