मंकी बात : आपल्याला पैशांबद्दल माकडं काय सांगतात?

माकडं Image copyright Getty Images

माणसं ठराविक परिस्थितीत जसा निर्णय घेतात तशाच प्रकारे माकडंही काही `आर्थिक' निर्णय घेतात, असं एका प्रयोगात सिद्ध झालं आहे.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसवरील द बिग आयडियाच्या एपिसोडमधली ही मनी मंकी नावाची कथा आहे. तिचं सादरीकरण डेव्हिड एममाँड्स यांनी केलेलं आहे आणि तिची निर्मिती बेन कूपर यांची आहे. सराह केटिंगनी याचं रुपांतर केलेलं आहे.

पुर्टो रिकोलगतच्या एका बेटावर माकडांवर एक वेगळाच प्रयोग करण्यात आला. या प्रयोगामुळे आपल्याला अर्थयंत्रणेतील आपली वागणूक, जोखमीच्या वेळची मानसिकता याबाबत अधिक सखोलतेनं समजून घेता आलं, याबरोबरच आपली आर्थिक घडी काही काळापुरती का विस्कटून जाते, हेही स्पष्ट झालं.

यात सहा कॅपुचीन माकडांचा समावेश होता, त्यांना जेम्स बॉण्डच्या कॅरॅक्टर्सची नावं ठेवण्यात आली होती.

या प्रयोगासाठी संशोधकांनी माकडांना अन्नाच्या बदल्यात धातूचं टोकन देण्याचं प्रशिक्षण दिलं. जिथं हा प्रयोग सुरू होता तिथं संशोधकांनी एक लहानशी बाजारपेठ उभारली, इथे माकडांना वेगवेगळ्या किमतीत विविध खाद्यपदार्थ देण्यात आले.

यात एक आश्चर्यकारक गोष्ट लक्षात आली, अगदी थोडक्या प्रशिक्षणानंतर माकडांनी या प्रयोगात, बाजारात स्वस्त अन्न देणाऱ्याकडून खरेदी केली.

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा माकडांनी स्वस्त खाद्यपदार्थ देणाऱ्याकडून खरेदी केली.

लॉरीन सँटोस या येल विद्यापीठातील विज्ञान आणि मानसशास्त्राच्या प्राध्यापिकेबरोबर माकडांनी अर्थव्यवहार केला. ``माकडं खरोखरंच पैशांसारख्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतात का - त्यांच्याकडील पैशांचा जास्तीत जास्त वापर करू शकतात का? हे पाहाण्यासाठीच आम्ही हा सगळा घाट घातला होता,'' त्या म्हणाल्या.

``आम्हाला यात आश्चर्यकारक गोष्ट आढळली, ती म्हणजे अगदी थोड्याशा प्रशिक्षणानंतर माकडांनी अधिक स्वस्त खाद्यपदार्थ देणाऱ्या प्रयोगकर्त्यांकडून खरेदी केली. प्रयोगकर्त्यांकडून त्यांना एका टोकनच्या बदल्यात दुप्पट खाद्यपदार्थ मिळाले, तर त्यांनी तिथूनच वारंवार खरेदी केली.''

माकडांवर प्रयोग, पैशांचे!

संधीचा लाभ घेण्याचा मानवाचा गुण माकडांनीसुद्धा या प्रयोगात दाखवला. खाली टोकन पडलेलं असेल, तर वैज्ञानिकांचे लक्ष नसताना ते उचलण्याचा प्रयत्न माकडांनी केला. एखाद्या वस्तूतील गुंतवणूक हा माकडांमधील प्रमुख गुणधर्म आहे, यात शंका नाहीच. परंतु दिलेलं टोकन मूल्यवान आहे हे जाणण्याची क्षमता माकडांकडे आहे हे यातून दिसून येते.

Image copyright Getty Images

माकडांच्या जोखीम हाताळण्याच्या पद्धतीनं माणसाला एक धडाच मिळाला आहे.

संशोधकांनी आपल्या प्रयोगातून पर्याय निवडीचा एक घटक सादर केला आहे. यात माकडं दोनपैकी एका माणसाबरोबर व्यवहार करू शकतात. एकजण त्यांना खाद्यपदार्थांचे दोन भाग देईल. उदाहरणार्थ, द्राक्षं समजू या. हा व्यवहार प्रत्येकवेळेस त्यांच्याकडील टोकन घेऊन होईल. यात कुठलेही नुकसान नाही, अगदी सुरक्षित पर्याय आहे हा.

दुसऱ्या पर्यायात मात्र जरा जोखीम होती. एका टोकनच्या बदल्यात कधी एक द्राक्ष तर कधी तीन द्राक्षं देण्यात आली. हा पर्याय त्यांच्यासाठी धोक्याचा होता, मात्र यात निम्म्यावेळेस एक द्राक्ष देण्यात आले, तर निम्म्यावेळेस तीन द्राक्षं देण्यात आली.

माणसांच्या भाषेत सांगायचं. तर ते असे असेल : तुमच्याकडे पर्याय आहे, एक तर 2000 डॉलर्स अगदी नक्की मिळतील किंवा कदाचित 1000 डॉलर्स मिळतील किंवा कदाचित 3000ही मिळू शकतील.

कोणता पर्याय निवडाल?

आता हा जुगार खेळायचा की नाही - तुम्ही कुठला बरं पर्याय निवडाल?

बहुतांश लोक सुरक्षित पर्याय निवडतील. ते सरळ 2000 डॉलर्स खिशात टाकतील. माकडांनीही तेच केलं.

Image copyright Getty Images

एप आणि माकडे आपल्या प्रजातीचे सर्वात जवळचे नातेवाईक आहेत. आपला उत्क्रांत इतिहास एकच आहे. असं असूनही, प्रयोग थोडा बदलण्यात आला, माकडांना तोच पर्याय परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीनं देण्यात आला, काहीतरी वेगळं घडावं म्हणून हा बदल करण्यात आला होता.

प्राध्यापिका लॉरिन सँटोस स्पष्ट करतात की, ``माकड आत येतं आणि दोन्ही पर्यायांमध्ये त्याला तीन द्राक्षं ठेवलेली दिसतात, माकडाला वाटते की, अच्छा मला तीन द्राक्षं मिळण्याचा पर्यायसुद्धा आहे तर. एक माकड मात्र सावध होतं, त्यानं प्रत्येक वेळेस एकच गोष्ट केली. त्यानं ज्या माणसाबरोबर व्यवहार केला त्यानं तीन द्राक्षं दाखवली आणि देताना मात्र एक द्राक्ष हातात ठेवून दोनच त्याला दिली. हे लहान नुकसान वाटत असले तरी नुकसान झालंच की,'' असंही सँटोस म्हणाल्या.

``दुसरी व्यक्ती त्यांच्यासाठी तशी धोक्याची होती - कधी कधी तो माकडांना सर्व म्हणजेच तीनही द्राक्षं देऊन टाकायचा, तर कधी दोन आपल्याकडे ठेवून एकच द्राक्ष द्यायचा.''

आता जरा वेगळ्या पद्धतीने पाहू या : तुम्ही 3000 डॉलर्सपासून सुरुवात करा, आता तुमच्याकडे पर्याय आहे. एक तर तुम्ही 1000 डॉलर्सचे नुकसान सोसा आणि 2000 डॉलर्स मिळवा किंवा मग जुगार खेळा. तुम्ही अर्ध्या वेळेस खेळलात, तर तुम्ही 2000 डॉलर्स गमावून बसाल आणि तुम्हाला केवळ 1000 डॉलर्स मिळतील, पण निम्म्यावेळेला तुमचं काहीही नुकसान होणार नाही. आता तुम्ही काय कराल?

Image copyright Getty Images

बहुतांश लोक हा जुगार खेळतील आणि जरा धोक्याचा पर्याय निवडतीलही. आश्चर्य म्हणजे माकडंही तसंच वागतात. नुकसानाचा विचार त्रासदायक आहे खरा, पण तेसुद्धा अजिबात नुकसान होऊ नये म्हणून हा धोका पत्करतातच.

जेव्हा स्टॉक्स आणि शेअर्सचे किंवा घरांचे दर पडतात, तेव्हा लोक कदाचित अधिक सजग होतात. खरं तर ते याकाळात अधिक मोठी जोखीम घेत असतात. या काळात घसरणाऱ्या मूल्यांच्या स्टॉकवर लोक धोका पत्करतात, कारण त्यांना माहीत असतं की याचं मूल्य पुन्हा वाढणार आहे. आपण हे निरीक्षण करतो कारण आपल्या हातात जे आहे त्याची किंमत कमी आलेली आपल्याला चालणार नसते. हा नुकसानीसंदर्भातला दृष्टीकोन आहे.

आपल्यातील ही एक अजब गोष्ट आहे, काय करू शकतो बरं आपण?

प्राध्यापिका सँटोज म्हणतात, आपल्या विद्ध्वंसक प्रेरणांना विरोध करणारं वागण्यासाठी, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही हुशारीचे मार्ग निवडणं कधी कधी योग्य ठरते.

Image copyright Getty Images

बचत हे त्याचं एक उदाहरण.

``बहुतांश लोकांना बचत करायला आवडते, परंतु आपल्या पगारातील रक्कम बचतीसाठी काढणं आणि बचत खात्यात टाकणं म्हणजे आपलं नुकसान झाल्यासारखंच वाटू शकतं,'' त्या म्हणाल्या. याची भरपाई म्हणून, शैक्षणिक स्तरावर उपक्रम चालवले जातात आणि खात्यात रक्कम कशी टाकावी आणि आपला पगार वाढला की वाढलेली रक्कम बचतीत कशी घालावी हे सांगितलं जाते. वाढीव रक्कमेची बचत झाल्यानं तुम्हाला कधीही नुकसान झाल्यासारखं वाटत नाही.''

सेव्ह मोअर टुमॉरो

अर्थतज्ज्ञ रिचर्ड थालेर (नज थेअरीचे प्रणेते) आणि शलोमो बेनार्ट्झी, सेव्ह मोअर टुमॉरो (एसएमएआरटी) ही योजना सादर करतात. कर्मचाऱ्यांनी आपल्या निवृत्तीसाठी बचत करावी, यासाठी त्यांना उद्युक्त करणारा चार टप्प्यांचा एक उत्तम मार्ग आहे.

कर्मचाऱ्यांना उपक्रम सुरू होण्याच्या खूप आधीपासून यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. यामुळे कोणतेही तातडीचे आर्थिक परिणाम होत नाहीत. यानंतर तुमच्या पगारातील वाढीपर्यंत तुमच्या प्रत्यक्षातील निवृत्ती वेतनासाठीच्या योगदानाला सुरुवात होत नाही. यामुळे सध्या मिळणाऱ्या रक्कमेतून ही जास्तीची रक्कम जात आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये नसते.

प्रत्येक वेळेस पगारवाढ झाली की योगदानातही भर पडते, जास्तीत जास्त रक्कमेचा टप्पा गाठेपर्यंत ही वाढ होतच असते. कर्मचारी कुठल्याही वेळेस हे थांबवण्यासाठी मोकळे असतात. स्थितीविषयक पूर्वग्रहाच्या मानवी प्रवृत्तीवर हा अंतिम टप्पा आधारित आहे. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे काहीतरी करण्यापेक्षा काहीही न करणं हे जास्त सोपं आहे.

माणसं आपल्या पैशांचे जे निर्णय घेतात ते बहुतांश वेळा असंमजसपणाचे असतात आणि यामुळे रक्कमेचा आभास निर्माण होतो आणि बाजारपेठा कोसळतात. काहीवेळा आपण काहीही अर्थ नसलेले अतिशय वाईट निर्णय घेत असतो.

प्राध्यापक सँटोज आणि मंकीनॉमिक्स (माकडांचे अर्थशास्त्र) जे सांगतात त्यानं कदाचित नैसर्गिक क्रांतिकारी उपोरोधित्वच अधोरेखित होते, कारण ते काढून टाकणं अद्याप तरी शक्य झालेलं नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)