'मी काळी आहे म्हणून मला भारतात असे प्रश्न विचारले गेले'

अॅशले बटरफिल्ड
प्रतिमा मथळा अॅशले बटरफिल्ड

"काळ्या लोकांबरोबर सेक्स करताना जास्त आनंद मिळतो का? यासाठी त्यांचा आहार कारणीभूत असतो की हे अनुवांशिक असतं?"

एका हॉटेलमध्ये जेवण उरकताना एका भारतीय माणसाने हा प्रश्न माझ्यासमोर ठाकला. तो हॉटेलचा मालक होता, मध्यमवयीन असावा, आणि ते जेवणही त्यानेच बनवलं होतं.

बिल विचारताना अशा प्रकारच्या प्रश्नाला सामोरं जावं लागेल, ही माझी अपेक्षा नव्हती. पण मी शांत राहिले.

गेल्या सात वर्षांत कामासंदर्भात मी जवळजवळ 30 देश फिरले आहे. बहुतांश एकटीनं. पण एखाद्याच्या अशा प्रश्नावर काही दुरुत्तर करावं, असं मला कधीही वाटलं नाही. ना मी अस्वस्थ झाले, ना पुढच्याची कधी भीती वाटली.

अशा अनपेक्षित आणि विचित्र प्रश्नांना तोंड देण्याचा हा काही पहिला प्रसंग नव्हता.

एकदा उत्तर भारतातल्या कुठल्यातरी गावात जाण्यासाठी बसमध्ये बसले होते. डोळा लागला. जाग आली तेव्हा एक माणूस माझ्या अगदी जवळ येऊन व्हिडीओ शूट करत होता.

मी दचकले. "काय करतोय?" मी विचारलं.

"इस्न्टाग्राम," त्यानं शांतपणे उत्तर दिलं.

उदयपूरमध्ये एका हॉटेलमध्ये एक माणूस माझ्या जवळ येऊन सांगू लागला त्याला कृष्णवर्णीय लोक किती आणि कसे आवडतात. हळूहळू त्याची गाडी सभ्य संभाषणाच्या रुळावरून घसरली आणि अगदी घाणेरड्या भाषेवर गेली.

मी असं नाही म्हणत की दरवेळी माझ्याकडेच वाईट नजरेनं बघितलं गेलं, किंवा मला वाईटच वागवलं गेलं. पण जर मी एखाद्या गोऱ्या प्रवाशाबरोबर असायचे किंवा कुणी आशियाई वंशाचा प्रवासी माझ्या सोबत असला, तेव्हाच्या लोकांच्या नजरा वळायच्या.

मी एकटी प्रवास करताना किंवा किणी कृष्णवर्णीय प्रवासी माझ्यासोबत असताना लोकांच्या नजरा आणि त्यांची वागणूक याहून खूप वेगळी असायची.

जेव्हा कोणी गोरा प्रवासी माझ्यासोबत असतो, तेव्हाही लोक माझ्याकडे बघतात. पण त्यांच्या नजरेत तितकी तुच्छता नसते. जणू गोरा प्रवासी सोबत असल्यानं माझी लायकी वाढते.

मी एकटी असताना किंवा एखाद्या कृष्णवर्णीय सोबतीबरोबर असताना मात्र लोक आमच्याकडे तुच्छतेनंच बघतात. त्यांची नजर आमच्यावर खिळलेली असते. ते आमच्याकडे बोटं दाखवतात, एकटक बघत बसतात. आमची टर उडवतात किंवा घाईनं आमच्यापासून दूर निघून जातात.

पदवी मिळवल्यानंतर, फिरण्याची, जग बघण्याची माझी खूप इच्छा होती. बऱ्याच तरुण मंडळींसारखं मलाही हिंडायचं होतं, जगाचा अनुभव घ्यायचा होता. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आणि समाजांना समजून घ्यायचं होतं. बऱ्याच चाचण्या, परीक्षा पास केल्यानंतर Peace Corps साठी माझी निवड झाली. हा दोन वर्षांचा स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय स्वसंसेवक उपक्रम आहे जो अमेरिकन सरकारतर्फे राबवला जातो.

माझं बालपण, शिक्षण सगळं फ्लोरिडामध्ये झालं. घरची परिस्थिती अशी की आम्ही सुटीसाठी जाताना गाडीनं प्रवास करता येईल, अशीच जवळची ठिकाणं निवडायचो. म्हणून मला कधीच विमानप्रवासाची संधी लाभली नाही. एवढंच काय तर मी देशाबाहेर प्रवासही कधी केला नव्हता.

वयाच्या बावीसाव्या वर्षी माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमानतळावर पाऊल ठेवलं. मी निघाले होते स्वाझिलँड किंग्डमकडे (ज्याचं नुकतंच तिथल्या राजघराण्यानं इस्वातीनी असं नामांतर केलं आहे.) हा छोटा देश दक्षिण आफ्रिका आणि मोझांबिकच्या सीमेवर आहे.

हा माझा पहिला मोठा प्रवास होता. माझ्या आयुष्यातलं पहिलंवहिलं अॅडव्हेंचर. माझ्यासाठी हे सारंच थरारक होतं.

स्वाझिलँडला पोहोचल्यावर मात्र माझा भ्रमनिरास झाला. मला धक्का तर बसलाच, पण वाईटही वाटलं.

आतापर्यंत आफ्रिकेबद्दल, इथल्या लोकांबद्दल, समाजाबद्दल मला जी काही माहिती होती, त्याचा स्रोत हा चित्रपट, नॅशनल जिओग्राफिकची मासिकं आणि डिस्कव्हरी चॅनल इतकाच मर्यादित होता. या मासिकांमध्ये दिसणारी आफ्रिकन लोकं रंगबिरंगी कपडे घातलेली, अर्धनग्न असत. भाले परजून जनावराच्या शिकारी करणारी, इतर आदिवासी जमातींविरुद्ध लढाया करणारी असत. जमिनीवर बसून, मातीच्या झोपडीत, मातीच्या मडक्यात स्वयंपाक बनवणारी असत. त्यांची आयुष्य विलक्षण भासत. निराळ्याच, अनोख्या जगातली.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओः घरच्यांना वाटतं काळे लोक गुन्हेगार असतात

मात्र स्वाझिलँडमधल्या लोकांचं जगणं माझ्या तसं ओळखीचं होतं. इतकं ओळखीचं की मला कितीदा तरी कंटाळा यायचा. थोडा-फार सांस्कृतिक फरक होता, नाही असं नाही. काही सांस्कृतिक समारंभ खास त्या भागातले होते. पण रोजचं स्वाझी जगणं पश्चिमी जगातल्या रोजच्या दिवसासारखंच असायचं.

स्वाझी लोकांचा राहणीमान सामान्य, त्यांना पडणारे प्रश्नही आमच्या प्रश्नांसारखेच. अभ्यास-शाळा, वेळेवर कामावर जाण्याचा विचार करणारी लोक, आपल्या संगीतांची आवड, नातेसंबंधांमध्ये रुळणारी आणि आपल्या संस्कृतीवर प्रेम करणारी. हेच सगळे रोजच्या जगण्यातले प्रमुख विषय होते.

अमेरिकेसारखंच इथेही तसं वैविध्य आहे. इथेही शहरातले आणि खेड्यातले लोक आहेत, त्यांच्या जीवनशैली वेगवेगळ्या आहेत. काही प्रभावशाली मंडळी आहेत, काही दुर्भागी आहेत. चांगले, वाईट, आळशी, मेहनती - सगळ्या प्रकारची माणसं आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, अशा कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याकडे अंग झाकायला कपडा आहे आणि तलवारी न परजता रोजचा दिवस घालवता येतो.

मला फार आश्चर्य वाटतं, आफ्रिकेचं असं रूप का दाखवलं जात नाही!

Image copyright AFP

या सर्व अनुभवांपेक्षा मला जी वागणूक मिळाली, त्याचं वैषम्य वाटलं. Peace Corps ने माझी राहण्याची सोय केली होती. ज्या कुटुंबात मी राहणार होते त्यांना सांगण्यात आलं होतं की अमेरिकेतून एक कार्यकर्ता येणार आहे.

"ती अमेरिकन मुलगी इथे कधी येणार आहे?" असं मी तिथे पोहोचल्यावर मला विचारण्यात आलं.

"मीच आहे ती अमेरिकन मुलगी."

माझ्या उत्तरानं त्यांना धक्का बसला. माझ्या कल्पनेतल्या आफ्रिकन आयुष्याच्या जसा भ्रमनिरास झाला, तसाच त्यांचाही माझ्याबदद्ल झाला होता. त्यांनी कल्पना केलेली अमेरिकन मुलगी आणि बावीस वर्षांची कृष्णवर्णीय मुलगी, यात फार फरक होता.

त्यांच्या दृष्टीनं मी एक फेक अमेरिकन होते. काहींच्या मते तर मी इंग्रजी बोलणाऱ्या कुठल्या तरी आफ्रिकन देशातून आलेली गुप्तहेर होते. गोऱ्या नसलेल्या कार्यकर्त्यांना अशा तऱ्हेच्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागणं नवीन नाही. त्यातही कृष्णवर्णीय असाल तर अधिकच.

आशियाई, लॅटिनो, मूळ अमेरिकन रहिवासी कार्यकर्ते म्हणून गेले की त्यांनी खूप उत्साहवर्धक स्वागताची अपेक्षाच करू नये. गोरा स्वयंसेवक यायच्या ऐवजी हा कसा काय उगवला, असा विचार तुम्ही तिथे पोहोचल्यावर त्यांच्या डोळ्यात स्पष्ट वाचू शकता.

Peace Corps सोबत स्वाझिलँडमधे दोन वर्षांचं काम पूर्ण केलं. आव्हानं होतीच. त्यांना तोंड देत कामं सुरू ठेवली, कारण तिथे राहून मला स्वाझी जमातीचा अभ्यास करता आला आणि त्यांनाही माझी ओळख झाली.

माझं तिथलं काम संपल्यावर, मी दक्षिणेकडून उत्तर आफ्रिकेत गेले. आफ्रिकेतल्या विविध संस्कृती, पद्धतींचा अभ्यास केला.

अमेरिकेत परत आल्यावर Peace Corps मध्ये मला वरचं पद मिळालं. तिथे पाच वर्षं काम केल्यावर मी थांबवायचं ठरवलं.

गेल्या उन्हाळ्यात, वयाची तिशी पूर्ण केल्यावर मी आशियात हिंडायचं ठरवलं. मार्चमध्ये भारतात राहणार, असा बेत आखला. कारण मी होळी या रंगांच्या उत्सवाबदद्ल खूप ऐकलं होतं. लोकांना रंग खेळताना मला बघायचं, अनुभवायचं होतं.

कित्येक वर्षांपासून भारतात जायची माझी इच्छा होती. अमेरिकेत असताना माझी कुणी भारतीय मित्र-मैत्रीण नव्हती. असं कुणी असतं तर मला भारतात राहण्याविषयी माहिती गोळा करता आली असती.

पुस्तकं आणि इंटरनेटचा वापर करून भारताची ट्रीप ठरवली. हा माझ्यासाठी पूर्णपणे वेगळा अनुभव असणार होता.

दिल्ली विमानतळावर पाऊल ठेवलं, त्याला आता दोन महिने होतील. पहिल्यांदा माझ्या नजरेस पडली ती भटकी कुत्री, जिथे तिथे कचरा, कलकलाट आणि माणसांची गर्दी. हे जग माझ्यासाठी खऱ्या अर्थानं नवखं होतं.

दुसऱ्या दिवसापासून मला जे अनुभव यायला लागले, त्यानं मी फार अस्वस्थ झाले. बाहेर पडले की लोक माझ्याकडे बोटं दाखवायचे, हसायचे, माझ्यापासून दूर पळायचे. मी चालू लागले की समोरचा रस्ता मोकळा होत जायचा.

दुसऱ्याच दिवशीचा अनुभव. मी बाहेर पडले आणि काही भटकी कुत्री माझ्यावर हल्ला करायच्या बेतात होती. मला मदत करायचं तर सोडाच, पण हा सारा प्रसंग बघ्यांसाठी हास्यास्पद होता. कुत्र्यांचा हल्लाबोल, माझा आरडाओरडा, लोकांचं हसणं या सगळ्याचा शेवट म्हणजे लोक माझ्याभोवती कोंडाळं करून उभे राहिले.

कुत्री पळून गेल्यानंतर, लोकांनी माझ्यावर पाण्याचे फुगे मारायला सुरुवात केली! मी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तोवर नखशिखान्त भिजले होते. शेवटी एका वयस्क माणसाला माझी दया आली आणि त्यानं गर्दीला पांगवलं.

हॉटेलकडे जाताना मी स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न करत होते की हा होळीचा अनुभव आहे, यात वाईट काही नाही. पण माझ्या कल्पनेतली होळी मात्र अशी नव्हती. मला आलेला अनुभव घाबरवणारा होता. मजेचा नव्हता.

ऑगस्ट 2017 पासून मी आशियाई देशात फिरते आहे. इतर देशातही लोक माझ्याकडे बघायचे, अगदी एकटक बघायचे, पण भारतातला अनुभव सर्वार्थानं निराळा होता.

त्या बघण्यात उत्सुकता नव्हती. त्या नजरा भयावह होत्या. माझ्या काळ्या रंगाकडे लोक एकटक बघायचे, हसायचे, टर उडवायचे. माझ्यापासून दूर पळत रस्ता मोकळा करून द्यायचे. जणू काही मी त्यांच्या मागे लागले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तिरस्कार असायचा.

जवळपास सगळेच अनुभव असेच होते. लोकांनी मला फार वाईट वागवलं. या अशा वागण्यातून नाही तर मग काहीतरी बिभत्स प्रश्न विचारून.

या अनुभवाने कळस तेव्हा गाठला जेव्हा त्या मध्यमवयीन हॉटेल मालकाने मला तोंडावर काळ्या लोकांच्या सेक्स कौशल्याबद्दल विचारलं. हा अनुभव गलिच्छ होता.

आफ्रिकेत गेल्यावर माझ्या लक्षात आलं होतं की मला त्या देशाबद्दल चुकीची माहिती होती. जगाच्या या टोकावरही तेच घडत होतं.

अशा वेळी मी स्वाझिलँडमधल्या अनुभवांचा विचार करू लागले. मलाही नाही का वाटायचं, की तिथले लोक अजून शिकार करतात, मातीच्या मडक्यात अन्न शिजवतात.

मग मी शांतपणे त्या हॉटेलमालकाला विचारलं, "तुम्हाला कोणी दिली कृष्णवर्णीय लोकांबद्दल ही माहिती?"

तो म्हणाला की त्याने एकदा एका टीव्ही कार्यक्रमात पाहिलं होतं. त्यात एक कृष्णवर्णीय बाई तोकड्या कपड्यात इकडे तिकडे बागडत होती. डिस्कव्हरी चॅनल आणि पॉर्न हे त्याच्या माहितीचे स्रोत होते.

माझ्या लक्षात आलं की त्याच्या डोक्यात कृष्णवर्णीय व्यक्तींविषयी विशिष्ट माहिती दिली गेली आहे. ही माध्यमं किती चुकीची माहिती देऊ शकतात, याचा अनुभव असल्यानं मी त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.

माधयमांचा दर्जा, प्रेक्षक, अभिनय अशा विषयांवर त्याच्याशी बोलले.

माझ्या सेक्स कौशल्यासह माझे केस कसे आहेत, हादेखील लोकांच्या बघा-बोलायचा विषय होता. एकदा तरुण मुला-मुलींचा एक घोळका माझ्याकडे आला आणि मी विग लावला आहे का, असं विचारलं.

मी त्यांना शांतपणे समजावून सांगितलं. नैसर्गिक काळ्या केसांबद्दल लोकांना उत्सुकता असते, हे माझ्या ध्यानात आलं होतं.

वर्षानुवर्ष कृष्णवर्णीय बायका केस सरळ करून घेतात किंवा बारीक वेण्या (braids) घालून वावरतात. त्यामुळे कृष्णवर्णीय व्यक्तीचे नैसर्गिक स्वरूपातले केस बघणं हा अनुभव बहुतांश लोकांसाठी नवा होता. अलीकडच्या काळात गडद काळे-कुरळे केस वागवणाऱ्या स्त्रिया दिसू लागल्या आहेत, रोजच्या जगण्यात आणि माध्यमातसुद्धा. या अनुभवाबद्दल लोकांना सांगणं मला आवश्यक वाटतं.

माझ्याकडच्या या अनुभवांच्या पोतडीची हीच गंमत आहे. निरनिराळ्या अनुभवांची देवाण-घेवाण करणं, माणसामाणसातली दरी मिटवण्यासाठी प्रयत्न करणं, हाच अशा जगण्याचा आत्मा आहे. दर प्रसंगी, दर वेळी हे सहजी जमून येत का? नाही. पण जेव्हा मला हतबल वाटतं, तेव्हा लहानसहान गोष्टीतून स्फूर्ती मिळते, शक्ती मिळते.

एकदा मी उत्तर भारतात प्रवास करत होते. साडेसात तासांचा बसचा प्रवास होता. जयपूरहून उदयपूरला निघाले होते.

साधारण पंचेचाळीशीची एक बाई माझ्या शेजारी येऊन बसली. माझं सगळं व्यवस्थित आहे ना, अशी तिने विचारपूस केली, मला मदत केली. बसथांब्यांपाशी स्वच्छतागृह शोधायला मदत केली. वाटेत च्याऊम्याऊ खायला दिलं.

त्या प्रवासात या सोबतीनं किती हायसं वाटलं.

हा जो प्रश्न आहे, तो केवळ माझ्यापुरता, एका कृष्णवर्णीय बाईपुरता नाही. हा त्याहून मोठा प्रश्न आहे.

फेसबुकवर मी एका "कृष्णवर्णीय" मंडळींच्या स्वसंसेवक ग्रुपची सदस्य आहे. त्यात Peace Corpsचे आजी-माजी सर्व प्रकारचे कार्यकर्ते आहेत.

आम्ही सारे आपापल्या प्रवासाचे अनुभव मांडतो. प्रवास करताना काय अडचणी येतात, त्यावर चर्चा करतो. आपलं तिथे असणं आणि आजूबाजूच्यांना आपली खरी ओळख करून देणं किती गरजेचं आहे, याची जाणीव होते.

केवळ याच कारणासाठी मी कधीही गर्दीत लपायचा प्रयत्न करत नाही. प्रवास करताना लोकांच्या ठळक नजरेत येईल, अशा ठिकाणी वावरते. त्याचा त्रास होणार हे माहीत असतं, पण मी कधीही गर्दीपासून तोंड फिरवत नाही.

जितक्या लोकांना मला बघायचंय, माझ्याशी बोलायचंय त्यांना माझ्याकडे बघता यावं, माझ्याशी बोलता यावं, हेच माझं उद्दिष्ट आहे. त्यांना माझ्यासारखे इतके लोक बघायला मिळावे की त्यांना वळून वळून बघण्याचा कंटाळा आला पाहिजे. पुढच्या पिढीत जी कृष्णवर्णीय लोक प्रवास करतील ना, त्यांच्याकडे, त्यांच्या कुरळ्या केसांकडे बघण्यात या मंडळींना काही नावीन्य राहता कामा नये. माझी अजून एक प्रबळ इच्छा आहे.

हॅरिएट टबमन या अमेरिकन, जुन्या चालीरीतींविरुद्ध लढा देणाऱ्या स्त्रीचं छायाचित्र 20 डॉलरच्या नोटेवर छापलं गेलं पाहिजे, असं वाटतं मला. या कृतीमुळे अमेरिकेतली विविधता जगासमोर येईल.

वीस डॉलरची नोट देशोदेशी इतकी वापरली जाते की हॅरिएट सातत्यानं लोकांच्या नजरेसमोर राहतील. आमच्यासारख्या लोकांना देशोदेशी फिरताना, काम करताना या सततच्या शंकाकुशंकांना उत्तर देण्यापेक्षा काही अर्थपूर्ण काम करता येईल.

माझं स्वप्न सांगू, भविष्यात लोकांना कृष्णवर्णीय मंडळींना बघण्याची इतकी सवय झाली पाहिजे, की जेव्हा कोणी एकटी कृष्णवर्णीय स्त्री प्रवासी हिंडायला निघेल, तेव्हा तिला इतर प्रवाशांसारखं जगता आलं पाहिजे. लोकांच्या नजरांच्या सुया न टोचता फिरता आलं पाहिजे. जग बघता आलं पाहिजे. अनुभवता आलं पाहिजे.

मी प्रवास करतच राहणार. लोकांसमोर न घाबरता उभी ठाकणार.

(बीबीसी प्रतिनिधी मेघा मोहन यांच्याशी झालेल्या संवादावर आधारित)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)