पाकिस्तान नेमकं कोण चालवतंय? 'अहो चिंटूचे बाबा, ऐकता का जरा...'

नवाज शरीफ आणि शाहिद अब्बासी Image copyright AFP
प्रतिमा मथळा नवाज शरीफ आणि शाहिद अब्बासी

लोकशाहीचा तंबू दोन खांबावर उभा असतो. एक सत्ताधारी आणि दुसरे विरोधक. पण पाकिस्तानमध्ये सद्यस्थितीला कोण कोणती भूमिका निभावत आहे हेच कळणं कठीण झालं आहे.

पाकिस्तानात मुस्लीम लीग (नवाज) सत्तेवर आहे. पण विरोधी गट हा सुद्धा मुस्लीम लीग (नवाज) असल्याचंच जाणवतं.

पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी हे सगळीकडेच सांगत सुटलेत की, "मी जरी देशाचा पंतप्रधान असलो तरी माझे पंतप्रधान हे नवाज शरीफ हेच आहेत."

मागच्या आठवड्यात पंतप्रधान अब्बासी म्हणाले होते, पुढील निवडणुका हे निवडणूक आयोग नव्हे तर 'खलाई मखलूक' म्हणजेच एलियंस हेच घेतील.

हे जर एखादा विरोधी पक्षाचा नेता म्हणत असता तर एकदाचं समजण्यासारखं होतं. कारण विरोधी पक्षाचं कामच असतं प्रत्येक गोष्टीत कुठली न कुठली चूक शोधून काढणं.

पण पुढची निवडणूक एलियंसच घेणार, हे जर एखादा राज्यकर्ताच म्हणेल, तर अशा वेळी सरकारची हतबलता लक्षात येते.

बॉस तर पंतप्रधानच आहे ना!

पंतप्रधान हे काही गुप्तहेर संस्थांकडे इशारा करत आहेत, हे स्पष्ट आहे. पण विडंबन बघा, या गुप्तहेर संस्थांचे बॉसही हेच पंतप्रधानच आहेत, कागदावर जरी दिसत असले तरी.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा माजी पंतप्रधान नवाज शरीफ

पण कदाचित या संस्था इतक्या शक्तिशाली आहेत की स्वतः बॉस, म्हणजेच पंतप्रधान अब्बासी हे सती-सावित्रीसारखं या संस्थांचं थेट नाव घेण्याऐवजी डोक्यावरचा पदर बाजूला सारून फक्त हेच म्हणू शकतात - 'अहो चिंटूचे बाबा, ऐकता का जरा...?'

याच पद्धतीनं भ्रष्टाचाराचा शोध घेण्यासाठी CBI सारखीच एक संस्था सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करत आहे.

यावरही पंतप्रधान अब्बासी यांनी आरोप लावला की नॅशनल अकाउंटिब्लिटी ब्यूरो (NAB) ही संस्था कुणा दुसऱ्याच्या इशाऱ्यावर काम करत आहे.

पंतप्रधान अब्बासी यांचा पक्ष

स्पष्ट आहे की हा इशारासुद्धा 'चिंटूच्या बाबांकडे' आहे. यापेक्षाही गमंतीशीर वागणं हे पंतप्रधान अब्बासी यांच्या मुस्लीम लीग (नवाज) पक्षाचे सदस्य शहबाज शरीफ यांचं आहे.

Image copyright Getty Images

ते तर सगळीकडेच सांगत फिरत आहेत की त्यांचा पक्ष जर सत्तेत आला तर आम्ही कराचीला न्यूयॉर्क बनवून दाखवू. सगळ्या देशात आधुनिक रस्त्यांचं जाळं पसरवून टाकू.

सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या प्रदेशांचा विकास पंजाबच्या तोडीचा करून टाकू... वैगेरे वैगरे.

कुणात एवढी हिंमत नाही की, शहबाज शरीफ यांना स्वप्नरंजनातून बाहेर काढून खडसावेल की भाऊसाहेब जर बसून घ्या, तुमच्या डोक्यावर थंड पाण्याची बादली तर ओतू द्या, म्हणजे तुम्ही शुद्धीत याल.

9 वर्षांपासून सरकार चालवणारे

"तुम्ही विरोधी पक्षात नाहीत. सरकार तुम्ही स्वतःचं सरकार आहात," असंच काहीसं वागणं मागील नऊ वर्षांपासून सिंध प्रदेशातील सरकार चालवणाऱ्या पीपल्स पार्टीचं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नवाज शरीफ आणि शहबाज शरीफ

प्रत्येक सभेत, मेळाव्यात मुख्यमंत्री सांगतात की जर जनतेनं त्यांना संधी दिली तर सिंधचा इतका विकास करू की सिंध प्रदेशानेसुद्धा कधी असा विचार केला नसेल.

असं वाटतं की उष्णतेमुळे सगळ्यांचंच डोकं फिरलं आहे.

मुख्यमंत्री यांच्या या अशा गोष्टींमुळे आता सिंधचे लोक विचार करायला लागलेत की 'मुख्य' बरोबर आता आणखी आपल्याला कोणकोणते शब्द जोडता येतील बरं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)