या देशात परदेशी लोकांशी लग्न करण्यासाठी पैसे दिले जातात

कोस्टा रिका आणि चीन
प्रतिमा मथळा कोस्टा रिका आणि चीन

पैसे कसे कमवायचे, हा सगळ्यांना भेडसवणारा एक प्रश्न असतो. काही आपल्या मेहनतीच्या कमाईत समाधानी असतात, तर काही फायनॅन्शिअल प्लॅनिंगनं आपली संपत्ती वाढवत असतात. काहीजण नियोजनाऐवजी योजना आखतात.

कोस्टा रिकात राहणाऱ्या 46 वर्षांच्या मारिया (बदलेलं नाव) या पैशांसाठी कुणासोबतही लग्न करायला तयार आहेत, मग ते खोटंखोटं का असू नये.

त्यांना एका चीनी माणसाशी लग्न करण्याची ऑफर देण्यात आली. त्या बदल्यात त्यांना 100,00 कोलोन्स (अंदाजे 11,700 रुपये) मिळणार होते. त्या चीनी माणसाला यातून काय मिळणार? कोस्टा रिकामध्ये राहण्याचा परवाना, अर्थात इथलं नागरिकत्व.

सॅन होझे हा कोस्टा रिकातला सर्वांत मागास भाग. म्हणजे इथे रोजगाराच्या संधी मर्यादितच. अशातच खोट्या लग्नाच्या बदल्यात पैसे मिळत असल्यानं ते असा मार्ग अवलंबवत आहेत.

मारियाही याच भागात राहत होत्या. गरिबीमुळं दोन वेळच्या जेवणाचे वांदे होते. "घरात काहीच खायला नसायचं. त्यामुळं मला असं पाऊल उचलावं लागलं," असं मारिया सांगतात.

'ते लोक टपलेलेच असतात'

या ठिकाणी पैशासाठी लग्न करणं अगदी सामान्य गोष्ट आहे. या धंद्यातले दलालही अशाच गरीब आणि हतबल लोकांच्या शोधात असतात. परदेशी व्यक्तींशी लग्न करायला त्यांना भुरळ घालतात.

"गरिबीमुळे इथल्या लोकांना मदतीची गरज असतेच. मागचा पुढचा विचार न करता ते सरळ हो म्हणतात," असं तिथल्या एका रहिवाशानं बीबीसी मुंडोला सांगितलं.

"त्यांनी मला एका चीनी माणसाचा फोटो दाखवला आणि मला एवढंच सांगण्यात आलं, मारिया, तु्म्ही या चीनी व्यक्तीशी लग्न करणार आहात."

लग्न झाल्यानंतरही मारिया जिथे राहायच्या, तिथेच राहतात. पण लग्नाच्या दिवशी त्यांना एका कारमध्ये नेण्यात आलं. मॅरेज सर्टिफिकेटवर त्यांनी सही केली. त्याचा मोबबदला म्हणून मला एक लाख कोलोन्स त्यांना देण्यात आले. लग्नानंतर त्यांना लवकरात लवकर घटस्फोट दिला जाईल, असं आश्वासन होतंच.

मारिया यांच्या बाबतीत दलालानं दिलेला शब्द पाळला आणि काही काळानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला.

पैसे कमवण्यासाठी त्यांनी काही वर्षांनंतर परत चीनी व्यक्तीशी लग्न केलं. त्यांच्या मुलींनी आणि साथीदारानेही असा मार्ग अवलंबला.

काळा बाजार

पैशाच्या बदल्यात लग्न करणं ही खूप गंभीर बाब आहे, असं इथल्या सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारच्या खोट्या लग्नांच्या एक हजाराहून अधिक केसेसची आम्ही चौकशी करत आहोत, असं कोस्टा रिकातील सरकारी वकील गिलर्मो फर्नांडेझ यांनी सांगितलं.

पण नेमका आकडा हा यापेक्षा कितीतरी मोठा असू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

कोस्टा रिकातील गुन्हेगारांचं जाळं हे खोट्या लग्नाचं रॅकेट चालवत आहेत, असं इमिग्रेशन ऑफिसचे संचालक गिसैला यॉकचेन यांनी सांगितलं.

प्रतिमा मथळा सॅन जोसमधलं चायना टाउन

माफियांची टोळी ही लोकांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून त्यांची लग्नं परदेशी व्यक्तींशी करून देतात. यातून परदेशी व्यक्तीला नागरिकत्व मिळतं.

पण आपल्याला फसवलं गेलं आहे हे पीडित व्यक्तीला तेव्हाच कळतं जेव्हा त्यांच्या सरकारी कागदपत्रांवर 'अवैवाहिक' वरून 'वैवाहिक' असं स्टेटस परस्पर बदललं जातं.

ज्या व्यक्तीचं परवानगीनं खोटं लग्न लावून दिलं जातं, त्या व्यक्तीला घटस्फोट देण्याचं आश्वासनही दिलं जातं. पण बऱ्याचदा घटस्फोट दिलाच जात नाही आणि आपलं कुणाबरोबर तरी लग्न झालं आहे, याचा यांना पत्ताही लागत नाही.

परदेशी व्यक्तीही या रॅकेटचा बळी पडतात, असं यॉकचेन सांगतात.

बीबीसीनं काही सरकारी कागदपत्रांची छाननी केली. एका स्पॅनिश येत नसलेल्या चीनी व्यक्तीनं मॅरेज सर्टिफिकेटवर सही केली होती, हे समजून की तो नागरिकत्वाचा दाखला आहे.

कायदे कडक केले पण...

2010 मध्ये स्थलांतराचा कायदा कडक करण्यात आला होता, असं यॉकचेन सांगतात. त्यानुसार, खोटं लग्न करून देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना, वकिलांना तब्बल पाच वर्षं तुरुंगवास होऊ शकतो.

तेव्हापासून परदेशी व्यक्तींना आता लग्नानंतर लगेच कोस्ट रिकाचं नागरिकत्व दिलं जात नाही.

लग्नानंतर परदेशी व्यक्तीला कोस्टा रिकाचा रहिवासी दाखला मिळू शकतो. पण तो केवळ एक वर्षासाठीच वैध राहणार. दरवर्षी त्यांना आपण अजूनही एकत्र राहत आहोत, हे सिद्ध करून लग्नाच्या प्रमाणपत्राचं नुतनीकरण करावं लागतं.

तीन वर्षांनी मग परदेशी पार्टनर कोस्टा रिकाच्या नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतो.

'अमेरिकेत प्रवेशासाठी'

कोस्टा रिकाला येणारी चिनी माणसं दक्षिण चीनमधल्या गुआंगदोग भागातली आहेत, असं या विषयातील अभ्यासक अलॉन्सो रॉड्रीग्स सांगतात.

या देशातले कायदे स्थलांतरासाठी शिथिल आहेत, आणि हा देश तुलनेनं सुरक्षित मानला जात असल्यानं बहुतेक लोक कोस्टा रिकाला पसंती देतात.

चिनी लोक बऱ्याच वर्षांपासून कोस्टा रिकाला स्थलांतरित होत आहेत. 1855 साली पहिल्यांदा चिनी लोकांनी कोस्टा रिका गाठल्याची नोंद आहे. तेव्हा ते इथे येऊन शेतमजुरी करू लागले.

पण सगळ्या चीनी लोकांचा कोस्टा रिकामध्येच राहण्याचा उद्देश नसतो. "अनेकांसाठी हा देश अमेरिकेमध्ये स्थायिक होण्यासाठीचं प्रवेशद्वार आहे," असं रॉड्रीग्स सांगतात.

प्रतिमा मथळा चांगल्या आयुष्याच्या शोधात ली झोंग यांनी देश सोडून कोस्टा रिकात स्थलांतरित झाल्या.

कोस्टा रिकामध्येच स्थायिक झाले तर ते छोटंसं दुकान किंवा व्यवसाय चालू करतात. ते स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेतात, असं त्यांनी सांगितलं.

कोस्टा रिकात स्थायिक झालेल्या लोकांपैकी ली झोंग या एक आहेत. त्या सॅन होझेमध्ये किराणा मालाचं दुकान चालवतात.

ली पहिल्यांदा पनामा देशात आल्या होत्या. पण तिथे अडचणी आल्यामुळं त्या कोस्टा रिकामध्ये आल्या. आपल्या मुलाच्या मदतीनं त्यांनी एक दुकान सुरू केलं.

खोट्या लग्नांविषयी विचारलं असता ली यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. पण सॅन होझेमध्ये चिनी आणि कोस्टा रिकाच्या लोकांमध्ये बरीच लग्नं झालेली जोडपी आपल्या ओळखीची आहेत, अशी त्यांनी कबुली दिली.

चिनी पुरुष आणि कोस्टा रिकाच्या महिलांमधलं लग्नं टिकतं, पण एक चिनी महिला आणि कोस्टा रिकाच्या पुरुषाचा एकत्र संसार फार काळ टिकत नाही, असं त्या गंमतीनं सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)