ट्रंप, तुम्ही सर्वांत मोठी चूक केली आहे - इराण

अयातुल्लाह अली खोमेनी Image copyright AFP
प्रतिमा मथळा अयातुल्लाह अली खोमेनी

अमेरिकेनं अणू करारातून माघार घेतल्यानंतर इराणनं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इराणच्या काही खासदारांनी संसदेमध्ये अमेरिकेचा झेंडा जाळून त्यांचा रोष व्यक्त केला आहे.

यावेळी इराणच्या खासदारांनी अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच अणू काराराच्या प्रतीसुद्धा जाळल्या.

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्लाह अली खोमेनी यांनी ट्रंप यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. "ट्रंप, तुम्ही सर्वांत मोठी चूक केली आहे," असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Image copyright EPA

इराण अणू करारातून अमेरिकेची माघार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणबरोबर 2015 साली झालेल्या अणू करारातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या काळात झालेला हा करार एक नागरिक म्हणून आपल्यासाठी अतिशय लाजिरवाणा होता, असं त्यांनी सांगितलं. हा करार सडका आणि कुजका असल्याचंही ट्रंप म्हणाले.

युरोपियन मित्रराष्ट्रांच्या सल्ल्याविरोधात ट्रंप यांनी हा निर्णय घेतला असून, इराणवर या कराराअंतर्गत शिथिल करण्यात आलेले आर्थिक निर्बंध पुन्हा लागू करणार असल्याचंही ते म्हणाले.

पण काय आहे नेमका वाद? ट्रंप यांचा कुठल्या गोष्टींना आक्षेप होता? इथे वाचा

या घोषणेनंतर इराणनं पुन्हा एनरिच्ड युरेनियमच्या उत्पादनाची तयारी करत असल्याचं म्हटलं आहे. अण्वस्त्र आणि अणुउर्जेच्या उत्पादनासाठी एनरिच्ड युरेनियमची गरज असते.

"आपल्या वचनांवर ठाम नसल्याचीच घोषणा अमेरिकेने केली आहे," असं इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "मी इराणच्या अणू ऊर्जा संस्थानाला कोणत्याही कारवाईसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. गरज असल्यास आम्ही औद्योगिक पातळीवर कोणत्याही बंधनांशिवाय पुन्हा युरेनियमचं उत्पादन सुरू करू."

पण त्या आधी आपण मित्रराष्ट्रांशी चर्चा करून पुढचे काही आठवडे वाट पाहू, असंही त्यांनी सांगितलं. "करारातील तरतुदी इतर सदस्यांच्या सहकार्याने पूर्ण होणार असतील तर करार अजूनही शाबूत राहू शकतो."

निर्बंध कधीपासून लागू होतील?

इराणवर निर्बंध तातडीने लागू होणार नाहीत तर त्यासाठी आधी 90 ते 180 दिवसांची मुदत देण्यात येईल, असं अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने म्हटलं आहे.

या विभागाच्या वेबसाईटवर जाहीर केलेल्या एका निवेदनानुसार, 2015 साली झालेल्या या कराराअंतर्गत इराणच्या ज्या ज्या क्षेत्रांचा समावेश केला होता, त्या त्या क्षेत्रांवर पुन्हा निर्बंध लादण्यात येतील. यात तेल, हवाई वाहन उत्पादन क्षेत्र, मौल्यवान धातूंचा समावेश आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इराण अणू करारातून अमेरिकेची माघार

तसंच इराण सरकारने अमेरिकन डॉलर बॅंक नोटांच्या रूपात विकत घेण्यावर निर्बंध लावले होते, त्यांचाही यात समावेश असेल, असं ट्रेझरी विभागाने म्हटलं आहे.

इराणबरोबर अजूनही व्यापार करणाऱ्या युरोपियन कंपन्यांनी सहा महिन्यात आपले व्यवहार थांबवावे, अन्यथा अमेरिका त्यांच्यावरही कारवाई करेल, असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांनी सांगितल्याचं वृत्त आहे.

कोण काय म्हणालं?

फ्रान्स, जर्मनी आणि UKच्या नेत्यांनी ट्रंप यांचं मन वळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण आज त्यांनी अमेरिकेच्या निर्णयावर खेद व्यक्त केला आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन काढून हा निर्णय "अत्यंत निराशाजनक" असल्याचं म्हटलं आहे. युरोपियन महासंघाच्या परराष्ट्र धोरणाच्या प्रमुख फेडरिका मोघरिनी म्हणाल्या की युरोपियन महासंघ करार वाचवण्यावर ठाम होता.

दरम्यान, बराक ओबामांनी ट्रंप यांची ही घोषणा एक भरकटलेला निर्णय असल्याचं म्हटलं आहे. फेसबुकवर एक सविस्तर प्रतिक्रिया देत त्यांना हा करार अमेरिकेसाठी हितावह होता, असं मत व्यक्त केलं आहे.

"संयुक्त कृती समिती (JCPOA) मधून बाहेर पडणं म्हणजे आपल्या सहकाऱ्यांकडे तसंच या करारावर काम करणारे राजदूत, वैज्ञानिक आणि गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठ दाखवल्यासारखं आहे," असं ओबामा म्हणाले.

"एकीकडे अण्वस्त्रांचा वापर टाळण्यासाठी आपण उत्तर कोरियाबरोबर चर्चा यशस्वी व्हावी, असं प्रयत्न करत आहोत. दुसरीकडे या करारातून बाहेर पडून आपण त्याच प्रयत्नांच्या विरोधात जात आहोत. हा तर एक मोठा विरोधाभास आहे," असंही ते पुढे म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नेतान्याहू आणि ओबामा, नोव्हेंबर 2015

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रंप यांच्या 'धाडसी' निर्णयाला पाठिंबा देत असल्याचं सांगितलं. हा करारा घातक होता, असं त्यांनी म्हटलं आहे.

पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनिओ गुट्रेस या घोषणेमुळे अतिशय चिंतेत पडले आहेत, असं संयुक्त राष्ट्र महासंघाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. या करारावर सही करणाऱ्या इतर सदस्यांनी आता आपल्या वचनावर ठाम राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

आणि इराणचा प्रादेशिक शत्रू मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाने ट्रंप यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)