डासांचा नायनाट करायला शास्त्रज्ञ विरोध करत आहेत कारण...

डासांचं समूळ उच्चाटन करावे का? Image copyright Science Photo Library
प्रतिमा मथळा डासांचं समूळ उच्चाटन करावे का?

आजच्या घटकेला, माणसाच्या जीवाला सर्वात जास्त आणि अगदी सहज धोका उत्पन्न करू शकेल असा जगातील एकमेव कीटक म्हणजे 'डास' म्हणजेच 'मच्छर'. यावर उपाय म्हणून डासांचे समूळ उच्चाटन करावं का?

डास अनेक रोगांचे वाहक असून, वर्षागणिक लाखो माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात. इतकंच नव्हे, तर आता डासांद्वारे पसरणाऱ्या झिका विषाणूंचा संबंध, दक्षिण अमेरिकेतील हजारो नवजात अर्भकांच्या मेंदूत जन्मतःच दोष असण्याशी जोडला जातो आहे. पण यावर डासांचं समूळ उच्चाटन हा उपाय आहे का?

डासांच्या 3500 प्रजाती ज्ञात आहेत. त्यातील बहुतांश मानवाच्या दृष्टीनं निरुपद्रवी आहेत. वनस्पती आणि फळांतील रसावर त्यांची गुजराण चालते.

या ज्ञात प्रजातींपैकी फक्त 6% जातींतील मादी डास माणसाचं रक्त शोषून घेतात. तेही माणसांना त्रास देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या अंड्यांच्या फलन प्रक्रियेसाठी. यांतील, फक्त अर्ध्याच जाती, मानवी शरीरात रोग निर्माण करणारे परजीवी वाहून नेतात, मात्र या शंभर जातीच माणसाचं जगणं पुरतं कठीण करून टाकतात, हे ही तितकंच खरं.

ग्रीनविच विद्यापीठातील नॅचरल रिसोर्स इन्स्टिट्यूटचे 'फ्रेंसेस हॉक्स म्हणतात', "पृथ्वीवरील अर्ध्या लोकसंख्येला, डास चावल्यामुळे होणाऱ्या रोगांचा धोका आहे. माणसांच्या अपरिमित दुःखाचं डास कारण ठरत आहेत."

धोकादायक डास

डिस इजिप्ती - डासाच्या या जातीमुळे झिका, येलो फिवर ( पितज्वर), डेंग्यू ताप या रोगांचा फैलाव होतो. यांचा उगम आफ्रिकेत झाला असला तरी जगभरातील उष्ण कटिबंधीय आणि उपउष्ण कटिबंधीय प्रदेशात या प्रजातीचं अस्तित्व दिसतं.

Image copyright Science Photo Library
प्रतिमा मथळा ज्ञात प्रजातींपैकी फक्त ६% जातींतील मादी डास माणसाचे रक्त शोषून घेतात.

एडीस अल्बोपिक्टस - या जातीच्या डासांमुळे पितज्वर (येलो फिवर), डेंग्यू ताप आणि वेस्ट नाईल व्हायरस सारख्या रोगांची लागण होते. या जातीचे डास मुळचे दक्षिण पूर्व आशियातील असले, तरी जगभरातील उष्ण कटिबंधीय आणि उपउष्ण कटिबंधीय प्रदेशात या प्रजातीचं अस्तित्व आहे.

अॅनाफिलीस गॅम्बिई - या डासाच्या जातीचे दुसरे नावच मुळी 'आफ्रिकन मलेरिया डास' असून, रोगाचा प्रचंड प्रमाणात फैलाव करण्याची क्षमता डासांच्या या प्रजातीत असते.

अविकसित देशांतून, दरवर्षी लाखो माणसे, मलेरिया, डेंग्यूताप, पीतज्वर अशा डासांमुळे होणाऱ्या रोगांनी मृत्यूमुखी पडतात.

काही प्रकारचे डास झिका विषाणूंचा फैलाव करतात. सुरुवातीच्या काळात या विषाणूंमुळे किरकोळ ताप, पुरळ एवढाच त्रास होत असल्याचं माहिती होतं. पण आता, झिका व्हायरसचा गर्भातील बाळावर अनिष्ट परिणाम होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. ब्राझीलमध्ये नवजात अर्भकांमध्ये बळावलेल्या मायक्रोसेफली म्हणजेच लघुशीर्षता रोगाचा संबंध, झिका व्हायरसशी जोडला जात आहे.

डासांचा दंश टाळण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या जाळ्या, मच्छरदाण्या वापरण्याचे व इतर अन्य उपाय सुचवून लोकांना सतत जागृत केलं जातं खरं. पण याहीपेक्षा रोगाचा फैलाव करणाऱ्या डासांच्या प्रजातींचा समूळ नायनाट करण्याचा मार्ग अधिक सोपा आहे, असं नाही का वाटत तुम्हाला ?

प्रतिमा मथळा पीत ज्वर
प्रतिमा मथळा मलेरिया
प्रतिमा मथळा डेंग्यू

जीवशास्त्राच्या अभ्यासक 'ऑलिव्हिया जडसन' यांच्या मते, रोग फैलावणाऱ्या डासांच्या 30 प्रजाती नामशेष झाल्यास लाखो लोकांचे जीव वाचतील. तसंच, डास या सजीवाच्या जनुकीय विविधतेत अवघी 1 टक्क्याची घट होईल. या विषयी न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना त्या म्हणाल्या की "आपण डास या प्रजातींच्या निर्मूलनाचाच विचार केला पाहिजे."

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि ऑक्झिटेक या जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेनं, झिका व्हायरस आणि डेंग्यू तापाचे वाहक असलेल्या एडीस इजिप्ती जातीच्या नर डासांमध्ये जनुकीय बदल घडवले. या जनुकीय बदल घडवलेल्या GM नरांतील एक विशिष्ट जनुक, डासांच्या नवीन पिढीची वाढ नीट होऊ देत नाही. असे दुसऱ्या पिढीतले डास पुनरुत्पादनक्षम होण्याआधी आणि रोगवाहक होण्याआधीच मृत्यू पावतात.

Image copyright Getty Images

2009 ते 2010 या कालावधीत, केमॅन आयलंड्स परिसरात अशा प्रकारचे जवळपास 3 दशलक्ष जनुकीय बदल झालेले नर डास सोडण्यात आले होते. याचा परिणाम म्हणजे, ऑक्झिटेकच्या अहवालानुसार बाजूच्या परिसराशी तुलना करता या परिसरात डासांची संख्या 96 टक्क्यांनी कमी झाली. नुकत्याच ब्राझील मधील एका परिसरात केलेल्या अशाच प्रकारच्या पाहणीत, डासांची संख्या 92 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले.

दुसरी बाजू...

पण दुसऱ्या बाजूनं विचार करायचा झाला तर डासांच्या उच्चाटनामुळे काही दुष्परिणाम ही संभवतात का? फ्लोरिडा विद्यापीठातील कीटकविज्ञान अभ्यासक 'फिल लुनिबस' यांच्या मते डासांच्या उच्चाटनानं दुष्परिणामही संभवतात.

'फिल लुनिबस' म्हणतात, वनस्पतीतील रस शोषून गुजराण करणाऱ्या डासांच्या जाती, परागीभवनासाठी महत्वाच्या असतात. पक्षी आणि वटवाघळे यांचे खाद्य असतात, तर या डासांची लार्व्हा रूपातील अंडी, मासे आणि बेडकांचे खाद्य असतात. थोडक्यात, याचा परिणाम अन्नसाखळीच्या खालच्या घटकापर्यंत परिणाम होऊ शकतो.

Image copyright Getty Images

अर्थात, काही अभ्यासकांच्या मते, डासांच्या या प्रजातींच्या गैरहजेरीत, परागीभवन आणि खाद्य पुरवण्याचे काम अन्य प्रकारच्या कीटकांकडून तत्काळ होऊ शकेल. या बाबत जडसन म्हणतात, "दरवेळी एखादी प्रजाती नाश पावली म्हणून, परिसर ओस पडलाय असे कधीच घडत नाही."

तर, फिल लुनिबस यांच्या मते, मुळात दुसऱ्या कीटकानं डासांची जागा घेणं ही बाबच, एक नवीन समस्या ठरू शकते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, "नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ही कीटकांची अदलाबदल तितकीच किंवा जास्तच गंभीर, अनिष्ट बाब ठरू शकते." डासांच्या जागी आलेले हे कीटक कदाचित, आज असलेल्या डासांच्या रोगकारक जातींपेक्षा अधिक जोरकसपणे, जास्त वेगाने, रोग पसरवू शकतील.

विज्ञान विषयातील लेखक डेव्हिड क्वामेन यांनी असा युक्तिवाद केला की, "मानवानं चालवलेल्या पर्यावरण ऱ्हासाला डासांमुळे खीळ बसली आहे. डासांमुळे, उष्णकटिबंधांतील वर्षावनांमध्ये वास्तव्य, माणसासाठी अशक्य होते."

वनस्पती आणि प्राण्याच्या अनेक प्रजातीचं नंदनवन असलेली ही आपली वर्षावनं, मानवानं चालवलेल्या अपरिमित जंगलतोडीची शिकार बनत आहेत. यासंदर्भात क्वामेन म्हणतात, "पर्यावरणाचा होणारा मानवनिर्मित विनाश, रोखण्याचे काम गेल्या 10 हजार वर्षांपासून, 'डास' या कीटकाइतकं कोणीही करू शकलेलं नाही."

एखाद्या विशिष्ट प्रजातीचे उच्चाटन हा फक्त वैद्यानिक मुद्दा नसून तात्विक ही आहे. जिथे मानव प्राणीच इतर अनेक सजीवांसाठी धोकादायक आहे, तिथं मानवानं, स्वतःसाठी धोकादायक असलेल्या एखाद्या सजीवाची प्रजाती समूळ नष्ट करणे, हे मुळीच मान्य होण्यासारखे नाही, असे युक्तिवाद काहीजण करू शकतील.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या, उएहिरो सेंटर फॉर प्रॅक्टिकल एथिक्सचे जॉनथन प्यू म्हणतात, "एखादी प्रजाती समूळ नष्ट करणं हे नैतिकदृष्ट्या ही योग्य नव्हे असा प्रतिवाद असू शकतो."

Image copyright Getty Images

अर्थात हाच युक्तिवाद सर्वच प्रजातींच्या बाबतीत लागू होत नाही, या संदर्भात प्यू म्हणतात, "आपण 'देवी'च्या रोगाला कारण ठरणाऱ्या 'व्हॅरिओला' विषाणूचं समूळ उच्चाटन केलं, ते मात्र आपण आनंदानं स्वीकारलं."

आपण विचार करायला हवा की खरंच डासांकडे काही खास क्षमता असतात का? उदाहरणार्थ, वेदनांचा त्रास जाणवेल अशी क्षमता डासांमध्ये असल्याचं ठळकपणे दिसते का? शास्त्रज्ञांच्या मते आपल्यासारखा, वेदनेला, दुखण्याला भावनिक प्रतिसाद डास देत नाहीत. शिवाय त्यांच्या पासून सुटका करून घेण्यासाठी आपल्याकडे दुसरे कोणते सबळ कारण आहे? एकच ते म्हणजे डास अनेक रोगांचे वाहक आहेत.

झिका, मलेरिया, डेंग्यू या बाबत दक्ष रहायचं म्हणून आणि परिसरातील छोट्याशा टापूतील डासांची संख्या कमी करण्यात यश मिळालं असलं तरी शास्त्रज्ञांच्या मते अख्खी प्रजाती नामशेष करणं निव्वळ अशक्य आहे, तेव्हा या प्रश्नावर चर्चा करणं म्हणजे नुसतंच कल्पनारंजन आहे.

"देअर इज नो सिल्व्हर बुलेट, यावर कोणताच रामबाण उपाय नाही," हॉक्स म्हणतात, ते पुढे असेही म्हणतात, "GM नर डास, परिसराच्या छोट्याशा तुकड्यात सोडण्याचा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाला असला तरी त्या छोट्याशा भूभागासाठी लाखो GM नर डास सोडावे लागतील."

"आकारानं मोठ्या परिसरात, प्रत्येक मादी डासाचे, जनुकीय बदल घडवलेल्या डासांबरोबरच मिलन होणे, ही खूप कठीण गोष्ट आहे, त्यापेक्षा आपण या उपायाची, दुसऱ्या तंत्रांशी सांगड घालायला हवी."

डासांच्या हल्ल्याशी दोन हात करण्यासाठी, जगभर नावीन्यपूर्ण उपायांचा वापर होताना दिसतो. लंडनच्या क्यू गार्डन्स मधील शास्त्रज्ञ, एक सेन्सर विकसित करत आहेत, हा सेन्सर, जवळ आलेल्या डासांच्या पंखांच्या आवाजावरून, तो कोणत्या जातीचा डास आहे ते सांगू शकेल. या शास्त्रज्ञांनी इंडोनेशियाच्या ग्रामीण भागातील खेडुतांना अंगात घालता येतील असे ध्वनी शोधक देण्याचे योजले आहे, जेणेकरून, जवळ येणारे रोगवाहक डास शोधणे शक्य होईल आणि यामुळे भविष्यातील रोगाचा फैलाव रोखणे शक्य होईल.

तर लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन मधील शास्त्रज्ञांनी, मादी डास कोणत्या विशिष्ट प्रकारच्या शरीर गंधाकडे आकृष्ट होतात याचा अभ्यास केला आहे. अर्थातच या निष्कर्षांचा उपयोग करून, डासांना पळवून लावणारं प्रभावी औषधी द्रव्यं बनवता येण्याची शक्यता वाढली आहे.

आणखी एक आशादायी मार्ग म्हणजे रोगांच्या परजीवींना प्रतिरोध करण्याची क्षमता डासांमध्ये निर्माण करणे. ऑस्ट्रेलियात 'एलिमिनेट डेंग्यू' मोहिमेअंतर्गत, एका जीवाणूचा नैसर्गिकरीत्या वापर करून डासांची डेंग्यू रोगाचा फैलाव करण्याची क्षमता कमी केली गेली.

लुनिबस यांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे, "डासांमुळे उद्भवणाऱ्या रोगांचा सामना करण्याचा हा अधिक वास्तववादी दृष्टिकोन आहे."

दरम्यानच्या काळात अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी, मलेरिया रोगाच्या परजीवींना प्रतिरोध करणाऱ्या GM डासाची एका नवीन जनुकासह, प्रयोगशाळेत पैदास केली आहे.

एकंदरीत वेगवेगळ्या खेळी खेळून, माणूस डासांना उत्क्रांत होण्यासाठी भाग पाडत आहे. आशा इतकीच आहे की येत्या दहा पंधरा वर्षात मनुष्यप्राणी डासांच्या वरचढ ठरेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)