आपण कपडे का घालतो?

लाइफस्टाइल,
प्रतिमा मथळा कपड्यांचा सोस कशाला?

स्टीफन गाफ या गृहस्थाला उघडं फिरायला आवडतं, इतकं की अशा नग्न फिरण्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली तरी स्वारी काही मागे हटायला तयार नाही! सार्वजनिक ठिकाणी वावरताना लोकांसमोर जादा अंगप्रदर्शन केल्याच्या आरोपावरून त्याला अनेकदा तुरूंगात टाकण्यात आलं आहे.

एकूण मोजली तर आतापर्यंतची स्टीफनच्या आयुष्यातली थोडीथोडकी नव्हे तर जवळपास 10 वर्षे तुरुंगात खितपत पडण्यात गेली. थोडक्यात काय नग्न राहण्याच्या त्याच्या हट्टापायी त्याला स्वातंत्र्य गमावण्याची वेळ आली.

स्टीफन गाफ ऊर्फ 'नग्न भटक्या'. हो, त्याला जग आता याच नावाने ओळखते. तापमानाचा पारा चढला की हा स्टीफन गाफ नग्नावस्थेत फिरण्याचा पर्याय निवडतो. त्याची ही निवड वैयक्तिक असली आणि असं फिरण्यानं लोकांना काहीच धोका नसला तरी 2003 साली गाफ महाशयांनी कहरच केला. जॉन ओ ग्रोट्स् या ठिकाणापासून ते लँड्स एंड या लंडनच्या दुसऱ्या बाजूचं टोक समजल्या जाणाऱ्या मार्गावरून त्यानं नग्नावस्थेत फेरफटका मारला. त्यावेळी मात्र संपूर्ण लंडनमध्ये त्याच्या या कृतीविरोधात पडसाद उमटले.

त्यानंतर आणखी एकदा त्यानं असं मार्गक्रमण करण्याचा निर्धार केला तेव्हा तडकाफडकी त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. तुरुंगातही त्यानं कपडे घालण्यास नकार दिल्यानं त्याला तेथेही एकांतवासात ठेवण्याची व्यवस्था केली गेली.

असं असलं या मुद्दयावर वाद घालणं व्यर्थच कारण आपण सगळेच कपड्यांशिवाय, दिंगबरावस्थेत जन्माला आलो. गाफ जसं राहणं पसंत करतो त्याच स्वरुपात. पण फरक हा आहे की आपल्यातले बहुतेकजण सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपलं शरीर झाकणं पसंत करतो.

त्याला काही चांगली कारणंही आहेत : कडाक्याच्या थंडीच्या काळात कोणतेही अधिकचे उबदार कपडे नसतील तर हाडे गोठली जाऊन आपण मृत्युमुखीही पडू शकतो तर कडक उन्हाच्या काळात सूर्यकिरणं थेट शरीरावर पडण्यापासून कपड्यांमुळेच आपलं संरक्षण होतं. तरीही काही शिकार करणाऱ्या जमाती नग्नावस्थेतच राहणं पसंत करतात, म्हणजेच कपडे परिधान करणं जगण्यासाठी अत्यावश्यक आहे, कपडे घालणं ही मूलभूत गरज आहे, असं म्हणता येणार नाही.

मग जर नग्न राहणं इतकं नैसर्गिक असेल तर कपडे घालण्याविषयी आपला इतका अट्टाहास का? कपडे घालण्याच्या पर्यायाचे रुपांतर सवयीत केव्हापासून झालं असेल आणि मुख्य म्हणजे का? या मूलभूत प्रश्नांचा वेध.

Image copyright Entressan/SPL
प्रतिमा मथळा कपडं घालणं ही माणसाची गरज झाली.

वस्त्र हा विघटनशील घटक. म्हणून कपड्यांचे अवशेष वगैरे सापडणे दुरापास्तच. त्यामुळे आपल्या पूर्वजांपासूनचे होमिनीन काळातले- काही थेट अवशेष आपल्याला पुरावे म्हणून उपलब्ध होण्याची शक्यता शून्य. अर्थात आपल्या पूर्वजांनी नग्नपणे फिरण्याऐवजी आपल्या शरीराभोवती प्राण्यांचे चामडे वा प्राण्यांचे केसाळ कातडे गुंडाळायला सुरूवात केली असे दाखले मिळाले आहेत.

उवांवरून वस्त्रांचा शोध...

मात्र वस्त्रांचा नेमका वापर कधीपासून सुरू झाला, याचा शोध घेण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ बहुतांशीवेळा अप्रत्यक्ष पद्धतीचाच आधार घेतात. 2011 साली उवांवरील झालेल्या एका अभ्यासानुसार, 1 लाख 70 हजार वर्षांपूर्वीच हा कपड्यांचा सिलसिला सुरू झाल्याचं समोर आलं आहे. या संशोधनात असं आढळून आलं की याच काळात डोक्यावरील केसांत राहणाऱ्या उवा आणि कपड्यांमध्ये लपणाऱ्या उवा या वेगवेगळ्या झाल्या. थोडक्यात काय, तर मनुष्यजातीनं कपडे घालण्यास सुरूवात केल्यानं काही उवा कपड्यांमध्ये राहू लागल्या आणि पुढे जनुकीय बदल होत त्यातून एका स्वतंत्र प्रजातीचा जन्म झाला.

यावेळी मनुष्यांचे पूर्वज, होमो सेपियन्स आफ्रिकेतील जमिनीवर आपल्या पायांवर उभे राहून चालायला शिकले होते. त्यांच्या शरीरावर आता फार केस उरले नव्हते. त्यांच्या आधीचे होमो वर्गातील पूर्वज म्हणजे होमो इरेक्टस वा होमो हेबिलिस वगैरे यांच्या शरीरावर दाट केसांचा थर होता. या केसांमुळे त्यांना रात्रीच्यावेळी ऊब मिळत असावी तसेच दिवसाही प्रखर सूर्यकिरणांपासून त्यांचं रक्षण होत असावे.

केसांच्या या दाट थराचा उत्क्रांतीच्या टप्प्यात ऱ्हास झाल्याची भरपाई म्हणूनच मनुष्यप्राण्यानं वस्त्रांचा वापर सुरू केला असावा, अशी शक्यता असल्याचे ऑस्ट्रेलियातल्या सिडनी विद्यापीठातील आयेन गिलीगान म्हणतात.

मात्र सध्याच्या आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या काळातील, दक्षिण सुदानमधील न्यूएर जमातीप्रमाणे अनेक शिकारी जमाती कमीत कमी कपडे घालण्याच्या पर्यायाची निवड करतात. म्हणजे फक्त संरक्षण हा काही कपडे घालण्याची सवय करून घेण्यामागचा एकमेव हेतु नसावा. माणसांमध्ये साधे, नम्र राहावे अशी भावना जागृत झाली असावी. शरीर झाकणे पटले असावे, अशी शक्यता आहे. मात्र ही धारणा खरी असल्याचे थेट पुरावे शोधणे कठीण आहे.

दक्षिण अमेरिकेतील फ्युजी लोकांप्रमाणे शिकार करणाऱ्या अन्य काही जमाती, बरेचदा नग्नावस्थेतही फिरताना दिसल्या आहेत. तरी अनेकदा काही साधी वस्त्रे परिधान केलेल्या वेषातही त्या आढळल्या आहेत. ऐतिहासिक दस्तावेजांमधून ही माहिती समोर आली आहे. कदाचित प्राचीन मनुष्यप्राणी थंड वातावरणात कपडे घालत असावेत, अशी शक्यता आहे.

आफ्रिकेच्या बाहेर मात्र, थंडीपासून बचाव करण्यासाठी मुख्यत्वे कपडे घातले गेले असण्याचे अनेक पुरावे सहज मिळतात. मनुष्याचे आणखी एक पूर्वज, निएंडरथल, यांनी अधिक थंड हवामानात मोठा प्रदेश पायदळी तुडवला होता, त्यामुऴे त्यांना नक्कीच थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीर झाकण्याची गरज पडली असेल.

Image copyright SPL
प्रतिमा मथळा निअँडरथल मानवाने थंडीपासून बचाव करण्यासाठी कपड्यांचा आधार घेतला.

आधुनिक मनुष्याचा जन्म होण्यापूर्वी अनेक वर्षे आधी निएंडरथलचे अस्तित्व युरोप खंडात होते. एकाच आदिमानवापासून आपल्या दोहोंची व्युत्पत्ती झाली असावी असं म्हटलं जातं, बहुदा होमो हेईडेलबरजेन्सीस यांच्यापासूनच. मग जर निएंडरथल प्रजातीने कपडे घातल्याचे दिसून येते तर कपड्यांचा शोध एकूण दोन वेळा लागला आणि आपल्या आधी तो निएंडरथल प्रजातीने लावला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

निएंडरथल आणि आधुनिक माणसांच्या भिन्न तऱ्हा

मात्र या उत्क्रांतीच्या टप्प्यातील दोन होमो पूर्वजांनी कपडे घातले असले तरी कपडे घालण्यामागचा त्यांचा उद्देश वेगवेगळा होता. डेन्मार्कच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील संशोधक नाथन वेल्व्ज म्हणतात, "निएंडरथल आणि आधुनिक मनुष्य यांच्यात वस्त्रे परिधान करण्याच्या हेतूमध्ये आमुलाग्र फरक होता."

निएंडरथल मानव आपल्या अधिवासात राहताना, थंडीच्या कालावधीत आपल्या शरीराचा 70 ते 80 टक्के भाग झाकून घेत असावेत, असा अंदाज 2012 साली प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात वेल्स यांनी केला आहे. हा अंदाज व्यक्त करण्यासाठी वेल्स यांनी आधुनिक शिकार करणाऱ्या जमाती विविध हवामानाच्या काळात काय परिधान करतात याचा अभ्यास केला. इतिहासातल्या वातावरणाऱ्या स्थितींचा संदर्भ विचारात घेऊन त्याच्याशी या पाहणीची तुलना करून त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.

"मात्र आधुनिक मनुष्याला थंडीपासून बचाव करण्यासाठी निएंडरथलपेक्षा अधिक प्रमाणात शरीर झाकून घ्यावे लागते, ते म्हणजे 90 टक्क्यांपर्यंत," असा दावाही वेल्स करतात. याचाच अर्थ ते अधिक स्पष्ट करून सांगतात, निएंडरथल माणसांना घट्ट-मापशीर कपडे परिधान करण्याची गरज नव्हती, कारण शरीर पूर्णपणे झाकून घ्यायचे हा त्यांचा हेतूच नव्हता.

कुठल्या प्रकारचे कपडे निएंडरथल माणसांनी घातले असतील याची फार पुसटशी कल्पना आपल्याला आहे.

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा कपडे आपल्या संस्कृतीचा प्रतीकात्मक भाग आहे

ऑगस्ट 2016 मध्ये निएंडरस्थल मानवाच्या कपड्यांविषयी अंदाज व्यक्त करणारे एक संशोधन प्रसिद्ध झाले. त्यात असा दावा करण्यात आला की निएंडरस्थल शरीराभोवती फक्त पशूंचे कातडे लपेटून घेत असत. साधारणपणे कुणीही एक निएंडरथल, कदाचित एकाच पशूचे कातडे त्याच्या शरीराभोवती संरक्षणासाठी एखाद्या कोट वा गाऊनप्रमाणे लपेटून घेत असावेत असा तर्क संशोधकांनी अभ्यासांअंती काढला. दरम्यान, आधुनिक मनुष्यनिर्मित कपडे अधिक गुंतागुंतीचे असतात, बरेचसे तुकडे एकमेकांना जोडून त्याची शिलाई करून त्यांच्या अंतिम रुपात ते प्रकटतात.

वर उल्लेख केलेला अभ्यास मांडणारे मुख्य लेखक मार्क कोलार्ड हे कॅनडाच्या बर्नाबे येथील सिमॉन फ्रेसर विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ते म्हणतात की, आधुनिक मनुष्यप्राणीही अशा प्राण्यांशी शिकार करण्याला प्राधान्य देतात ज्या प्राण्यांमुळे त्यांना जाड आणि आरामदायी कातडे मिळू शकेल. वोल्वरीन या सस्तन केसाळ प्राण्याचे उदाहरण यासाठी देता येईल. त्यांची शिकार प्रामुख्याने केली जाते. आधुनिक गरम कपड्यांच्या मानेलगतच्या कॉलरसाठी वा बाहीच्या टोकाला या केसाळ कातड्याची मदत घेतली की ही निवड सार्थकी लागते.

केसाळ प्राण्यांच्या कातडीला पर्याय नाही...

अगदी आजच्या काळातही, इनयुट जमातीच्या शिकारी जमातींकडून वोल्वरीन प्राण्याच्या शिकारीला प्राधान्य दिले जाते, असे कोलार्ड म्हणतात. "प्रचंड टोकाचे तापमान असतानाही, हमखास बचाव होऊ शकेल असा पर्याय शोधणे हा खरे तर मुख्य हेतु आहे. म्हणूनच केसाळ प्राण्यांच्या कातड्याला पर्याय नाही. प्राण्यांच्या साध्या कातड्यापेक्षा ते थंडीत लवकर खराबही होत नाही. लष्कराच्या थंडीतील पोशाखापेक्षाही ते अधिक उबदार असते," असा दावाही कोलार्ड करतात.

यावरून असं लक्षात येतं की, आधुनिक मनुष्यजाती निएंडरथल माणसापेक्षा भिन्न पद्धतीचं वर्तन करतात, असं वेल्स म्हणतात. "नवीन तंत्रज्ञानाने माणसाला खरोखरीच मदतीचा हात दिला आहे. आपण त्वरीत नवीन अधिवासात जाऊ शकतो. म्हणूनच थंड हवामानासारख्या एखाद्या नैसर्गिक परिस्थितीशी, जुळवून घेण्याची क्षमता विकसित करण्यापेक्षा आपण अनुकूल अशा कपड्याची निर्मिती केली आणि प्रश्न सोडवला."

कमी उंचीचे मात्र बांधेसुद शरीराच्या निएंडरथल माणसानं खरंतर युरोपच्या थंड वातावरणाशी आधुनिक माणसापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेतलं होतं असं म्हणावं लागेल. आपल्यापेक्षाही खूप आधी ते युरोपमध्ये आले होते. आधुनिक मनुष्यजातींचा बहुतांशी भूतकाळ हा उष्ण कटिबंधातील प्रदेशात, तेथील उष्ण वातावरणातच गेला आहे.

विरोधाभास म्हणजे, थंड प्रदेशासह जुळवून घेण्याची त्यांची ही क्षमताच त्यांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरली.

हे विधान थोडं विसंगत वाटतं, काहीअंशी ते तसे आहेसुद्धा.

Image copyright NARINDER NANU/Getty Images
प्रतिमा मथळा कपडे

आधुनिक माणसाची त्वचा तुलनेनं पातळ आहे, त्यामुळे थंडीची बाधा आपल्याला खूप लवकर होण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम म्हणून आपल्या पूर्वजांना काही अतिरिक्त तांत्रिक सुधारणांचा शोध घ्यावा लागला. उदाहरणार्थ, "थंडीचा सामना करण्याची नैसर्गिक क्षमता नसल्यानं आपण अधिक गरम कपड्यांचा शोध लावुन ती कमी भरून काढली. यामुळे 30 हजार वर्षांपूर्वीसुद्धा, वातावरण प्रमाणापेक्षा थंड झाले तरी आपला निभाव लागू शकला," असं गिलिगन म्हणतात.

पुरातत्व खात्याकडील पुरावे हे स्पष्ट करतात की तत्कालीन माणसाला कपडे बनवण्यासाठीचे पुरेसे प्रगत तंत्रज्ञान अवगत होते. कपडे कापण्यासाठी लागणारी वैशिष्ट्यपूर्ण कात्री आणि पुढे सुईसारख्या बाबींचा शोध आपण आधीच लावलेला होता. त्यामुळे प्राण्यांचे चामडे आयत, चौकोन अशा आकारांमध्ये कापून, त्यानंतर त्यांची जोडणी करण्याच्या कामी त्यांची चांगली मदत झाली होती.

निएंडरथलना हिमयुगाचा सामना करता आला नाही...

तर दुसरीकडे निएंडरथल मनुष्याकडे फक्त साधी, अविकसित अवजारे/हत्यारे होती. 2007 साली गिलिगन यांनी एका अभ्यासाअंती असा दावा केला की यामुळेच निएंडरथल यांचा ऱ्हास झाला असावा. पुरेशी प्रगत साधने नसल्यामुळे कमी दर्जाची वस्त्रे त्यांच्याकडे असावीत. त्यांच्या मदतीने शेवटच्या हिमयुगातील सर्वाधिक थंड हवामानाचा सामना त्यांना करता आला नसावा.

गिलीगन पुढे म्हणतात, "हिमयुगातील थंड हवामानाचा सामना करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असावा, मात्र उच्च प्रतीच्या वस्त्राच्या निर्मितीचे तंत्रज्ञान त्यांच्याकडे नसल्यामुळेच त्यांचा निभाव लागला नसावा आणि ते नामशेष झाले असावेत. तर आधुनिक माणसाने वस्त्रनिर्मितीसाठी लागणारे गुंतागुंतीचे प्रगत तंत्रज्ञान आफ्रिकेत असताना सुरूवातीच्या काळातच विकसित केले होते."

आधुनिक माणसाकडे अत्याधुनिक साधने आणि वस्त्रे असली तरी वरील माहितीवरून निएंडरथल टप्प्यावरील माणसाचा पाया कच्चा होता असे म्हणता येणार नाही. आपल्यापेक्षा ते कमी अत्याधुनिक होते असाही दावा फोलच ठरेल. फक्त त्यांना तोपर्यंत पूर्ण शरीर झाकणाऱ्या कपड्यांची गरज पडली नसावी आणि जेव्हा अशी गरज पडली, त्यासाठीचे तंत्रज्ञान त्यांच्याकडे नव्हते, असे म्हणावे लागेल .

उलट प्राण्यांच्या चामड्यापासून वस्त्रसदृश काही बनवण्याचा मुद्दा आला, तेव्हा आधुनिक माणसाने निएंडरथलकडूनच एक-दोन बाबी आत्मसात केल्या असल्याचे दिसते.

Image copyright Chris Jackson/Getty Images
प्रतिमा मथळा कपड्यांचे दुकान

2013 साली, नेदरलँडस् मधील लेडेन विद्यापीठातील मारी सोरेसी यांच्या नेतृत्वाखालील चमूनं काही निरीक्षणं सादर केली. हाडांपासून आपली अवजारं, हत्यारं घडवणारे निएंडरथल पहिले होते. त्यांनी 40 ते 60 हजार वर्षांपूर्वी ही कला अवगत केली होती. त्याआधी दगडातून अवजारे साकारली जात होती.

हरणांच्या बरगड्यांचे तुकडे या हत्यारांसाठी वापरले जायचे. प्राण्यांची चामडी मऊ करण्यासाठी त्यांचा वापर केला जात असे, चामडी मऊ केल्यानंतर त्याचा वापर बहुदा कपडे बनवण्यासाठीच होत असावा.

निएंडरथल नामशेष झाल्यानंतर होमो सेपियन्स मानवाच्या अधिवासाच्या ठिकाणी याच प्रकारची अवजारे सापडली होती.

"या प्रकारची हाडांपासून बनलेली अवजारे ही पुरापाषाणयुगातील पुराव्यांमध्ये सहज सापडतात. म्हणजे निएंडरथल नामशेष झाल्यानंतर आधुनिक मानवाचा वावर असलेल्या सर्वच ठिकाणी या प्रकारची अवजारे आढळून येतात. म्हणूनच माझ्या दृष्टीने निएंडरथलकडून आधुनिक मानवापर्यंत जर काही हस्तांतरीत झाले असेल तर त्याचा पहिला भरभक्कम पुरावा म्हणजे ही हत्यारं," असं सोरेसी म्हणतात.

Image copyright Pascal Le Segretain/Getty Images
प्रतिमा मथळा कपडे फॅशन स्टेटमेंट झालं आहे.

थंडीचा सामना करण्यासाठी निएंडरथल मानव ज्या उपायांचा वापर करत असे ते उपाय, युक्त्या आधुनिक मानवाला अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. त्याकाळी इतर साधनांसह हाडांच्या या अवजारांचा वापर करून अधिक चांगले कपडे बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले होते, हे विसरून चालणार नाही.

30 हजार वर्षांपूर्वीचे कपडे आधुनिकच...

हे जर खरं असेल तर असा प्रश्न उपस्थित होतो की आधुनिक मानवाचे अद्ययावत तंत्रज्ञान निएंडरथल मानवाने का कॉपी केले नाही? आधुनिक मानवाला निएंडरथलच्या काळातील अवजारे, हत्यारे त्यांच्या आसपास आढळून आली. त्यांचा थेट सामना होऊ शकला नसल्यानं एक दुवा निखळला होता.

त्याच्या थोडं अलिकडच्या काळात, कदाचित 30 हजार वर्षांपूर्वी अश्मयुगीन काळातील मानवाचे कपडे तत्कालीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं बनवलेले असल्यानं अद्ययावतच होते असे म्हणावे लागेल.

संशोधकांना जॉर्जियातील प्राचीन झुडझुआना गुहेत केलेल्या संशोधनात, जिथं आदिमानव राहिले असतील त्या ठिकाणी जवसवर्गीय तंतुमय पदार्थांचे तंतू आढळले होते. याचा वापर कदाचित विविधरंगी ताग्याचं कापड हे लोक कपडे तयार करण्यासाठी वापरत असावेत अशी शक्यता आहे.

थोडक्यात फक्त उपयुक्ततेच्या पलीकडेही कपड्यांचा आणखी काही हेतू असावा असं यातून सूचित होते. सजावट वा शोभा वाढावी हाही हेतु यातून साध्य होत असावा. स्पष्टपण सांगायचे तर कपडे प्रतिकात्मक बनल्याचीच ही पावती होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा साडी

गिलिगन यांनी याबाबत एक महत्त्वाचे निरीक्षण मांडून ठेवले आहे. ते म्हणतात, कपड्यांचा शोध लागण्याच्या कित्येक वर्षे आधीपासून मनुष्यप्राणी स्वतःला सुशोभित करत आला आहे. " जर तत्कालीन शिकार करणाऱ्या जमातींचा अधिक अभ्यास केला तर असे लक्षात येईल की ते कपडे घालत नसले तरी अत्यंत सुरेख पद्धतीने शरीर रंगवण्याची कला ते जोपासत होते. सुबक नक्षी काढून स्वतःला सुशोभित करण्यासाठी कपड्यांची काय गरज?"

निएंडरथलसुद्धा स्वतःला लाल रंगाच्या गेरुच्या साहाय्याने रंगवायचे असे पुरावे मिळाले आहेत. 2 लाख वर्षांपूर्वीच्या सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या पुराव्यांच्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अर्थात हा रंग प्राण्यांची चामडी रंगवण्यासाठी, गुहेत चित्रे काढण्यासारख्या कलात्मक आविष्कारासाठी किंवा मृत पशू-मनुष्याला पुरण्याच्या विधींचा एक भाग म्हणून वापरले गेले असावेत अशीही शक्यता आहे.

शिकार करणाऱ्या जमाती कपडे घालत नसत

अतिथंडीच्या काळात रंगरंगोटी केलेले शरीर प्रदर्शित करताना मानवाला अडचड आली असावी, शरीर झाकून त्यांना भाग पडले असावे. "म्हणून हा सुशोभनाचा हेतू कपड्यांमध्ये हस्तांतरीत झाला असावा," असे मत गिलिगन मांडतात. "आणि हा हेतू अस्तित्त्वात आल्यापासून वातावरणातील बदलांचा सामना करण्याच्या मुख्य गरजेसह, या सामाजिक उद्देशांसाठीही माणसाला कपड्यांची गरज पडली असावी."

कदाचित या निकषावरून अनेकांच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग म्हणून त्यांचे कपडे कशी भूमिका पार पाडतात याचे स्पष्टीकरण मिळू शकेल. याच धर्तीवर अनेक शिकार करणाऱ्या जमाती कपडे परिधान करत नसल्याने त्यांच्या नेमकी ओळख विषद करणे अवघड होऊन जाते. अर्थात त्या 'नग्न भटक्या' च्या बाबतीतही असेच म्हणता येईल.

म्हणूनच कपड्यांच्या संदर्भातील वास्तव तुम्ही कल्पना केली नसेल एवढे गुंतागुंतीचे आहे. त्यांच्याशिवाय आपण कदाचित जिवंत नसतो. पण आज आपण विविध प्रकारच्या वेषभूषा करतो त्या फक्त ऊबदार राहण्यासाठी नाही, तर त्याहीपेक्षा मोठा उद्देश या वस्त्रपरिधानामागे आहे.

आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपल्या सामाजिक संकेतांचा एक अविभाज्य भाग म्हणजे आपले कपडे असतात. या कपड्यांमुळेच आपण इतर प्रजातींपेक्षा, निसर्गापेक्षा वेगळे ठरतो, असे गिलीगन म्हणतात. आणखी काय तर... एखाद्या सामाजिक वा राजकीय गटाचे प्रतिनिधी असल्याचे संकेतही आपल्या विशिष्ट कपड्यांद्वारे अगदी अचूक मिळतात आणि या कपड्यांमुळेच आपण या माणसांच्या भाऊगर्दीत इतरांपेक्षा वेगळे उठून दिसतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)