उत्तर कोरियाच्या किम जाँग उन यांनी अमेरिकेबरोबर चर्चेसाठी सिंगापूरच का निवडलं?

  • करिश्मा वासवानी
  • एशिया बिझिनेस करस्पाँडंट

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांची भेट थोड्याच वेळात होणार आहे. भेटीसाठी सिंगापूर हे ठिकाण निवडण्यात आलं आहे.

कोरिया देशांमधला लष्कर विरहित भाग(DMZ), मंगोलिया आणि बीजिंग ही नावंही सुरुवातीला चर्चेत होती.

उत्तर कोरिया आणि चीन यांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर व्यापारी देवाणघेवाण होते. त्यामुळे अमेरिकेनं बीजिंगच्या नावाला काट मारली. उत्तर कोरियाशी बोलणी करण्यासाठी चीनची मध्यस्थी नको अशीच त्यांची भूमिका होती.

पण मग सिंगापूर का? तिथलं सुंदर विमानतळ आणि छान बागा हे तर कारण असू शकत नाही. मग नेमकं कारण काय?

उत्तर कोरियासाठी सिंगापूर जवळचं

उत्तर कोरियाचे निवडक देशांशी व्यापारी संबंध आहेत. त्यात सिंगापूर वरच्या क्रमांकावर आहे. 2016मध्ये उत्तर कोरियाच्या व्यापारात सिंगापूरचा क्रमांक आठवा होता.

टक्केवारीत सांगायचं तर उत्तर कोरियाच्या एकूण परदेशी व्यापारापैकी 0.2% व्यवहार त्यांनी सिंगापूरशी केला.

गेल्यावर्षी अगदी शेवटपर्यंत सिंगापूर आणि उत्तर कोरिया यांच्या दरम्यानचा व्यापार सुरूच होता. नंतर दोन देशांमधली 'व्हिसा ऑन अरायव्हल' पद्धत बंद झाली.

सिंगापूरमध्ये आजही उत्तर कोरियाचा दूतावास आहे, अगदी संयुक्त राष्ट्रांचा विरोध असताना, सिंगापूरमधल्या दोन कंपन्या आजही उत्तर कोरियाबरोबर व्यापारी संबध ठेवून आहेत.

मी गेल्यावर्षी त्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. दोन्ही कंपन्यांनी ही बातमी नाकारली.

वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्रानं 2016मध्ये एक बातमी दिली होती. त्यानुसार, प्याँगयाँग आणि सिंगापूर अशी दुहेरी वाहतूक करणारी व्यापारी जहाजं सिंगापूरमधून कुठल्याही तपासणी शिवाय पार होतात.

हे सगळं आहेच. पण, किम जाँग उन यांनी सिंगापूर ठिकाण निवडण्यामागे आणखी काही कारणं आहेत. त्यांना सिंगापूर अतिशय जवळचं वाटतं.

गुप्तचर यंत्रणेतल्या काही लोकांनी मला अशीही माहिती पुरवली की, किम जाँग उन यांना इथं सुरक्षित वाटतं. त्यांची सिंगापूर बँकेत खाती होती. आणि वैद्यकीय चाचण्यांसाठीही ते सिंगापूरमध्ये येऊन गेले आहेत.

फोटो कॅप्शन,

किम जाँग उन यांना सिंगापूर जवळचं वाटतं. वैद्यकीय उपचारांसाठी ते इथं येतात.

'उत्तर कोरिया आणि सिंगापूर यांच्यामध्ये आर्थिक आणि राजनैतिक संबंध चांगले आहेत.' जॉन हॉपकिन्स विद्यापीठातले शिक्षक मायकेल मॅडन यांनी मला सांगितलं.

सिंगापूरच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातल्या माझ्या सूत्रांशी या विषयावर मी अनेकदा बोलले आहे. उत्तर कोरियाबरोबर व्यापार शक्य व्हावा यासाठी कुठल्याही संस्था किंवा कंपनीला मदत करायची नाही अशा सूचना सिंगापूर प्रशासनानं केल्या आहेत.

सिंगापूर तटस्थ प्रदेश

या आर्थिक कारणांव्यतिरिक्त इतरही कारणं समोर येत आहेत.

"किम जाँग उन यांना सिंगापूर जवळचं वाटण्याचं आणखी एक कारण आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाच्या रोम करारावर सिंगापूरनं सही केलेली नाही. त्यामुळे किम जाँग उन इथं असताना त्यांच्यावर मानवाधिकार उल्लंघनाचा कुठलाही खटला चालू शकत नाही," द डिप्लोमॅट वृत्तपत्राचे अंकित पांडा यांनी मला सांगितलं.

फोटो कॅप्शन,

बऱ्याच आंतरराष्ट्रीय राजनैतिक भेटीगाठी या हॉटेलमध्ये होत असतात.

शिवाय सिंगापूरमध्ये ट्रंप किंवा किम जाँग उन - दोघांविरोधात निदर्शनं होण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण सिंगापूर हा एकच राजकीय पक्ष असलेला पक्ष आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय इथं सभा घेता येत नाहीत.

सिंगापूरला एक ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे. 2015मध्ये चीन आणि तैवान दरम्यानची हाय प्रोफाईल बैठकही इथंच पार पडली होती.

अमेरिका आणि चीन दोघांचं दोस्त राष्ट्र

सध्याच्या वातावरणात भूराजकीय संबंधांबाबत भूमिका घेणं सोपं नाही. एकीकडे अमेरिकन अध्यक्षांना तोंड द्यायचं, तर दुसरीकडे चीनच्या वाढत्या प्रभावाचा अंदाज घेत चालायचं.

पण, सिंगापूरनं काही अपवाद सोडले तर या बाबतीत चांगली कामगिरी केली आहे.

"ट्रंप यांच्या काळात भूराजकीय संबंध जटील आहेत हे नक्कीच. पण, सिंगापूरची अमेरिका-उत्तर कोरिया भेटीसाठी निवड झाली याचाच अर्थ अमेरिका, चीन आणि उत्तर कोरिया यासारख्या सत्ताकेंद्रांमध्ये पूल बांधण्याचं काम सिंगापूर करत आहे असा होतो," सिंगापूरमधले एक वेल्थ मॅनेजर धीरज भरवानी यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं.

फोटो कॅप्शन,

सिंगापूरचे पंतप्रधान आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली तो क्षण.

सिंगापूरची कुशल राणनीती हे एक कारण आहेच. शिवाय सिंगापूर हा देश असियान देशांची बँक म्हणून ओळखला जातो. यात मला अभिप्रेत असलेला अर्थ असा की, सिंगापूरमध्ये येऊन धंदा-व्यापार करणं इतर देशातल्या लोकांसाठी सोपं आहे. सिंगापूरमधल्या कायद्यांचं पालन केलं की इतर प्रश्न तुम्हाला विचारले जात नाहीत.

यापूर्वीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या काळात म्हणजे ओबामा आणि क्लिंटन यांच्या काळात व्हाईट हाऊसनं प्याँगयाँग बरोबरचे संबंध तोडावेत यासाठी सिंगापूरवर दबाव आणला होता.

पण, सध्या अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांबरोबर असलेल्या जवळच्या संबंधांमुळे या भेटीसाठी सिंगापूरची निवड झाली आहे.

सिंगापूर हे आशियातलं व्यापारी केंद्र आहे. या भागातले जास्तीत जास्त व्यापारी करार इथंच घडून येत आहेत.

तेव्हा उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातल्या या बैठकीकडेही फक्त राजकीय बैठक म्हणून बघू नका. त्याच्याकडे व्यापारी वाटाघाटी म्हणून बघा. अशी घडामोड ज्यात राजकीय पटलावरील जगातले दोन सबळ व्यापारी देश एकमेकांशी करार करणार आहेत, आणि सिंगापूर या करारात मध्यस्थ आणि लक्षवेधी यजमानाची भूमिका निभावत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)