मार्क झुकरबर्ग: फेसबुकचे संस्थापक रोज एकसारखेच कपडे का घालतात?

  • गुलशनकुमार वनकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
'F8' फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये बोलताना मार्क झुकरबर्ग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

'F8' फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये बोलताना मार्क झुकरबर्ग

फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा आज 36वा वाढदिवस. ज्यांच्यामुळे आज आपण घरांमध्ये बसूनही एकमेकांशी बऱ्यापैकी कनेक्टेड आहोत, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर वेळ घालवतोय, ते मार्क नेमके कसे आहेत?

ब्लूमबर्ग बिलिनेअर्स इंडेक्सनुसार मार्क सध्या जगातली तिसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांच्याकडे सध्या 78.2 अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती आहे. तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

आता एवढा पैसा म्हटलं की झुकरबर्ग यांनी ठरवलं तर ते रोज नवे कपडे घालू शकतील. पण ते रोज एकसारखेच कपडे घालतात - करडा टी-शर्ट आणि निळी जीन्स!

असं का?

2014 साली एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले होते, "मला माझ्या आयुष्यात स्पष्टपणा आवडतो. म्हणजे मला कमीत कमी निर्णय घेण्याची गरज पडली पाहिजे. जेणेकरून मी समाजाला अधिक सक्षमपणे सेवा देऊ शकतो."

पुढे ते म्हणाले, "मला खरंच भारी वाटतं की मी रोज सकाळी उठून अब्जावधी लोकांसाठी काम करू शकतो. आणि कपडे निवडण्यासारख्या क्षुल्लक गोष्टींवर वेळ वाया घालवला तर मी माझं काम नीट करू शकेन का?"

2004 साली मार्कनी कॉलेजच्या हॉस्टेलमधून फेसबुक सुरू केलं. एका मोठ्या रिसॉर्टसारख्या जागेत त्यांनी फेसबुकला लहानाचं मोठं केलं. आणि यादरम्यान ते क्वचितच इतर कुठल्याही कपड्यांत दिसले.

गेल्या वर्षभरातली त्यांची टाईमलाईन पाहिली, तर असे तीनच प्रसंग लक्षात येतात जेव्हा त्यांनी ग्रे टी-शर्ट नव्हता घातला. हो, खरंच! फक्त तीनच वेळा.

•मे 2017 - जेव्हा ते त्यांच्या पूर्वीच्या कॉलेजमध्ये, हार्वर्ड विद्यापीठात आपली मानद डिग्री घ्यायला गेले.

•जुलै 2017 - जेव्हा ते सपत्नीक अलास्कामध्ये एका हिमनदी पाहायला गेले.

•जानेवारी 2018 - नववर्षाच्या शुभेच्छा देताना.

पण कपड्यांच्या बाबतीत अशी 'साधी राहणी' असणारे मार्क एकमेव नाहीत.

2011 साली अॅपल आणि iPhoneचे जनक स्टीव्ह जॉब्स यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर 'स्टीव्ह जॉब्स टर्टलनेक' टी-शर्ट्सच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली. कारण स्टीव्ह जॉब्स ऑफीसच्या मीटिंग्स असो वा लाँच इव्हेंट, नेहमी एकाच वेशात दिसले - काळा टर्टलनेक टीशर्ट, त्याखाली नीळी जीन्स आणि त्यांचा जगप्रसिद्ध गोलाकार चष्मा (गांधींसारखा).

वर्षानुवर्षं अॅपलचे आयपॉड आणि आयफोन अपडेट होत गेले, पण स्टीव्ह जॉब्स यांचा लुक तसाच राहिला.

निर्णय थकवा

मानसोपचारतज्ज्ञ आणि विश्लेषक यामागची एक संकल्पना सांगतात - Decision Fatigue अर्थात निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून येणारा थकवा.

"रोज रोज लहानसहान निर्णय घेताना इतका विचार केला जातो की इतर महत्त्वाच्या निर्णयांसाठी त्राण उरत नाही. सोप्या भाषेत सांगायच झालं तर, रोज काय खायचं, काय घालायचं, यासारखे निर्णय घेत बसलं की कार्यक्षमता कमी होते," असं EliteDaily वेब पोर्टलवर राजकीय विश्लेषक जॉन हॉल्टिवाँगर लिहितात.

म्हणूनच तुम्ही बराक ओबामांनाही कधी राखाडी किंवा निळ्या सूट्सव्यतिरिक्त इतर कुठल्या कपड्यांमध्ये कमीच पाहिलं असेल.

फोटो स्रोत, MANDEL NGAN / Getty Images

फोटो कॅप्शन,

2011 साली फेसबुकच्या एका टाऊन हॉलमध्ये मार्क झुकरबर्गसोबत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

व्हॅनिटी फेअर मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत ओबामा आपलं गुपित सांगतात, "मी कमीत कमी निर्णय घेण्याची गरज पडावी, या प्रयत्नात असतो. खाण्या-पिण्याचे, पोशाखाचे निर्णय मला नाही घ्यायचे, कारण मला इतरही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात."

व्यक्तिमत्त्वावर प्रभाव

आणि तुम्हीच विचार करा ना, एकाच रंगाचे किंवा एकसारखे कपडे असतील तर ते एकत्रित धुण्यात, वाळवण्यात आणि घडी करून कपाटात ठेवण्यात कमी वेळ, पाणी आणि पैसा वाचू शकतो. आणि मुद्द्याचं म्हणजे, आपल्याला किती कमी निर्णय घ्यावे लागतील - कुठला शर्ट कुठे ठेवायचा, पँट कशी घडी करायची, इतक्या विचारांचा, निर्णयांचा गोंधळच नाही.

आणि दुसरं म्हणजे मनाची शांती - जर आपल्याला माहितीये की आपल्यावर एखादा रंग छान दिसतो, किंवा 'त्या' टॉपसोबत 'तो' स्कर्ट घातला की काँप्लिमेंट्सचा पाऊस पडतो, तर उगाच विचार करत बसण्याची कटकट नाही.

याचा आणखी एक फायदा म्हणजे, दररोज तुमची आरशासमोरची किमान तीन मिनिटं वाचतील.

आणखी एक फायदा - तुमचा लुक इतका एकसारखा आणि सातत्यपूर्ण असतो की तो लोकांच्या लक्षात राहून जातो. जसं ओबामा त्यांच्या सूट्समध्ये, जॉब्स त्यांच्या टर्टल नेकमध्ये.

तुमच्याही ऑफिसमध्ये असं कुणी असेल ना, ज्याचा विशिष्ट लुक तुमच्या लक्षात राहिला असेल.

स्टीव्ह जॉब्स यांचे चरित्रकार वॉल्टर आयझॅकसन यांनी त्यांच्या पुस्तकात एक किस्सा सांगितलाय. 1980च्या सुरुवातीला जॉब्स जपानच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा सोनीच्या फॅक्ट्रीत त्यांनी सर्व कामगारांना एकाच गणवेशात पाहिलं.

'मलाही अॅपलमध्ये काम करणाऱ्यांसाठी असंच काही करायचं होतं, ज्याने त्यांच्यात एकजूट निर्माण होईल,' असं जॉब्स यांनी त्यांच्या चरित्रात लिहिलं आहे. 'मी सर्वांसाठी एकसारख्या टी-शर्ट आणण्याचा विचार करतोय, असं सांगितल्यावर ते जे काय खेकसले होते माझ्यावर! बापरे बाप!'

म्हणून ड्रेस कोड हा आवडीचा विषय, सक्तीचा नाही.

जेव्हा मार्क यांनी सूट घातला

मार्क झुकरबर्ग यांनी नुकताच आपला ग्रे टी-शर्टचा ड्रेसकोड मोडला होता. निमित्त होतं अमेरिकन काँग्रेसमध्ये झालेल्या त्यांच्या चौकशीचं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अमेरिका काँग्रेसमध्ये चौकशीला सामोरं जाताना मार्क

केंब्रिज अॅनलिटिका नावाच्या एका कंपनीने फेसबुक युझर्सची माहिती चोरी करून 2016 सालच्या अमेरिकन निवडणुकीमध्ये मतप्रवाह बदलला, असा आरोप झाला. अनेकांनी तर यादरम्यान #DeleteFacebook ची मोहीमही राबवली होती. काहींनी या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवरून काढता पाय घेतला.

आता डेटा फेसबुकचा, म्हणून जबाबदारीही त्यांची, या नियमाने मार्क यांना अमेरिका काँग्रेसमध्ये बोलवण्यात आलं. काँग्रेसमधली ही चौकशी मार्क यांच्यासाठी इतकी महत्त्वाची होती की ते पूर्ण तयारीने गेले होते. त्यांच्यासमोर एक मोठी डायरी होती, ज्यात शक्य अशा सर्व कठीण प्रश्नांची उत्तरं होती.

पण तिथे 60-70 वर्षांच्या माननीय खासदारांनी त्यांना उलट-सुलट प्रश्न विचारले. म्हणजे अगदी "तुम्ही लोकांना फेसबुकची सेवा फुकट देता तर तुमच्या कर्मचाऱ्यांना पगार कसा देता?"

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मार्क काँग्रेसमध्ये पूर्ण तयारीनिशी आले होते

मार्क कसंतरी हसणं कंट्रोल करून म्हणाले, "आम्ही अॅड्स चालवतो, सर." तेच अॅड्स जे तुमच्या न्यूजफीडमध्ये 'Sponsored' म्हणून दिसतात.

पण मार्क यांच्या डायरीत आणखी एक प्रश्न होता - जर सरकारने राजीनामा मागितला तर?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

हा प्रश्न त्यांना विचारला गेला नाही, पण शक्यता नाकारता येत नव्हती.

म्हणून ही मीटिंग झुकरबर्गसाठी महत्त्वाची होतीच. त्यांनी तर खास आपल्या नेहमीच्या राखाडी टी-शर्टला टुल्ली देत, खास काळ्या सूट-बूटमध्ये वॉशिंग्टन गाठलं.

याची सर्वत्र चर्चा झाली. फॅशन पोलीस आणि व्यापार विश्लेषकांनीही यावर खल केला. प्रसिद्ध स्टाईल मॅगझिन GQ नुसार "मार्कच्या शर्टाची कॉलर तर एखाद्या राजेशाही पेहरावाच्या कॉलरसारखी होती."

पण या मीटिंगसाठी चांगलं दिसण्यापेक्षा महत्त्वाचं होतं हे दाखवणं की आपण जबाबदार आहोत. की फेसबुकमध्ये छाछुगिरी चालली नाहीये.

वोग (Vogue) या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनने म्हटलं, "असा सूट तर कुणी मोठा, परिपक्व नेता किंवा एखादा बलाढ्य व्यापारी घालतो."

वोग ही त्यामागे एक विशेष कारण देतात - "मार्क यांचं नाव आणि काम आता जगभरात पोहोचलंय. आता ते काही टी-शर्ट आणि हूडी घालून चपलांमध्ये वावरू शकत नाहीत. त्यांना आता हे पटत असेल वा नसेल, पण एका जबाबदार कॉर्पोरेट अधिकाऱ्याप्रमाणे त्यांना वागावंच लागेल. आणि हा सूट त्याचीच परिणती आहे."

(ही बातमी प्रथम 14 मे 2008 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.)

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : फेसबुक तुमच्या डेटाचं करतं तरी काय?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)