उडत्या विमानाची काच फुटली आणि पायलट पडता पडता वाचला!

विमान Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रतिकात्मक

विमान हवेत असतानाच अचानक पायलट केबिनची काच फुटली. पायलटचं अर्धं शरीर अक्षरशः विमानाबाहेर गेलं. पण सहकारी पायलटनं लगेच आत ओढल्यानं पायलट वाचला.

एखाद्या हॉलिवूड सिनेमातल्या दृश्यासारखं वाटलं तरी ही सत्यघटना आहे. पण चीनमधल्या प्रवासी विमानात ही एक घटना खरोखर घडली आहे.

काच फुटल्यानंतर विमानाला ताबडतोब इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या दुर्घटनेनंतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असं सांगण्यात आलं.

एयरबस A-319 हे विमान सुमारे 32 हजार उंचीवर उडत होते. त्याचवेळी कॉकपीटमध्ये एक मोठा आवाज झाला, अशी माहिती विमानाचे कॅप्टन लियो च्वान जीएन यांनी चेंगडु इकोनॉमिक डेली या वृत्तपत्राला दिली.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानाची तपासणी करण्यात आली.

"असं काही घडेल याची आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. अचानक घडलं हे," असं ते पुढं म्हणाले.

"खिडकीची काच अचानक फुटल्यावर मोठा आवाज झाला. माझा सहकारी पायलट त्या फुटलेल्या खिडकीतून बाहेर पडताना मी पाहिलं. मी त्याला खसकन आत ओढलं. सुदैवानं त्यानं सीट बेल्ट बांधला होता, त्यामुळे अपघात टळला."

"काच फुटल्यानं कॉकपीटमधल्या सगळ्या वस्तू उडू लागल्या. रेडिओपण ऐकायला येत नव्हता. विमान इतकं हलायला लागलं की मला काहीच करता येत नव्हतं."

असं कसं घडलं?

या अपघाताच्या वेळी सिचुआन एयरलाइन्सचे 3U8633 विमान हे नैर्ऋत्य चीनमधल्या चोंग-चिंग इथून तिबेटमधल्या ल्हासाला जात होतं.

विमान अचानक 32 हजार फूट उंचीवरून 24 हजार फुटांवर आलं. त्यावेळी प्रवाशांना सकाळचा नाष्ता देण्यात येत होता.

Image copyright Getty Images

या विमानातले प्रवासी सांगतात, "काय झालं हे आम्हाला कळलंच नाही. ऑक्सिजन मास्क खाली आले. आम्ही खूप घाबरलो होतो. पण काही वेळानंतर सगळं ठीक झालं."

पायलटचा हात मुरगळला आहे आणि चेहऱ्याला मार लागला आहे, असं चीनच्या नागरी उड्डाण विभागानं माहिती दिली आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रानुसार, विमानतल्या 119 प्रवाशांना सुरक्षित उतरवलं आहे. चेंगडु विमानतळावर विमान उतरल्यावर 27 प्रवाशांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यानंतर पन्नासहून अधिक प्रवाशांनी ल्हासाला जाणाऱ्या दुसऱ्या विमानाचं तिकीट काढलं.

सोशल मीडियावर सगळ्यांत जास्त चर्चा

विमानाला सुरक्षित उतरवल्यामुळे त्या पायलटचं सर्वत्र कौतुक होत आहे. चीनमधल्या सिना वीबो या मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर #ChinaHeroPilot हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड झाला. त्याला 16 कोटी व्ह्यूज मिळाले आणि 1.78 कोटी कमेंट्स आल्या.

हॅशटॅग #SichuanAirlinesWindscreenGlassCracked ला 6.8 कोटी व्ह्यूज आणि 49,000 कमेंट्स आल्या.

पायलटला बक्षीस देण्याची आणि या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी लोकांकडून होत आहे.

Image copyright Reuters

"अशी घटना घडूच कशी शकते? दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. यातून धडा घेऊन भविष्यात अशा घटना घडू नये याची काळजी घ्यावी," असं लेजी पिग गर्ल या युजरनं सोशल मीडियावर लिहिलं आहे.

या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे.

दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतल्या प्रवासी विमानाचं इंजिन फुटलं होतं. त्यावेळी एक महिला प्रवाशी खिडकीतून अर्धी बाहेर आली होती. या अपघातात तिचं निधन झालं होतं.

वीज कडाडल्याने आणि पक्षाच्या टकरीनं खिडकीच्या काचा तडकल्याच्या घटना या अगोदर घडल्या आहेत. पण पूर्ण काच फुटल्याची अशी घटना क्वचितच घडते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)