बाप रे ! या देशात 'ब्रेक-अप' पडेल महाग

  • केरी एलन
  • बीबीसी मॉनिटरिंग
प्रातिनिधिक फोटो

या महिन्याच्या सुरुवातीला चीनमधल्या हांगझू शहरात एक वेगळाच प्रकार समोर आला. इथल्या एका बारमध्ये एक संशयित सूटकेस मिळाली आणि त्यानंतर पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली.

या सूटकेसमध्ये 2.1 कोटी रुपये होते. कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य बदलण्यासाठी इतका पैसा पुरेसा आहे.

पोलिसांनी या सुटकेसच्या मालकाला शोधून काढलं. या बारमध्ये ते त्यांच्या भूतकाळातल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आले होते, असं चौकशीत पोलिसांच्या लक्षात आलं.

या सुटकेसमध्ये मिळालेला पैसा हा ब्रेक-अप फी होता. हीच गोष्ट आज चीनमध्ये ट्रेंड म्हणून समोर येत आहे.

डेट किती खर्चिक असते हे कुणालाही माहिती नाही? दरवेळी खाण्या-पिण्यावर, भेटवस्तू खरेदी करण्यासाठी आणि सुट्टीवर जायचं असल्यास त्यासाठी अधिकचा पैसा खर्च करावा लागतो.

एकमेकांना भेटवस्तू देणं आणि एकमेकांसोबत जास्त वेळ घालवणाऱ्या टेडवर जाण्याचा ट्रेंड चीनमध्ये जोरात सुरू आहे. याला 'ब्रेक अप फीस' असं म्हणतात.

'ब्रेक अप फीस'

यात खूप दिवस सोबत राहूनही नातं वर्क-आऊट होत नसेल तर त्याबदल्यात भरपाई दिली जाते.

कायद्यानं या प्रकाराला मान्यता नसली तरी जोडीदाराला घटस्फोट दिल्यानंतर पोटगी देण्यासारखा हा प्रकार आहे.

दोघांमधले नातेसंबंध संपुष्टात आणणाऱ्या व्यक्तीला ही भरपाई द्यावी लागते.

आपल्या नात्याला किती वेळ द्यायचा, त्यासाठी किती प्रयत्न करायचे आणि नातं पुढे घेऊन जाण्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहोत या बाबींबद्दल दोघं जण मिळून विचार करतात.

तसंच हे नातं टिकणार नसेल तर त्यासाठी समोरच्या व्यक्तीला किती भरपाई द्यायची हेही ठरवलं जातं.

वाढत्या चंगळवादामुळे शहरांमध्ये हा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

पण काही जणांच्या मते, या बाबीचा संबंध चीनच्या भूतकाळाशी आहे. जेव्हा चीनी महिला आर्थिकदृष्ट्या पुरुषांवर अवलंबून असत.

काही प्रकरणं गंभीर

डेटिंगचा विचार केल्यास चीनमध्ये डेटिंगचं स्वरूप पारंपरिक राहिलेलं आहे ज्यात प्रेमी-प्रेमिका नंतर एकमेकांशी लग्न करतात.

यामुळे 'ब्रेकअप फी'कडे पीडित व्यक्तीचं भावनिक नुकसान भरून काढण्यासाठी दिली जाणारी रक्कम म्हणून पाहिलं जाऊ शकतं. जेणेकरून पूर्वीच्या प्रेमाला विसरून व्यक्तीनं नव्यानं आपलं आयुष्य सुरू करू करावं.

जास्त वय असलेल्या महिलांसाठी ही फी खूप मदत देणारी सिद्ध होते, असं काही रिपोर्टचं म्हणणं आहे. खासकरून त्या महिला ज्यांना आपण कमी वयात करिअर आणि प्रेमी यापैकी कुणा एकाची निवड करण्याची संधी गमावली आहे, असं वाटतं.

माध्यमांमध्येही 'ब्रेक अप फी' संबंधी बातम्या येतात. यातली काही प्रकरणं न्यायालयापर्यंत गेली आहेत. तर काही प्रकरणांकडे जोक्स म्हणूनही पाहिलं जातं.

जसं की एप्रिल महिन्यात एका महिलेनं तिच्या एक्स-बॉयफ्रेंडला हॉटेलचं बिल पाठवलं. या महिलेनं एक्स-बॉयफ्रेंडवर केलेल्या सर्व खर्चाची यादी बनवली आणि भरपाईसाठी ती त्यांच्याकडे पाठवून दिली.

जानेवारीत निंगबो शहरातल्या एका व्यक्तीनं गर्लफ्रेंडकडून भरपाई मागितली. डोक्यावरील सर्व केस गळून गेल्यामुळे गर्लफ्रेंडनं सोडल्याचा दावा त्या व्यक्तीनं केला होता.

काही प्रकरणं गंभीर आहेत. 2014च्या नोव्हेंबर महिन्यात एक प्रकरण समोर आलं ज्यात शिचुआन प्रांतातल्या एका व्यक्तीनं गर्लफ्रेंडकडून भरपाई मागितली. आपल्या गर्लफ्रेंडचे इतर पुरुषांशी संबंध आहेत, असं त्यांना माहिती झालं होतं.

दोघांचंही लग्न झालं होतं. पण गेल्या 5 वर्षांपासून ते डेटिंग करत होते. यातल्या व्यक्तीनं कपडे खरेदी करण्यासाठी अनेकदा गर्लफ्रेंडला पैसे दिले होते. पण महिलेनं ब्रेक अप टॅक्स देण्यास मनाई केल्यानंतर तो पुरुष तिच्या घरी गेला आणि कुटुंबीयांवर अॅसिड हल्ला केला.

हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. एकमेकांपासून वेगळं होण्याबाबतीत दोघांमध्ये सामंजस्य झालं असतं तर असं घडलं नसतं असं त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच म्हणणं आहे.

सोशल मीडियावर चर्चा

ग्लोबल टाईम्सच्या मते, हांगझू शहरात जी सुटकेस सापडली होती त्या प्रकरणातल्या महिलेला वाटलं होतं की, भरपाई म्हणून सुटकेसमध्ये असलेल्या रकमेत काही लाख रुपये कमी होते, म्हणून ती महिला सुटकेस तिथंच सोडून गेली.

महिलेच्या मते, त्यांनी आपल्या एक्स-बॉयफ्रेंडला म्हटलं होतं की, "मी ती सुटकेस घेतली नाहीये. तुम्ही ती सुटकेस परत घेऊन जा, मी ती बारमध्येच ठेवली आहे."

पण बॉयफ्रेंड त्याआधीच बारच्या बाहेर गेला आहे, हे त्या महिलेला माहिती नव्हतं. पैसे चुकीच्या व्यक्तीच्या हाती जाऊ नयेत, या भीतीनं दोघंही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते.

ही सुटकेस संबंधित व्यक्तीला परत देण्यात आली. या पुढे काळजी घ्या, अशी ताकीदही पोलिसांनी त्या व्यक्तीला दिली आहे. पण जे काही पैसे भरपाई म्हणून गर्लफ्रेंडला दिले होते, ती रक्कम योग्य आहे की नाही, हा प्रश्न आजही त्याच्यासमोर आहे.

"सुटकेसमध्ये 2.1 कोटी रुपये होते. ही रक्कम योग्य नाही का?" त्या 20 वर्षीय तरुणाचा हा प्रश्न होता.

चीनची सोशल मीडिया साईट सिना वीबोवर अनेक लोक या प्रकरणी त्यांची मतं लिहित आहेत. "2.1 कोटी रुपयांमध्ये तुम्ही हांगझू शहरात चांगलं घर खरेदी करू शकता."

"आपल्या प्रियकराला सोडण्यासाठी तुम्हाला पैसे का हवेत," असं एका व्यक्तीनं विचारलं आहे.

ब्रेक अप फीमुळे चीनमधल्या पुरुषांवर मानसिक दबाव पडू शकतो, कारण देशात सेक्स रेशिओ एक मोठी समस्या आहे, असं सोशल मीडियावर काही लोकांचं म्हणणं आहे.

"पुरुषच नेहमी महिलेला पैसे आणि वस्तू देतो, असं का असतं? महिला आणि पुरुष समान नाहीत का?" असं काही लोक म्हणत आहेत.

काही लोकांच्या मते यासारख्या प्रकारामुळे चीनच्या गरीब लोकांना त्यांचा साथीदार शोधण्यात अडचणी निर्माण होतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)