'युरोपला जाण्यासाठी मी माझं सगळं विकलं, आणि आता रस्त्यावर आलो'

इव्हान्स विलियम Image copyright COLIN FREEMAN
प्रतिमा मथळा इव्हान्स विलियम

युरोपात पोहोचण्यात अयशस्वी झालेल्या 3,000 हून अधिक नायजेरियन स्थलांतरितांना 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन'च्या मार्फतीने मायदेशी पाठवलं जात आहे.

यांच्यापैकी कित्येकांनी होतं नव्हतं ते सर्वकाही विकून युरोपपर्यंतच्या प्रवासखर्चासाठी पैसे जमवले होते. पण आता त्यांना हे कळत नाहीये की मायदेशी परतल्यावर आपल्या कुटुंबीयांना कसं तोंड द्यायचं.

इव्हान्स विलियमने मला सांगितलं की युरोपला जाण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी त्याने स्वयंपाकघरातील सिंक सोडून यच्चयावत गोष्ट विकली. बिछाना, फ्रीज, टीव्हीपासून ते जास्तीचे कपडे, मोबाईल सर्वकाही. शिवाय काही कर्जही घेतली. अखेर सहारा वाळवंटामार्गे नायजेरियातून लिबियात जाण्यासाठी एका बनावट एजंट टोळीला देण्यासाठी पुरेसे पैसे त्याच्याकडे जमले.

एकंदरीत, त्याला हे सर्व 750 पाउंड्स पडलं (म्हणजे साधारण 70 हजार रुपयांना). पण त्याची त्याला चिंता नव्हती. सर्व देणी फेडून, कालांतराने घरी परत येऊन स्वतःचा व्यवसाय उभा करण्याइतके पैसे त्याला युरोपात लवकरच कमावता आले असते.

प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.

त्या बनावट एजंट टोळीने लिबियात तब्बल सहा महिने त्याच्याकडून विना मोबदला बळजबरीने काम करून घेतलं. अखेर भूमध्य सागर पार करण्यासाठी तो मोडक्यातोडक्या बोटीवर चढला. लिबियाच्या तटरक्षक दलाच्या जवानांनी त्याला पकडले. त्यांच्यासारख्याच अन्य 140 जणांबरोबर त्याला प्रतिबंध केंद्रांत डांबण्यात आलं.

7 लाख माणसं भूमध्यसमुद्र ओलांडून युरोपात जाण्याच्या बेतात?

मी इव्हान्सला गेल्या महिन्यात भेटलो तोपर्यंत त्याने खूप काही भोगलं होतं. नुकताच तो मायदेशी परतला होता. दक्षिण नायजेरियातील बेनीन शहरात आणखी शंभरेक स्थलांतरितांबरोबर सरकारने ताब्यात घेतलेल्या एका हॉटेलमध्ये राहत होता.

हे लोक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या (IOM) मदतीने इथे परतले होते. ज्या अवैध स्थलांतरितांना स्वतःच्या देशात परतायचं आहे, अशांना संयुक्त राष्ट्रसंघाची IOM ही संस्था मदत करते.

त्यांना मग परतीचा निःशुल्क विमानप्रवास, दोन रात्री हॉटेल मधली राहण्याची सोय, शिवाय वरखर्चाला 200 पाउंड्स, आणि नव्हे तर चांगल्या प्रकारे स्वावलंबी जीवन जगता यावं, यासाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण अशी सर्व मदत परत आलेल्या स्थलांतरितांना दिली जाते.

2015 साली ही स्थलांतरितांवरील आपत्ती बरीच चर्चेत होती. त्या वर्षी युरोपियन युनियननं 300 कोटी पाउंड्सची आर्थिक मदत या योजनेला केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लिबियन कोस्ट गार्ड

स्थलांतरितांना जर त्यांच्या मूळ देशात नोकरी-पाण्याच्या संधी निर्माण करून दिल्या तर ते लिबिया सोडून आपापल्या मायदेशी परत जातील, अशी युरोपियन युनियनला आशा आहे. कारण अजूनही सात लाख माणसं भूमध्य सागर ओलांडून युरोपात जाण्याच्या बेतात आहेत, असा एक अंदाज आहे.

3,000 नायजेरियन स्थलांतरीत आधीच मायदेशी परत पाठवण्यात आले आहेत आणि येत्या वर्षभरात आणखी 20,000 परतण्याची शक्यता आहे.

पण पुनर्वसनाची ही योजना स्वीकारली तरीही या स्थलांतरितांसाठी असं घरी परतण्याचा अनुभव त्रासदायक आहे.

'कायदेशीररीत्या युरोपात जाणार'

इव्हान्ससारखे बहुतांश अक्षरशः निराधार असतात. पुनर्वसनासाठी त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देणं, आणि त्यासाठी शिक्षण देण्याची योजना कौतुकास्पद असली तरी जी कामं मिळत आहेत, ती फारच प्राथमिक आहेत. उदा. केशकर्तन, शिवणकाम, शेती यांचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातंय.

खरं तर युरोपात यापेक्षा आणखी चांगलं काम करण्याची ज्यांची इच्छा होती, म्हणून हे सगळं त्यांच्यासाठी जरा कमीपणाचंच आहे.

याशिवाय आणखी एक बोचणारा प्रश्न म्हणजे 'लोक काय म्हणणार?' या परत आलेल्या स्थलांतरितांकडे त्यांचं मित्रमंडळ आणि आप्त अपयशी म्हणून पाहतात. बऱ्याच जणांसाठी त्यांच्या आईवडिलांनी सोनंनाणं विकलेलं असतं. यांपैकी कोणालाच निर्धन अवस्थेत परतायचं नसतं आणि हे कधी कबूल करायचं नसतं की आयुष्यातली ती सुवर्णसंधी, मग ती चूक असो वा बरोबर, आपण अशी वाया घालवली.

एकदा का वरखर्चासाठी मिळालेला निधी संपला की, फक्त राहत्या घरातच आपल्याला आसरा मिळू शकतो, हे वास्तव माहित असूनही इव्हान्स घरी त्याच्या कुटुंबात परत जाण्यास तयार नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नायजेरियातले आरोग्य सेवा कर्मचारी

"तरीही मला नायजेरियात नाही राहायचं," इव्हान्स मला म्हणतो. "मी पुढच्यावेळी कायदेशीररीत्या युरोपात जाण्याचा प्रयत्न करेन.''

इव्हान्ससारखाच त्याच्या परतीच्या विमानात मला आणखी एक व्यक्ती भेटली ती म्हणजे अबिबू.

तरुण, दिसायला कणखर असलेल्या अबिबूची कथा आणखी उदासवाणी आहे. त्याच्या चेहऱ्यावरला व्रण ताजाच दिसत होता. त्याच्या बोलण्यातून, आतपर्यंत धुमसणारा राग जाणवत होता.

तो म्हणाला की त्याच्या आईने, तिच्याकडील एकुलती एक जमीन विकून त्याच्या युरोप प्रवासासाठी पैसे भरले होते. पण परत आल्याचं त्याने आपल्या आईला सांगितलंही नव्हतं.

"जर माझी आई मला पाहील तर ती माझ्या काळजीने आजारी पडेल आणि शेजारीपाजारी म्हणतील, 'ह्या मुलाच्या आईने त्याला युरोपला पाठवायला जमीन विकली, आणि हा तर अपयशीच ठरला'. जर असं कोणी म्हणाल्याचं माझ्या कानावर आलं तर, मी सांगतो, मी त्याला ठार मारेन."

मग आता तो काय करणार होता?

"सर्वांत पहिले मला माझे पैसे परत मिळायला हवेत, मला वरखर्चासाठी मिळालेत त्याच्या कितीतरी पट पैसे मी लिबियाला जाण्यासाठी खर्च केलेत."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नायजेरियात एका अशासकीय संस्थेत महिला स्वयंपाक शिकताना.

कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण अबिबूला आवडलं होतं - केशकर्तन? शेतकाम? त्याच्या मनात काहीतरी वेगळंच दिसत होते.

"मी पर्यायांचा विचार करेन," त्याने चरफडत मान्य केले. "पण मला भीती आहे की, माझे पैसे परत मिळवण्यासाठी, मी गुन्हेगारीकडे वळेन."

खरंच? कशा प्रकारचा गुन्हा?

"दरोडा, बहुदा," तो म्हणाला.

त्याच्या बोलण्यावरून त्याला तेच म्हणायचं आहे, असं वाटलं. मग मला उत्सुकता वाटली, की त्याच्या चेहऱ्यावर जे व्रण होतं ते नक्की कशामुळे झालं असावं?

आम्ही एकमेकांचा निरोप घेत असताना माझा नायजेरियन सहकारी आणि चर्चचा धर्मोपदेशक असलेला पीटर अबिबूला म्हणाला, "जाण्याचा निर्णय सर्वस्वी तुझा होता, त्यासाठी इतरांना दोष देऊ नको. आणि तुझ्या आईचा विचार कर, तू जिवंत आहेस, हे ऐकून तिला किती आनंद होईल."

खरंच, होईल तिला आनंद? दोन वर्षांपूर्वी लिबियातील स्थलांतरितांच्या प्रतिबंध केंद्रात मी गाम्बियाच्या एका स्थलांतरीत इसमाला भेटलो होतो. त्याने मला असाच निरोप त्याच्या कुटुंबीयांना द्यायला सांगितला होता... की तो परतलाय आणि जिवंत आहे.

मी जेव्हा त्यांना फोन केला, तेव्हा मला अक्षरशः आनंदाश्रू अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या कडे एकच प्रश्न होता "हे काय, म्हणजे तो युरोपपर्यंतही पोहोचला नाही का?"

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)