अमेरिका स्वतःच्याच फसलेल्या धोरणांची बळी - इराण

अमेरिका, इराण, अणूकरार

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेव्ह

अमेरिका इराणवर आतापर्यंतचे सर्वांत कठोर निर्बंध लादणार या अमेरिकेच्या घोषणेचा इराणनं निषेध केला आहे.

इराणवर सर्वांत कठोर निर्बंध लादणार असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेओ यांनी सांगितल्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या घोषणेचा निषेध केला.

"अमेरिका स्वतःच्याच फसलेल्या धोरणांची बळी ठरली आहे, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील," असा इशारा यावर प्रत्युत्तर देताना इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद झरीफ यांनी दिला आहे.

या निर्बंधांनंतर इराणला आपली अर्थव्यवस्था तारणं खूप कठीण जाईल, असा इशारा पॉम्पेओ यांनी वॉशिंग्टन शहरात केलेल्या भाषणादरम्यान सांगितलं.

आण्विक अस्त्रांसंदर्भात इराणचा आक्रमक पवित्रा कमी करण्याच्या दृष्टीने पेंटेगॉन आणि त्या प्रदेशातील अन्य मित्र राष्ट्रांच्या मदतीने कसून प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

2015 मध्ये झालेल्या इराण अणू करारातून अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच माघार घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर निर्बंधांची घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

परराष्ट्र धोरणासंदर्भातील पहिल्यांदाच सविस्तरपणे बोलताना पॉम्पेओ यांनी इराणसंदर्भात पर्यायी योजनाही तयार असल्याचं सांगितलं.

अमेरिकेसोबत पुन्हा अणूकरार करायचा असेल तर इराणला 12 अटींची पूर्तता करावी लागेल. सीरियातून इराणचं सैन्य बाहेर काढणं तसंच येमेन बंडखोरांना पाठिंबा देणं थांबवणं, यासह अन्य अटींचा समावेश आहे.

पॉम्पेओ यांच्या अन्य काही अटी

  • अणूकार्यक्रमासंदर्भात इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सीला (IAEA) संपूर्ण माहिती देणं इराणला अनिवार्य असेल. यानंतर इराणला अणूकार्यक्रम कधीही हाती घेता येणार नाही.
  • शेजारी राष्ट्रांना धमक्या, इस्रायलला नष्ट करण्याचा इशारा, सौदी अरेबिया आणि UAEच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्याची आगळीक अशी भाषा आणि वागता येणार नाही.
  • बनावट कारणं देऊन तसंच इराणमध्ये बेपत्ता होण्याच्या नावाखाली पकडण्यात आलेल्या अमेरिकेच्या तसंच मित्रराष्ट्राच्या नागरिकांची तात्काळ सुटका करण्यात यावी.

"इराणच्या धोरणामध्ये ठोस असा बदल जाणवला तरच कठोर निर्बंध शिथील केले जातील," असे पॉम्पेओ यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, "इराणवर अभूतपूर्व असा आर्थिक दबाव टाकण्यात येईल. तेहरानमधील नेत्यांना आमच्या धोरणाविषयीचं गांभीर्य लक्षात यावं. मध्य पूर्व प्रदेशावर इराणला पुन्हा कधीही एकछत्री अंमल प्रस्थापित करता येणार नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)