रोहिंग्या कट्टरवाद्यांनी 99 हिंदूंना मारलं, अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा दावा

म्यानमार Image copyright EPA

मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यान म्यानमारमध्ये अनेक रोहिंग्या मुस्लीम कट्टरवाद्यांनी हिंदूचा संहार केल्याचं अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेनं म्हटलं आहे.

अरसा (Arakan Rohingya Salvation Army) या गटानं 99 हिंदू नागरिकांची हत्या केली असं या मानवाधिकार संघटनेनं म्हटलं आहे. अरसानं मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे.

जेव्हा म्यानमारच्या सैन्याविरुद्ध असंतोषाला सुरुवात झाली तेव्हा हे हत्याकांड झालं होतं. म्यानमारच्या सैन्यावर सुद्धा अत्याचाराचा आरोप आहे.

म्यानमारमध्ये मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 7 लाख रोहिंग्या आणि इतर लोकांनी हिंसाचारामुळे पलायन केलं होतं.

या संघर्षामुळे म्यानमारमधले बहुसंख्य मुस्लीम आणि हिंदू लोकसुद्धा विस्थापित झाले होते.

हिंदूबहुल गावांवर हल्ला

अॅम्नेस्टी या संस्थेनं बांगलादेश आणि राखीन प्रांतातल्या अनेकांशी चर्चा केली. त्यातून अरसानेच या हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे, असा त्यांचा दावा आहे.

हे हत्याकांड उत्तर भागातल्या मौंगदा परिसराल्या गावात झालं. जेव्हा ऑगस्ट 2017 मध्ये पोलीस चौक्यांवर हल्ले झाले तेव्हाच हे हत्याकांड झालं असं अॅम्नेस्टीचं म्हणणं आहे.

अरसाच्या सदस्यांनी 26 ऑगस्टला 'अह नौ खा माँग सेक' या हिंदू गावावर कसा हल्ला केला याचा उल्लेखसुद्धा या अहवालात करण्यात आला आहे.

Image copyright youtube
प्रतिमा मथळा अरसा ने जारी केलेल्या या व्हीडिओत त्यांचा नेता दिसत आहे.

या हल्ल्यात नातेवाईंकांना आक्रोश करताना किंवा मरताना पाहिल्याचं इथल्या मुलांनी संस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

अरसावर 20 पुरूष, 10 महिला आणि 23 लहान मुलांना मारल्याचा आरोप आहे. त्यातल्या 14 बालकांचं वय 8 वर्षांपेक्षाही कमी होतं.

मागच्या वर्षी चार सामूहिक कबरीतून 45 व्यक्तींचे मृतदेह बाहेर काढल्याचं अॅम्नेस्टीचं म्हणणं आहे. काही लोकांचे मृतदेह अजूनही मिळालेले नाहीत. त्यात 'ये बोक क्यार' नावाच्या गावातल्या व्यक्तींचाही समावेश आहे.

'अह नौ खा माँग सेक' या गावात ज्या दिवशी हल्ला झाला त्याच दिवशी 'ये बोक क्यार' गावावरसुद्धा हल्ला झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 99 आहे.

मागच्या वर्षी उजेडात आलं प्रकरण

सप्टेंबर 2017 मध्ये मोठ्या प्रमाणात रोहिंग्या मुस्लीम पळून बांगलादेशात गेले होते. त्यांनी म्यानमारच्या सैन्यानं केलेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली होती. त्याचवेळी म्यानमार सरकारनं एक सामुदायिक कबर सापडल्याचा दावा केला होता.

मारले गेलेले लोक मुस्लीम नसून हिंदू आहेत आणि त्यांची हत्या अरसाच्या कट्टरवाद्यांनी केली आहे असं म्यानमार सरकारनं सांगितलं होतं.

पण त्याचवेळी म्यानमार सरकारनं पत्रकारांना ही कबर आणि शव दाखवली. पण स्वतंत्र मानवाधिकार कार्यकर्त्यांना राखिन प्रांतात येण्यास मज्जाव केला होता.

त्यामुळे 'अह नौक खा माँग सेक' आणि 'ये बोक क्यार' या गावात नक्की काय झालं होतं हे कळायला मार्ग नव्हता.

त्याचवेळी म्यानमारच्या सैन्यानं केलेल्या अत्याचारांचे अनेक साक्षीदार समोर आले होते. पण तिथलं सरकार या आरोपांचा इन्कार करत होते. त्यामुळे सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

या नरसंहारात आपला हात नसल्याचं अरसाचं म्हणणं होतं. या संघटनेनं मागच्या चार महिन्यात कोणतंही निवेदन दिलं नव्हतं.

राखिन भागात एकतर्फी वार्तांकन होतंय असा आरोप अरसानं लावला होता. पण बीबीसीसह जगभरातल्या मीडियानं गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्येची बातमी दिली होती.

म्यानमारच्या सैन्यावरही टीका

अॅम्नेस्टीनं म्यानमारच्या सैन्यानं चालवलेल्या अभियानाला बेकायदा आणि हिंसक असं संबोधत त्यांच्यावरही टीका केली आहे.

मानवाधिकार संस्थेच्या अहवालानुसार म्यानमारच्या सुरक्षा रक्षकांच्या जातीय नरसंहाराच्या अभियानानंतर अरसानं हा हल्ला केला होता.

Image copyright Reuters

संस्थाच्या मते त्यांना राखिन आणि बांगलादेशाच्या सीमेवर डझनावारी लोकांच्या मुलाखती आणि फॉरेंसिक पॅथॉलॉजिस्टकडून केलेल्या तपासानंतर ही गोष्ट उजेडात आली आहे.

अॅम्नेस्टीचे अधिकारी तिराना हसन म्हणाले, "हा तपास राखिन प्रांतात अरसानं मानवाधिकारांच्या केलेल्या उल्लंघनावर प्रकाश टाकतो, पण अशा गोष्टींना बातम्यांत योग्य स्थान मिळत नाही."

"ज्या लोकांशी आम्ही बोललो त्यांच्यावर अरसाच्या क्रुरतेचा एवढा प्रभाव आहे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्यावरील अत्याचार आणि राखिन प्रांतात म्यानमारच्या सुरक्षा दलांनी केलेले अत्याचार यांची तीव्रता सारखीच आहे"

मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 7 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लीम लोक बांगलादेशात आले आहेत. त्यात महिला आणि लहान मुलांची संख्या मोठी आहे.

रोहिंग्या अल्पसंख्यांक मुस्लीम आहेत. हे लोक म्यानमारमध्ये अनधिकृत समजले जातात. त्यांच्या अनेक पिढ्या म्यानमारमध्ये राहत आहेत. तरी सुद्धा त्यांना तिथं बाहेरचं मानलं जातं. बांगलादेशमध्ये सुद्धा त्यांना नागरिकत्व नाही.

हेही वाचलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
राखिनमधील हिंदूंच्या स्थितीचा ग्राउंड रिपोर्ट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)