अवलिया एबी डी'व्हिलियर्सचं वादळ शांत होतं तेव्हा...

'एबीडी' अर्थात अब्राहम बेंजामिन डी'व्हिलियर्स हा एक झंझावात आहे. अचंबित करणाऱ्या कौशल्यांसाठी ओळखणारा एबी आता मैदानावर दिसणार नाही. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 'एबीडी' अर्थात अब्राहम बेंजामिन डी'व्हिलियर्स हा एक झंझावात आहे. अचंबित करणाऱ्या कौशल्यांसाठी ओळखणारा एबी आता मैदानावर दिसणार नाही.

अगदी परवाचीच गोष्ट ही. इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेत खचाखच भरलेल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादचा अॅलेक्स हेल्स चौकार-षटकारांची लयलूट करत होता. मोईन अलीच्या बॉलिंगवर त्याने टोलेजंग फटका लगावला. बॉल बाऊंड्रीच्या दिशेने प्रेक्षकात जाणार इतक्यात बाउंड्रीवरच्या एबी डी'व्हिलियर्सने हवेत उंच उडी घेतली. एखाद्या साधूने हवेतून उदी काढावी तसं एबीने सिक्स जाणाऱ्या बॉलचा कॅच बनवला.

स्पायडरमॅन या कॉमिक्सच्या पात्राला साजेशी उडी मारत एबीने घेतलेल्या कॅचने क्षणभरासाठी स्टेडियममध्ये जमलेले प्रेक्षक अवाक् झाले. मात्र पुढच्याच क्षणी 'एबी एबी'चा गजर टिपेला पोहोचला.

खेळ मनं जोडण्याचं काम करतात, भौगोलिक बंधनं पार करून देशांना एकत्र आणतात, हे दहा गुणांसाठीच्या निबंधासाठी साजेशा वाक्याचा प्रत्यय डी'व्हिलियर्सच्या रूपात येतो. मूळचा दक्षिण आफ्रिकेचा मात्र खऱ्या अर्थाने ग्लोबल असलेल्या 'एबीडी'चे चाहते जगभर पसरले आहेत. खेळाडू पेक्षाही माणूस म्हणून एबीपणाचं गारुड जगभरच्या क्रिकेट चाहत्यांवर आहे.

काय म्हणाला एबीडी

मल्टिटास्किंग आणि एक ना धड भाराभर चिंध्या, यातला फरक धुसर असतो. एबीडी अर्थात (अब्राहम बेंजामिन डी'व्हिलियर्स) हा माणूस मल्टिटास्किंगच्या सीमेवर पाय घट्ट रोवून उभा आहे, चिंधीच्या बाजूकडे आपण अंगुलीभरही सरकणार नाही याची दक्षता घेत.

हा दिसायला एक माणूस आहे पण प्रत्यक्षात अनेक गुणी माणसांचं संकरित प्रारूप आहे. व्यक्तिमत्त्वाला असलेल्या पैलूंची संख्या हनुमानाच्या शेपटीसारखा इन्फिनिटी झालेला हा एबी.

मैदानातल्या जायंट स्क्रीनवर त्याच्या नावाची अक्षरं उमटतात आणि जयघोषाला आणखी उधाण येत. सळसळत्या उत्साहाचा एबी लगबगीने ड्रेसिंग रूममधून सीमारेषेवर येतो. आता वादळाची अनुभूती येणार म्हणून टाळ्यांचा गजर टिपेला पोहोचतो. भारावून टाकणाऱ्या वातावरणात एबी फक्त एकदा आकाशाकडे बघतो. आणि मग सुरू ३६० डिग्री फटकेबाजीची मुक्त उधळण.

बाद होईपर्यंत अब्राहम बेंजामिन डी'व्हीलियर्स नामक हा अवलिया या ग्रहावरचा नाही, याची खात्री उपस्थित रसिकांना पटते. काहीतरी विलक्षण अनुभवायला मिळालं या आनंदात मंडळी तृप्त मनाने घरी परततात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अचंबित करणाऱ्या स्ट्रोक्ससाठी एबीडी ओळखला जातो.

बुलडोझरी प्रवृत्तीच्या फलंदाजीने एबीला मोठं केलेलं नाही. त्याची महती माणूसपणात आहे, ती खास समजून घ्यायलाच हवी. तुडवणे, सोलणे, पालापाचोळा करणे, फैलावर घेणे, बुकलून काढणे, धोपटवणे, तुकडा पाडणे या हिंसक विशेषणांना समानार्थी शब्द म्हणजे एबीडीची बॅटिंग.

पण एबी तसा नाही.

'गोलंदाजाची कशी औकात काढली, तो कोण यकश्चित बॉलर, त्याची लायकी आहे का मला बॉलिंग टाकायची?' असला अभिनिवेश एबीकडे नाही. 'मला संधी मिळाली, मी खेळलो इतका तो निर्लेप आहे. आज माझा दिवस होता, उद्या गोलंदाजाचा दिवस असू शकतो, म्हणजेच यशापयशाचा लंबक फिरत राहणार,' हे जीवनसूत्र त्याला उमगलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एबीडीची बॅटिंग पाहणं हा एक अनुभव आहे.

एबीडी कुठल्याही क्रमांकावर बॅटिंग करतो, समान ताकदीने. फॉरमॅट कुठलाही असो, त्याचं अॅव्हरेज पन्नाशीत राहतं. ऑफ-स्टंपच्या बाहेर चौथ्या स्टंपवर पाय रेलून अक्रॉस जाऊन तो फास्ट बॉलरला फाइनलेगच्या वरून सिक्स मारतो. स्पिनरला रिव्हर्स स्विच करून तो सिक्स मारतो.

बरं फक्त फोर-सिक्स हाणत नाही, वेड्यासारखं पळतोही. पार्टनर दमेल असं स्प्रिंग लावल्यासारखं तो पळतो, रनआऊट व्हायची शक्यता चुकून आलीच तर चित्यागत डाईव्ह घेतो. आणि हे फक्त स्वत:साठी नाही, तो पार्टनरसाठीही जीव काढून धावतो. शिवाय नवीन प्लेयर्सना सतत मोटिव्हेट करतोच.

कितीही चांगला बॉलिंग लाइन-अप असेल तरी एबी हाय गिअर मध्येच असतो. इनिंग्ज उभारणं, तिला गती मिळवून देणं, रन चेस करताना फिनिशरचं काम करणं, हे सगळं त्याच्याकडून आपसूक होतं.

एबी टेस्टमध्ये टेस्टचा बॅट्समन वाटतो, वनडेत वनडेचा आणि टीट्वेंटीत कत्तलकार. फॉरमॅटप्रमाणे जर्सी बदलते, पण त्याचं तंत्र तेच राहतं, अॅप्लिकेशन मात्र बदलतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एबीडी विकेटकीपिंगही करतो.

एबी विकेटकीपिंग करतो, आणि कामचलाऊ नाही. स्टेन-मॉर्केल-फिलँडर अशी घाबरगुंडी उडेल अशा अटॅकला तो कीपिंग करतो. सतत खालीवर उठणं-बसणं, स्टंपिंग, थ्रो घेणं हे सगळं रेग्युलर कीपरप्रमाणे करतो. कीपिंगची ड्युटी नसेल तर कुठेही उभा करा त्याला, 'झोकून देऊन काम करणं' हा वाक्प्रचार तो सतत प्रत्यक्षात आणतो.

बॉल त्याला बीट करू शकत नाही, थ्रो त्याचा चुकत नाही, रनआउट तो सोडत नाही. काही विचारूच नका, लाइव्ह वायर वगैरे म्हणतात अगदी तेच...

एबी बॉलिंगही करतो, आणि तीही अगदी नीट. म्हणजे आपल्या पार्टटाइमर्स सारखी नाही - विकेट काढतो. रनपण देत नाही. त्याच्या सुदैवाने त्याच्यावर बॉलिंग करण्याची वेळ फारशी येतच नाही, पण जेव्हा येते तेव्हा हे कामही मला जमतं, हे सिद्ध करायला तो विसरत नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एबीडी मल्टीटास्किंगसाठी ओळखला जातो.

तीस-चाळीस ओव्हर बॅटिंग केल्यावर तो पन्नास ओव्हर कीपिंग करतो, त्याच वेळी कॅप्टन्सीही करत असतोच. पण तो दमलाय, मरगटलाय असं केव्हाही होत नाही.

इंटरनॅशनल लेव्हलला तो गेली दहा वर्षं अव्याहतपणे हेच करतोय. बरं मध्ये IPL, चॅम्पियन्स लीग, दक्षिण आफ्रिकेतलं स्थानिक क्रिकेटही खेळतो. त्याचं सूत्र आहे - टीम मला जे काम देईल ते मी करतो.

मुळातच दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व करायला मिळतंय याचा एबीला प्रचंड अभिमान आहे. त्याच्या देशातल्या सामाजिक संस्कृतीची त्याला जाण आहे. समोरच्याचा, त्याच्या भाषेचा, संस्कृतीचा आदर करणं आणि प्रतिस्पर्धीपेक्षा माणूस म्हणून त्याला आपलंसं करणं, हे एबीचं तत्त्व. आणि म्हणूनच जगभर एबीचे मित्र आणि चाहतावर्ग पसरला आहे.

पण म्हणून एबी भावनाविवश वगैरे नाही, कट्टर व्यावसायिक आहे.

तरीही तो 'जिंकण्यासाठी वाट्टेल ते' करणार नाही. म्हणजे खोटी अपील करणं, चेंडू कुरतडणं, खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक शेरेबाजी करणं, असले विचार एबीच्या मनाला शिवतही नाहीत. जिंकायचय पण सन्मार्गाने हे एबीचं सूत्र. Gentleman's Game मधल्या सभ्य गृहस्थाचं प्रारूप म्हणजे एबी. म्हणूनच हरल्यानंतरही प्रतिस्पर्धी खेळाडूचं तो खुल्या दिलाने कौतुक करू शकतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एबीडीचे चाहे जगभर पसरले आहेत.

महत्त्वाचं काय तर एवढं कर्तृत्व गाजवणाऱ्याला माज येणं साहजिक. एबीला तो येत नाही. प्रतिस्पर्ध्याला जात, धर्म, पंथ, वंश, वर्ण यावरून शेरेबाजी करणं, त्याच्या तत्त्वात बसत नाही. विविधांगी संस्कृतीची माणसं असलेल्या दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या एबीचा प्रतिस्पर्ध्याला सन्मान देण्याचा गुण अन्य देशाच्या खेळाडूंनी घेतल्यास ICC Code of Conductची गरजच उरणार नाही.

वाचाळपणासाठी करण्यासाठी त्याला शिक्षा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अफाट सातत्य आणि अशक्य फिटनेस यामुळे पदार्पण केल्यापासून त्याला ड्रॉप करण्याचा विचारच आलेला नाही अद्याप. ज्यांच्याकडून तो क्रिकेट शिकलाय, क्रिकेटमधलं कौशल्यं घोटीव करण्यासाठी मदत करणाऱ्या करणाऱ्या प्रत्येकाबद्दल तो वारंवार कृतज्ञता व्यक्त करतो. एबीच्या आयुष्यातल्या क्रिकेट या पैलूचे हे उपपैलू.

दक्षिण आफ्रिकेच्या कनिष्ठ हॉकी संघासाठी त्याची निवड झाली होती. कनिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी त्याच्या नावाचा विचार झाला होता. कनिष्ठ राष्ट्रीय रग्बी संघाचा तो कॅप्टन होता. दक्षिण आफ्रिकेतले जलतरणातले सहा शालेय विक्रम त्याच्या नावावर आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या कनिष्ठ डेव्हिस टेनिस टीमचा तो भाग होता. 19 वर्षांखालील गटात बॅडमिंटन चॅम्पियन होता. व्यावसायिक गोल्फपटूंइतकी त्याची गोल्फमध्ये कामगिरी होती- हे असं सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरल्यानंतर एबीडीने आत्मचरित्रात निखळपणे सांगितलं की, मला अनेक खेळ सफाईदारपणे खेळता येतात मात्र व्यावसायिक पातळीवर मी क्रिकेट सोडून कुठलाही खेळ खेळलेलो नाही. झटपट प्रसिद्धी आयती मिळत असतानाही एबीडीने सच्चेपणाचीच कास कायम राखत वेगळेपण सिद्ध केलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एबी बॉलिंगही करतो

आता एवढं करतो म्हटल्यावर अनेकांच्या डोक्यात एक विचार डोकावतो - हा माणूस कुटुंबकबिल्याकडे लक्ष देतो की नाही? पण एबी तिथेही पुढेच. आईबाबा, भाऊ हे त्याचे घट्ट मित्र आहेत. त्याचे बाबा डॉक्टर आहेत. आणि हे चौघेही कुठला ना कुठला खेळ व्यावसायिक पातळीवर खेळलेले आहेत. सो खेळाचे बाळकडू घरातूनच. म्हणूनच आयुष्यातल्या चढउतारांविषयी तो त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करतो.

या 'चर्चिल' मंडळीत जुनी मैत्रीण डॅनिएला स्वार्तशी लग्न करत त्याने भर घातली. टूरच्या निमित्ताने बाहेर असला की स्काईपच्या माध्यमातून तो या सगळ्यांशी संवाद साधतो नियमितपणे.

या क्षणाला तुम्हाला कदाचित स्वतःविषयी थोडा न्यूनगंड वाटायला सुरुवात झाली असेल. पण एबीची कलाकारी अजून बाकी आहे.

या सगळ्यातून तो कधी आणि कसा वेळ काढतो ठाऊक नाही, पण एबी सुरेल गातो, उत्तम गिटार वाजवतो. अॅम्पी ड्यू प्रीझच्या साथीने त्याने एक अल्बमही काढलाय. मागे ICCच्या एका फंक्शनला त्याचं गाणं ऐकायला मिळालं होतं.

त्याच्या किटमध्ये पुस्तकांचा साठा असतो. आणि तो केवळ दाखवायला नाही. एखाद्या सामन्यादरम्यान तो खेळत नसताना पुस्तक वाचताना दिसतोही.

आणि मँचेस्टर युनायटेडचा तो फॅन आहे, त्यांच्या मॅचेस आवर्जून पाहतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एबी अनेक खेळ व्यावसायिक पातळीवर खेळतो

आता एवढ्या भारी माणसाला अॅड इंडस्ट्री दूर ठेवूच शकत नाही. सो कधी जाहिरातींमधून तर कधी प्रमोशनल अॅक्टिव्हिटीज करताना तो झळकत असतोच.

एबीला आता टक्कल पडू लागलंय. पण डेब्यू केला तेव्हा भुरभुरणारे सोनेरी केस, उजळ वर्ण, हिरवट निळे डोळे आणि चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहून एखादा अॅक्टर तर चुकून आला नाही ना क्रिकेटमध्ये, असा विचार आलेला. अभिनयाचं ठाऊक नाही पण क्रिकेटमधल्या सगळ्या भूमिकांना त्याने सार्थ न्याय दिलाय आणि म्हणूनच सतत त्याला अवॉर्ड मिळत असतात.

"I want to be the best, but I don't give a damn about statistics. Awards and accolades are great as long as the team is doing well, but you can't set yourself the goal to be No. 1 or to be in the top three. You will have your end goal in mind, but you have to work hard to get there; ball by ball, innings by innings."

मध्यमवर्गीय वाटेल असं सूत्र समोर ठेऊनही मोठं होता येतं, ही शिकवण देणारा आणि फास्टेस्ट सेंच्युरीतही पदार्पणातलं निखळ हास्य जपणाऱ्या एबीडीकडून आपणही काही शिकण्यासारखं...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)