आता फेसबुक तुमचे न्यूड फोटो का मागतंय? तुम्ही देणार का?

पण हा खटाटोप फेसबुक का करतंय? Image copyright RapidEye / Getty Images
प्रतिमा मथळा पण हा खटाटोप फेसबुक का करतंय?

सुडाच्या भावनेतून एखाद्यानं तुमचे नग्न फोटो सोशल मीडियावर अपलोड केले किंवा करण्याच्या बेतात असेल तर ते आता लगेच ब्लॉक करणं शक्य होणार आहे. पण त्यासाठी एक अट आहे - तुम्हाला तुमचे नग्न फोटो फेसबुकला पाठवावे लागणार आहेत.

तुम्ही म्हणाल ही काय नवीन भानगड? पण आधी ऐकून घ्या की फेसबुकला तुमचे न्यूड फोटो का हवेत.

ते असंय, फेसबुक त्या नग्न फोटोचं एक प्रिंट स्टोर करून ठेवेल. आणि असा फोटो कुणीही फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरवर टाकताच फेसबुकला तो कळेल आणि तत्काळ तो ब्लॉक केला जाईल.

पण हा खटाटोप फेसबुक का करतंय?

काही लहान मुलांचे नग्न फोटो त्यांच्या नकळत सोशल मीडियावरून पसरवण्याचा ट्रेंड काही देशांमध्ये सुरू झालाय. ऑस्ट्रेलियात सुडापोटी लोकांचे अश्लिल फोटो फेसबुकवर टाकले जात आहेत. त्याला आळा घालण्यासाठी फेसबुकने हा प्रयोग केला होता.

प्रथम ऑस्ट्रेलियात फेसबुकने लोकांच्या नग्न फोटोंची मागणी केली होती. आता त्यांनी इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडामधील फेसबुक युजर्संना त्यांचे न्यूड फोटो पाठवा, अशी विनंती केली आहे.

पण ऑस्ट्रेलियातील फेसबुकचा प्रयोग कितपत यशस्वी झाला, याविषयी त्यांनी कोणतीही माहिती उघड केली नाही.

पण आता हे फोटो लीक होणार नाहीत, याची गॅरंटी काय?

एखाद्या युजरने पाठवलेले फोटो फेसबुकचे कर्मचारी किती काळजीपूर्वक हाताळतील याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत.

हा प्रयोग नेमका काय आहे?

जर तुमचा एखादा नग्न फोटो लीक होण्याची तुम्हाला भीती आहे, तर तो फोटो तुम्ही आधीच फेसबुककडे सुपूर्द करायचा. फेसबुक मग अशा सगळ्या नग्न फोटोंची एक प्रिंट आपल्याकडे स्टोर करून ठेवणार.

जर एखाद्या माजी प्रियकरानं सुडापोटी तुमचा न्यूड फोटो फेसबुकवर अपलोड करायचा प्रयत्न केला तर तो या स्टोरमधून लक्षात येताच ताबडतोब ब्लॉक केला जाईल. याने Revenge Porn नावाच्या घातक प्रकाराला आळा घालण्यात मदत होईल, असा फेसबुकला विश्वास आहे.

Image copyright Getty Images

इंग्लंडमध्ये या समस्येवर आळा घालण्यासाठी हेल्पलाइन चालू केली आहे. तक्रार केल्यानंतर फेसबुक संबंधित युजरला एक लिंक पाठवते. तिथे त्यांना आपला नग्न फोटो अपलोड करावा लागतो.

तुमची नग्न फोटो कोण बघणार?

फेसबुकच्या पाच अधिकाऱ्यांची टीम ही युजरने पाठवलेले नग्न फोटो पाहणार आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे, असं फेसबुक सेफ्टी विभागाच्या प्रमुख अँटिगोनी डेव्हिस यांनी बीबीसी न्यूजबीटला सांगितलं.

सर्व फोटोंना एक विशिष्ठ आणि युनिक फिंगरप्रिंट दिलं जाणार आहे. त्याला हॅश असं नाव दिलं आहे.

हा प्रयोग यशस्वी होईल का?

असं केल्यानं ही समस्या पूर्णपणे संपणार नाही, असं डेव्हिस यांनी मान्य केलं आहे. ओरिजिनल फोटोत छेडछाड केली जाऊ शकते, त्यामुळे काम कठीण होणार आहे, असं त्या सांगतात. पण या तंत्रज्ञानात सुधारणा केली जात आहे.

Image copyright FACEBOOK
प्रतिमा मथळा (उजवीकडून) फेसबुक सेफटी विभागाच्या प्रमुख अँटिगोनी

ज्या फोटोमुळे तुम्ही चिंतेत आहात तो फोटो तुमच्याकडे असेल तरच त्यावर ताबडतोब कारवाई केली जाणार आहे. पण जर तुमच्याकडे संबंधीत फोटो नसेल तर फेसबुक काही करू शकणार नाही, असही त्या पुढं म्हणाल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)