सिंगापूर चर्चेतून माघार घेऊन ट्रंप यांनी किम यांना फसवलंय का?

ट्रंप आणि किम Image copyright AFP
प्रतिमा मथळा किम जाँग-उन आणि डोनाल्ड ट्रंप

12 जूनला सिंगापूरमध्ये नियोजित अमेरिका-उत्तर कोरिया चर्चेतून डोनाल्ड ट्रंप यांनी माघार घेतली आहे. जागतिक तणाव निवळण्यासाठीच्या प्रयत्नांना यामुळे मोठा फटका बसला आहे.

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांना लिहिलेल्या पत्रात ट्रंप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या या पत्रात ट्रंप म्हणाले, "आण्विक नि:शस्त्रीकरणासंदर्भात तुमची लवकरात लवकर भेट घ्यायची होती. मात्र तुम्ही प्रसिद्ध केलेल्या निवेदनात प्रचंड राग आणि द्वेष खुलेपणाने दिसत होता. आताच्या घडीला भविष्याचा विचार करून तुमची भेट घेणं रास्त ठरणार नाही."

अगदी काही तासांपूर्वीच उत्तर कोरियाने अणुचाचण्यांसाठी वापरण्यात येणारे बोगदे उद्धवस्त केल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेच्या आग्रहानुसार उत्तर कोरियाच्या आण्विक निःशस्त्रीकरणाच्या दिशेने हे एक मोठं पाऊल मानलं जात होतं.

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्याशी डावपेचात्मक चर्चा सुफळ होण्यासाठी उत्तर कोरियाने यंदाच्या वर्षीच पुंगे-रीचा अण्वस्त्र प्रकल्प बंद करण्याची तयारी दर्शवली होती.


क्षणाक्षणाचे अपडेट्स (भारतीय वेळेनुसार)


रात्री 11.15 वाजता : ट्रंप यांनी किमना फसवलंय का?

काही तासांपूर्वी किम यांनी आपली अणुचाचणीची ठिकाणं उद्ध्वस्त केली आणि आता ट्रंप यांनी ही घोषणा केली. मग ट्रंप यांनी किम यांना फसवलंय का?

ग्लोबल टाइम्स या चीनच्या इंग्लिश भाषेतील वृत्तपत्राच्या संपादकांना तरी असंच वाटतं.

"आपण फसलो असं किम यांना वाटत असेल, आणि अनेकांना तसंच वाटत असावं," असं ते ट्विटरवरून सांगतात.


रात्री 10.15 वाजता : दक्षिण कोरियाची प्रतिक्रिया

अमेरिका आणि उत्तर कोरियाने थेट चर्चेसाठी प्रयत्न करावा, असं आवाहन दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांनी केल्याचं वृत्त योनहाप या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मून यांच्या निवासस्थानी सुरक्षाविषयक उच्चपदस्थांच्या बैठकीत ते बोलत होते.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : किम जाँग-उन आणि मून जे-इन यांची गेल्या महिन्यात झालेली ऐतिहासिक भेट

"कोरियन द्विपकल्पातून अण्वस्त्रांचा नायनाट करून, या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करणं, हा एक असा ऐतिहासिक कार्यक्रम आहे, जो रद्द करता येत नाही किंवा लांबणीवर टाकला जाऊ शकत नाही," असं मून यांनी सांगितलं.

कोरियन द्विपकल्प आण्विक नि:शस्त्रीकरणाच्या प्रक्रियेत कोणताही उशीर व्हायला नको, असंही ते म्हणाले.


रात्री 9.50 वाजता : 'किम यांनी योग्य मार्ग निवडावा'

"मला आशा आहे की किम जाँग-उन हे योग्य मार्ग निवडतील, फक्त त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या लोकांसाठीही, ज्यांना यामुळे विनाकारण त्रास होतोय. आणि मला माहितीये की किम यांनाही तोच योग्य मार्ग निवडायचा आहे," असं ट्रंप म्हणाले.


रात्री 9.50 वाजता : '...तर आम्ही तयार आहोत'

"मी संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांच्याशी बोललो. आम्ही अमेरिकेची सुरक्षितता कधीही धोक्यात येऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही उत्तर कोरियावर पूर्णवेळ दबाव राखून ठेवूच. आणि जर उत्तर कोरियाने काहीही मूर्खपणाचं कृत्य केलं तर आम्ही तयार आहोत," असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप म्हणाले.


रात्री 8.40 वाजता : ट्रंप थोड्या वेळात बोलणार

ट्रंप थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसमधून येत आहे. मात्र ते पत्रकारांचे प्रश्न घेतील का, हे अजून स्पष्ट नाही.


रात्री 8.20 वाजता : उत्तर कोरियाला 'मोठा धक्का'

काही तासांपूर्वीच उत्तर कोरियाने काही आंततराष्ट्रीय पत्रकारांना अणुचाचण्याचे बोगदे उडवण्याची प्रत्यक्ष साईट दाखवली होती. त्यामुळे अचानक झालेल्या या घोषणेमुळे ते अडचणीत सापडले आहेत.

CNNच्या एका पत्रकाराने ट्रंप यांचं वरील पत्र उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांना वाचून दाखवलं. त्यांनंतर त्या अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे, असं त्या पत्रकाराने सांगितलं आहे.


रात्री 8.15 वाजता : सेओलमध्ये खळबळ

दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनीही सावधगिरीची भूमिका घेत, "आम्ही सध्या ट्रंप यांना नेमकं काय म्हणायचं आहे, हे समजण्याचा प्रयत्न करतोय," असं म्हटलं आहे.

सेओलच्या एका अधिकाऱ्याने वॉशिंगटन पोस्टच्या अॅना फिफील्ड यांना ही प्रतिक्रिया दिली आहे.


रात्री 8 वाजता : ट्रंप यांची सिंगापूर चर्चेतून माघार

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांना लिहिलेल्या पत्रात ट्रंप म्हणाले, "आण्विक अस्त्रांच्या क्षमतेविषयी तुम्ही बोललात. मात्र आमच्याकडे तुमच्या तुलनेत आणखी मोठे आणि अधिक शक्तिशाली अशी आण्विक अस्त्रं आहेत. या अण्वस्त्रांचा वापर करण्याची वेळ देवाने आणू नये, यासाठी मी प्रार्थना करतो."

"पण कोरियाने शांतता, समृद्धी आणि वैभव मिळवण्याची एक मोठी संधी गमावली आहे. हा खरंच इतिहासात एक दुःखद क्षण आहे," असं ट्रंप या पत्रात म्हणाले.

"आशा करतो की भविष्यात कधीतरी ही भेट होईल," असंही ते म्हणाले.

Image copyright WhiteHouse.gov
प्रतिमा मथळा ट्रंप यांचं किम यांना पत्र

सांयकाळी 5 वाजता : उत्तर कोरियाने केले अणुचाचण्यांचे बोगदे उद्ध्वस्त

उत्तर कोरियाने अणुचाचण्यांसाठी वापरण्यात येणारे बोगदे उद्धवस्त केल्याचं म्हटलं आहे.

पुंगे-री या ठिकाणचे अणुचाचण्यांसाठी उपयोगात आणले जाणारे बोगदे मोठ्या धमाक्याद्वारे उद्धवस्त करण्यात आल्याचं तिथे उपस्थित विदेशी पत्रकारांनी सांगितलं.

"आम्ही डोंगरावर चढून गेलो आणि साधारण 500 मीटर अंतरावरून हे बोगदे नष्ट होताना पाहिले," असं स्काय न्यूजचे पत्रकार टॉम चेशायर यांनी सांगितलं.


नेमकं कठे बिनसलं?

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी म्हटलं होतं की उत्तर कोरियाचा शेवट लिबियासारखा होऊ शकतो.

पण लिबियाने अण्वस्त्रांचा त्याग केल्याच्या आठ वर्षांनंतर 2011 मध्ये बंडखोरांनी लिबियाचे नेते मुअम्मर गदाफी यांची हत्या केली होती.

उत्तर कोरियाचे अधिकारी च्वे सन-ही यांनी पेन्स यांच्या या वक्तव्याला मूर्खपणा म्हटलं होतं.

गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेशी होणाऱ्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये च्वे सन-ही यांचा सक्रिय सहभाग आहे. उत्तर कोरिया अमेरिकेपुढे चर्चेची भीक मागणार नाही, आणि गरज भासल्यास आण्विक ताकद दाखवून देऊ, असा इशाराही च्वे यांनी दिला.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

मोठ्या बातम्या