#Metoo: 'त्यांनी माझा स्कर्ट उचलण्याचा प्रयत्न केला अन् विचारलं, तू अंतर्वस्त्रं घातली आहेस का?'

फ्रीमन

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता मॉर्गन फ्रीमन यांनी आपला लैंगिक छळ केला, असा आरोप आठ महिलांनी केल्यानंतर फ्रीमन यांनी माफी मागितली आहे.

मॉर्गन फ्रीमन यांनी बॅटमन ट्रायोलोजी, शॉशँक रिडम्पशन, ब्रूस ऑल्माइटी आणि मिलियन डॉलर बेबी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

"फ्रीमन यांनी अनेक वेळा आपल्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केला आणि कित्येक महिने ते माझी छळवणूक करत होते," असा आरोप एका प्रॉडक्शन असिस्टंटने केला आहे. गोइंग इन स्टाइल या चित्रपटावेळी दोघांनी सोबत काम केलं होतं.

"फ्रीमन यांनी माझा स्कर्ट उचलण्याचा प्रयत्न केला आणि विचारलं तू अंतर्वस्त्र घातली आहेत का?" असं प्रॉडक्शन असिस्टंटने म्हटलं आहे.

"माझ्यामुळं कुणाला त्रास झाला असेल तर मी तुमची माफी मागतो असं फ्रीमन यांनी म्हटलं आहे. कुणाचा अनादर करणं आणि कुणाला त्रास होईल असं वर्तन करण्याचा माझा हेतू नव्हता," असं त्यांनी म्हटलं आहे.

"जे लोक मला ओळखतात किंवा माझ्यासोबत ज्यांनी काम केलं आहे त्यांनी हे माहीत आहे की कुणाला त्रास होईल असं मी वागत नाही," असं मॉर्गन यांनी म्हटलं.

वाइनस्टाइन आज पोलिसांना शरण जाणार?

चित्रपट निर्माते हार्वे वाइनस्टाइन यांनी अनेक अभिनेत्रींसोबत लैंगिक छळ केल्याची प्रकरणं पुढं आली. त्यानंतर हॉलिवूडमध्ये #Metoo हे कॅम्पेन चाललं. वाइनस्टाइन हे लवकरच पोलिसांना शरण येणार आहेत असं वृत्त आहे.

वाइन्स्टाइन यांच्यावर एवढे आरोप झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल होणार आहे.

फ्रीमन यांचं नाव कसं आलं?

वाइनस्टाइन यांना अटकेची शक्यता असतानाच आता मॉर्गन फ्रीमन यांचं नाव लैंगिक छळप्रकरणात पुढे आलं आहे. फ्रीमन यांनी लैंगिक छळ केलेल्या आठ पीडितांपैकी प्रॉडक्शन असिस्टंट या एक आहेत. CNN ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला.

"मॉर्गन जेव्हा मला त्रास देत होते तेव्हा तिथं अॅलन अर्किन हे देखील होते. त्यांनीच मॉर्गन यांना थांबवलं. त्यावर काय बोलावं हे मॉर्गन यांना कळलंच नाही," असं त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं.

"जर मॉर्गन आजूबाजूला असतील तर क्लोज फिटिंगचे कपडे घालत जाऊ नये अशी आमच्यात चर्चा असे," असं 'नाऊ यू सी मी' या चित्रपटात फ्रीमन यांच्याबरोबर काम करणाऱ्या महिलेनं म्हटलं.

मॉर्गन हे महिलांच्या वक्षांकडे रोखून पाहतात, तसंच एका महिलेला त्यांनी गिरक्या घेण्याची विनंती केली होती असे आरोप त्यांच्यावर झाले होते.

या आरोपानंतर CNNनं त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेकांशी फोनवरुन चर्चा केली. मॉर्गन यांची वागणूक नेहमी सभ्यपणाची असे, असं काही जणांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)