30 वर्षांच्या मुलाला घराबाहेर काढण्यासाठी आईवडिलांनी घेतली कोर्टात धाव

न्यूयॉर्क

फोटो स्रोत, CBS

आमची मुलगा 30 वर्षांचा झालाय. तो काही काम करत नाही, घर चालवायला हातभारही लावत नाही, म्हणून आम्ही त्याला घरातून काढायची कायदेशीर परवानगी मागतो, असा खटला न्यूयॉर्कच्या एका जोडप्याने कोर्टात भरला. आणि तो खटला ते जिंकलेही.

मायकल रोटोंडो यांना घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी न्यूयॉर्कच्या एका कोर्टात धाव घेतली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मायकल यांनी स्वतःची कायदेशीर बाजू स्वतःच मांडली.

तेव्हा न्यायाधीश डोनाल्ड ग्रीनवुड यांनी मायकल यांच्या कायदेविषयक संशोधनाचं कौतुक केलं. पण त्यांना घर सोडण्याचा आदेश दिला.

आणखी सहा महिने घरात राहण्याची तुमची इच्छा लाजिरवाणी आहे, असं न्यायाधीश ग्रीनवुड मायकल यांना म्हणाले. पण आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढण्याची नाटीस लाजिरवाणी आहे, असं म्हटलं आहे.

न्यायाधीशांनी हे प्रकरण नीट वाचलं नसून, आपण या निकालास आव्हान देण्याच्या तयारीत आहोत, असं ते म्हणाले.

कोर्टानं निकाल दिल्यानंतर मायकल यांनी अचानक बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांची कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला.

आठ वर्षांपूर्वी माझी नोकरी गेल्यानंतर पालकांनी मला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली होती, अशी मायकल यांनी सांगितलं. आताही आपल्याकडे नोकरी आहे. पण त्याबद्दल काही सांगण्यास बांधील नाही, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

आपण घरात खर्चासाठी कधीही पैसे दिले नसल्याचं त्यांनी कोर्टात मान्य केलं.

"मी घरातून तीन महिन्यात बाहेर पडणारच होतो. आणखी थोडा काळ ते वाट पाहू शकले नसते का? मी आणखी सहा महिने घरात राहिलो तर काय होईल?" असा प्रतिवाद मायकल यांनी कोर्टात केला.

त्यांचे आई-वडिल वकिलाच्या शेजारी बसून ही सुनावणी ऐकत होते.

"दुसऱ्यावर अवलंबून असलेल्या एखाद्या व्यक्तीला स्वबळावर उभं राहण्यासाठी सहा महिने हा पुरेसा कालावधी ठरला असता," असं मायकल म्हणाले.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

ख्रिस्तिना आणि मार्क रोटोंडो

त्यावर, न्यायाधीशांनी मायकलना त्यांच्या आई-वडिलांशी बोलण्यास आणि स्वत:हून घर सोडून जाण्याची सूचना केली. त्यास त्यांनी नकार दिला.

"त्या घरातून तू बाहेर पडावंस," अशा शब्दांत न्यायाधीश ग्रीनवूड यांनी निकाल सुनावला, असं एबीसी न्यूजच्या वृत्तात म्हटलं आहे.

पालकांबरोबरचं नातेसंबंध खूप ताणले गेले आहेत. घरात तिघे बोलतही नाहीत, असं मायकल यांनी माध्यमांना सांगितलं. "कालांतरानं आमच्यात काहीच उरलं नाही,"ते म्हणाले.

मग रोज त्यांना टाळलं कसं? तुम्ही तळघरात राहत होता का? या प्रश्नावर ते म्हणाले की, "मी माझ्या बेडरूममध्येच राहात होतो."

फोटो स्रोत, Google Maps

फोटो कॅप्शन,

न्यूयॉर्कमधलं घर

गेल्या आठवड्यात कोर्टात सादर केलेल्या माहितीनुसार, ख्रिस्तिना आणि मार्क रोटोंडो यांनी 2 फेब्रुवारी, 2018 पासून मुलाला अनेकदा घर सोडण्याची नोटीस दिली होती.

18 फेब्रुवारीला दिलेल्या पत्रात त्यांनी मायकल यांना लिहिलं की, "ज्यांना कामाचा काहीच अनुभव नाही, अशा लोकांसाठीही काही ना काही नोकऱ्या असतात. तशी एखादी नोकरी मिळव. तुला काम करावंच लागेल."

आणखी एका पत्रात त्यांनी मायकलना खर्चासाठी 1,100 डॉलर्सही दिल्याचं म्हटलं आहे. तसंच एक नादुरुस्त फोक्सवॅगन गाडीही विकून टाक, असा सल्ला त्यांनी मायकलना दिला होता.

"मला ते पैसे परत करायचे होते," असं मायकल नंतर घराबाहेर CBSला सांगितलं. "पण मला ते काही कामासाठी खर्च करावे लागले, आणि मला काही त्याचा पश्चात्ताप नाही," असंही ते स्थानिक माध्यमांना म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)