डोनाल्ड ट्रंप - किम जाँग-उन यांची सिंगापूर चर्चा नेमकी का फिसकटली?

  • अंकित पांडा
  • वरिष्ठ संपादक, द डिप्लोमॅट
डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, JUNG YEON-JE/getty

फोटो कॅप्शन,

डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-उन हे 12 जूनला सिंगापूरमध्ये भेटणार होती

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांची भाषा द्वेषपूर्ण आहे, असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सिंगापूर येथे होणारी बैठक रद्द केली. ट्रंप यांना शांत नोबेल पारितोषिक मिळण्याची शक्यता होती पण उत्तर कोरियामुळं ती संधी गेल्याचं खापर फोडण्यात येत आहे.

12 जूनला उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन आणि ट्रंप यांची सिंगापूर येथे बैठक होणार होती. या बैठकीकडे साऱ्या जगाचं लक्ष होतं. किम जाँग-उन यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात वापरलेली भाषा ही द्वेषपूर्ण आणि रागाने भरलेली होती असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

उत्तर कोरियाचे मंत्री च्वे सन-ही यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्यावर निशाणा साधला आहे. "जे ट्रंप बोलतात अगदी तीच भाषा पेन्स यांची असते ते ट्रंप यांचे पॉलिटिकल डमी आहेत," असं त्यांनी म्हटलं.

असं म्हटलं जातं की, ही शिखर परिषद फिसकटण्याची सुरुवात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांच्याकडे या चर्चेची सूत्रं दिल्यापासूनच झाली. उत्तर कोरियाच्या चर्चेतून काय अपेक्षित आहे याची आखणी करण्याची जबाबदारी बोल्टन यांना देण्यात आली होती.

उत्तर कोरियाचं संपूर्ण अण्वस्त्र निशस्त्रीकरण हे बोल्टन यांचं लक्ष्य होतं. उत्तर कोरियानं आपली अण्वस्त्रं आणि रासायनिक अस्त्रं नष्ट करावीत असं वचन सिंगापूर बैठकीत मिळावं अशी बोल्टन यांची इच्छा होती.

उत्तर कोरियासोबत होणाऱ्या मुत्सद्देगिरीबाबत बोल्टन हे गंभीर नव्हते अशी पण एक शक्यता आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती होण्याआधीपासूनच बोल्टन यांचा किम आणि ट्रंप भेटीला विरोध होता.

फोटो स्रोत, Getty Images

2003मध्ये ज्याप्रमाणे लीबियाचं निशस्त्रीकरण करण्यात आलं होतं त्याच धर्तीवर उत्तर कोरियाचं निशस्त्रीकरण करण्यात यावं, असं बोल्टन यांना वाटत होतं. या निशस्त्रीकरणानंतर लीबियाचे तत्कालीन हुकूमशहा मुआमार गडाफी यांना आपला अणुकार्यक्रम थांबवावा लागला होता.

लीबियाचं भूत

लीबियाबरोबरची तुलना उत्तर कोरियाला आवडली नाही आणि त्यांनी याबाबत थेट उल्लेख देखील केला होता. उत्तर कोरियाचे मंत्री च्वे सन-ही म्हणतात, "लीबियाची आणि आमची तुलना होऊच शकत नाही. आम्ही पूर्णपणे अण्वस्त्रधारी देश आहोत. आमच्याकडे इंटरकाँटिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल आहेत. त्यांना थर्मोन्युक्लियर अस्त्रं देखील फिट करता येतात. आमच्या तुलनेत लीबियाची शक्ती काहीच नव्हती. त्यांच्याकडे थोडीफारच उपकरणं होती."

फोटो स्रोत, AFP/getty images

लीबियाच्या अनुभवावरून किम यांनी एक धडा घेतला आहे. तो म्हणजे जर निशस्त्रीकरण केलं तर आपली गत देखील गडाफीप्रमाणे होईल हे निश्चित आहे, असं त्यांना वाटतं.

ट्रंप यांच्या सूचनेला, उत्तर कोरियाने एखाद्या धमकीप्रमाणे घेतलं आहे. एका मुलाखतीदरम्यान उप-राष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी ट्रंप यांच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. पण या गोष्टीकडे उत्तर कोरियानं अगदी वेगळ्या दृष्टीनं पाहिलं. उत्तर कोरियानं सिंगापूरला यावं आणि अमेरिकेच्या अटी मान्य कराव्या अन्यथा लष्करी कारवाईला सामोरं जावं असा त्याचा अर्थ घेतला गेला.

या परिषदेबाबत उत्तर कोरियाच्या मनात अनेक संभ्रम आहेत ही गोष्ट समजून घेण्यास अमेरिका अयशस्वी ठरली. दक्षिण कोरियासोबत अमेरिकेने केलेल्या लष्करी सरावाला उत्तर कोरियाचा विरोध होता. कारण, या सरावादरम्यान अण्वस्त्र वाहून नेता येतील अशा विमानांचा वापर दक्षिण कोरियानं केला होता. याच विमानांच्या जोरावर दक्षिण कोरियानं उत्तर कोरियावर जरब बसवण्याचा प्रयत्न केला, असं उत्तर कोरियाला वाटतं.

दक्षिण कोरियालाही माहीत नाही काय झालं?

उत्तर कोरियाबरोबरची चर्चा फिसकटल्याची माहिती दक्षिण कोरियाला देखील नव्हती. अमेरिकेनं उत्तर कोरियाबाबत कठोर असावं अशी भूमिका दक्षिण कोरियाची होती आणि त्यांनी या गोष्टीला सर्वतोपरी सहकार्य केलं.

दुसरी गोष्ट अशी की जिथं अण्वस्त्र परीक्षण केलं जातं ती साइट उत्तर कोरियानं नष्ट केली. त्यानंतर थोड्याच वेळात अमेरिकेनं चर्चा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश गेल्याचं म्हटलं जात आहे.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी सरावाला उत्तर कोरियाचा विरोध होता.

अमेरिकेच्या या निर्णयावर उत्तर कोरियानं कठोर शब्दांत टीका केली आहे. पण त्यांनी हे देखील स्पष्ट केलं आहे की अमेरिकेबरोबर चर्चा करण्यासाठी आपण अजूनही उत्सुक आहोत.

असं देखील होऊ शकतं की, येत्या काळात ट्रंप हे उत्तर कोरियाच्या दुटप्पी भूमिकेवरून टीका करतील. जर ही चर्चा सुफळ झाली असती तर ट्रंप यांना शांततेचा नोबल पुरस्कार मिळण्याची शक्यता होती. ही संधी वाया गेल्याचं खापर ते उत्तर कोरियावर फोडतील अशी शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images

ही गोष्ट खरी आहे की उत्तर कोरियानं चर्चा न करण्यासाठी कधीच नकार दिला नाही. जेव्हा किम यांनी चीन, दक्षिण कोरियाला भेट दिली तेव्हा आणि त्यांनंतर देखील त्यांनी अमेरिकेबरोबर चर्चा करण्याची तयारी ठेवली होती.

ट्रंप आणि किम यांच्यात भविष्यात चर्चा होऊ शकते. ट्रंप यांनी चर्चेची संधी पूर्णपणे गमावली असं नाही. त्यांनी किम जाँग-उन यांना 'हिज एक्सलेन्सी' असं आदरपूर्वक संबोधित केलं आहे. तसेच तुम्ही मला केव्हाही पत्र पाठवू शकता किंवा फोन करू शकता असं देखील म्हटलं आहे.

निकालाबाबत संभ्रम

ट्रंप यांच्या प्रस्तावाबाबत किम जाँग उन हे फारसे उत्सुक नव्हते. अर्थात याबाबत काही संशय नाही की या चर्चेतून जास्त फायदा हा उत्तर कोरियाचाच होता. अमेरिकेबरोबर चर्चा व्हावी हे त्यांना वाटत होतं पण हाती काय लागेल याचा त्यांना अंदाज नव्हता.

अमेरिकेच्या प्रशासनाला देखील याबाबत संभ्रम होता की, 'उत्तर कोरियासोबत आपण चर्चा तर करत आहोत पण याचं फलित काय मिळणार?'

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)