आयर्लंड गर्भपात कायदा बदल : 'आता आमच्या सविताच्या आत्म्याला शांती मिळेल'

आयर्लंड

फोटो स्रोत, savita

आयर्लंडमध्ये झालेल्या सार्वमतात गर्भपातावरील बंदी उठवण्याचा अभूतपूर्व निर्णय झाला आहे. या सार्वमतात गर्भपात कायद्यात बदल करण्याच्या बाजूनं 66 टक्के नागरिकांनी कौल दिला आहे. या क्रांतीला निमित्त ठरला मूळच्या भारतीय सविता हलप्पनावार यांचा मृत्यू आणि त्यांच्या कुटुंबीयांचा संघर्ष.

"आमच्या संघर्षाला आता फळ मिळालं आहे. आमच्या सविताच्या आत्म्याला आता शांती मिळेल", अशी प्रतिक्रिया सविताच्या बेळगावस्थित पालकांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे.

आयर्लंडमध्ये शुक्रवारी झालेल्य सार्वमत चाचणीचा निकाल भारतीय वेळेप्रमाणे शनिवारी संध्याकाळी स्पष्ट झाला. 66.4 टक्के लोकांनी कायद्यात बदल करावा या बाजूनं मत दिलं तर, 33.6 टक्के लोकांनी कायद्यात बदल होऊ नये या बाजूनं मत दिलं.

कायद्यातील एका कलमामुळे गर्भपात होऊ न शकलेल्या भारतीय वंशाच्या सविता हलप्पनावर यांचा मृत्यू आयर्लंडमध्ये झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर गर्भपातावरील बंदी हटवण्याच्या आंदोलनानं वेग घेतला. आजच्या निकालानं या आंदोलनाचा समारोप झाला आहे.

आयर्लंडच्या राज्यघटनेतील आठव्या कलमानुसार गर्भपात करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे. यासाठी 14 वर्षांची शिक्षाही होऊ शकते. घटनेतील आठवं कलम याला कारणीभूत असल्यानं या कलमातच बदल घडवण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून इथे सुरू होती.

फोटो स्रोत, Swati Patil Rajgolkar/BBC

या मागणीस 2012मध्ये पाठिंबा वाढू लागला तो सविता यांच्या निधनामुळे. 28 ऑक्टोबर 2012 ला भारतीय वंशाच्या आणि मूळच्या कर्नाटकातल्या असलेल्या सविता हलप्पनावार यांचा वेळीच गर्भपात न झाल्यानं मृत्यू झाला होता. त्या गरोदर होत्या. त्यांना त्रास होऊ लागल्यानं त्यांचा गर्भपात करणं आवश्यक होतं. परंतु, इथल्या कायद्यानुसार, गर्भपात करणं अवैध असल्यानं त्या अॅडमिट असलेल्या युनिव्हर्सिटी हॉस्पीटल गॉलवेनं गर्भपात करण्यास नकार दिला.

या दरम्यान, प्रथम सविता यांच्या पोटातील बाळाचा तर काही दिवसांत सविता यांचा मृत्यू झाला. सविताचा गर्भपात झाला असता तर, त्या वाचल्या असत्या असं त्यांचे पती प्रविण हलप्पनावार यांनी तेव्हा बीबीसीसोबत बोलताना सांगितलं होतं.

पेशानं डेंटीस्ट असलेल्या सविता यांच्या अशा परिस्थितीतल्या मृत्यूनंतर संपूर्ण आयर्लंडमध्ये गर्भपातावरील बंदी विरोधात आंदोलन उसळलं होतं. गर्भपातावर बंदी असावी की असू नये, हा वाद सुरू झाला. या वादावरच 25 मे रोजी देशात सार्वमत घेण्यात आलं होतं. या सार्वमतात बहुमतानं नागरिकांनी गर्भपातावर बंदी टाकणाऱ्या घटनेतील आठव्या कलमात बदल करण्यासंबंधी सकारात्मक मत दिलं.

आयर्लंडमध्ये झालेल्या या सार्वमतानंतर बीबीसी मराठीनं सविता हलप्पनावार यांचे वडील ए. एस. येळगी आणि आई अक्कमहादेवी येळगी यांच्याशी बातचीत केली.

'आता सविताच्या आत्म्याला शांती मिळेल'

सविताच्या आई अक्कमहादेवी येळगी बीबीसी मराठीसाठी स्वाती पाटील राजगोळकर यांच्याशी बोलताना म्हणाल्या, "गर्भपाताच्या बाजूने कायदा झाला तो म्हणजे माझ्या मुलीचा झालेला विजय आहे. हा विजय भारताला, स्त्री शक्तीला विजय मिळल्यासारखं आहे यातच आम्हाला आनंद आहे. गेली 6 वर्षं माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर लढा दिला त्या लढ्याला यश आले आहे. त्या संघर्षाचं फळ आता आम्हाला मिळालं आहे."

"आता तिच्या आत्म्याला शांती मिळेल. गर्भपाताच्या परवानगीसाठी तिने जे प्रयत्न केले त्या लढ्याचा हा विजय आहे. या लढ्यात तिच्यासाठी जे लढले त्यांना आम्ही धन्यवाद देतो. त्यांचं सगळं चांगलं होऊ दे असं आम्हाला वाटतं."

'आम्ही मुलगी गमावली पण...'

या निकालानं समाधान झाल्याचं ए. एस. येळगी म्हणाले, " ऑक्टोबर 2012मध्ये माझ्या मुलीचा आयर्लंडमधल्या एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर गेली 6 वर्ष आमचा संघर्ष सुरू आहे. गर्भपातासंबंधीच्या कायद्यात बदल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. ती खरी आमची मागणी होती. आम्ही मुलगी गमावली पण, दुसऱ्या कुटुंबांच्या बाबतीत असं होऊ नये त्यासाठीच या मागणीनं खरं तर जोर धरला," असं ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

फोटो स्रोत, Swati Patil Rajgolkar/BBC

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर या कायद्यात बदल व्हावा या मताचे आहेत. वराडकर हे मूळचे भारतीय वंशाचे असून त्यांचे वडील महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गातले आहेत.

त्यामुळे वराडकर यांनी 'ही आयर्लंड मधली सुप्त क्रांती' असल्याचं सूतोवाच केलं. या निकालानं 'गर्भपात बंदीवर अभूतपूर्व निकाल' लागेल हे त्यांचं निकालापूर्वीचं भाकीतही खरं ठरलं आहे.

हा निकाल जवळपास निश्चित झाल्यानंतर आयर्लंडमधल्या डब्लिन कॅसल इथे पोहोचल्यावर वराडकर यांनी ट्वीट करत आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणतात, "देशात एक शांततेच्या मार्गानं क्रांती झाली असून हा लोकशाहीचा विजय ठरला आहे."

लिओ वराडकर यांनी स्वतः मतदान केल्यानंतर आयर्लंडमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असल्याचं मत व्यक्त केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

तसंच, आयर्लंडच्या इतिहासातला हा सगळ्यांत मोठा विजय ठरेल असंही त्यांनी मतदान केल्यानंतर ट्वीट केलं होतं.

यावेळी त्यांनी आयर्लंडच्या सर्व नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं.

(बीबीसी मराठीसाठी स्वाती पाटील राजगोळकर यांनी बेळगावहून दिलेल्या माहितीसह.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)