चुकीची ट्रेन पकडल्यामुळे सिराज पाकिस्तानातून मुंबईत आले अन् त्यांचं आयुष्यच बदललं...

सिराज आणि साजिदा Image copyright SIRAJ
प्रतिमा मथळा सिराज आणि साजिदा

सिराज आणि साजिदा त्यांच्या 3 मुलांसोबत भविष्याची स्वप्न पाहत जगत होते. सिराज कुकचं काम करत असे तर साजिदा गेल्या 13 वर्षांपासून गृहिणीची भूमिकेत होत्या.

पण भारत सरकारनं सिराजवर बेकायदा सीमा ओलांडल्याचा आरोप ठेवला आणि त्यांना त्यांच्या जन्मभूमीत, पाकिस्तानात पाठवून देण्यात आलं.

या सर्व गोष्टींची सुरुवात 24 वर्षापूर्वी झाली. कमी गुण मिळाल्यामुळे सिराज आणि त्यांच्या पालकांमध्ये वाद झाला. त्यावेळी सिराज फक्त 10 वर्षांचे होते.

कराचीला जाण्याचा निर्धार करून सिराज यांनी पाकिस्तानातल्या शरकूल गावातल्या घरातून पळ काढला. पण लाहोर रेल्वे स्टेशनवर सिराज चुकीच्या ट्रेनमध्ये बसले आणि कराचीला जाण्याऐवजी भारतात पोहोचले.

शरकूल गावातल्या घराबाहेर खाटेवर बसलेले सिराज दावा करतात की, "काही दिवस मी कराचीतच आहे असं मला वाटत होतं. पण नंतर कळलं की मी भारतात आलो आहे."

घराच्या मागे असलेल्या पर्वतांप्रमाणे सिराज शांत दिसत असले तरी ते आतून खूपच उदास आणि गंभीर होते.

"मी 3 वर्षं अहमदाबादमधल्या मुलांच्या कारागृहात घालवली. तिथून सुटल्यानंतर मी मुंबईला पोहोचलो. तिथं मी माझ्या आयुष्याला वळण द्यायचा प्रयत्न केला," सिराज पुढे सांगतात.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : चुकीची ट्रेन पकडून 'तो' भारतात आला अन्...

सुरुवातीचे काही दिवस सिराज यांना मुंबईतल्या फुटपाथवर उपाशी झोपावं लागलं. पण नंतर मात्र ते यशस्वी कूक बनले. 2005पर्यंत सिराज योग्य तितका पैसा कमावत होते.

याच दरम्यान शेजाऱ्यांच्या सहाय्यानं सिराज यांची भेट साजिदा यांच्याशी झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

बीबीसीशी बोलताना साजिदा डोळ्यातलं पाणी पुसत सांगतात, "सरकारनं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मुलं त्यांच्या वडिलांनी भेटण्यासाठी आसुसलेली आहेत. भारतात एका माणसासाठी जागा नव्हती का? आता मी सरकारला विनंती करते की, त्यांनी मला आणि माझ्या मुलांना पासपोर्ट द्यावा जेणेकरून आम्ही पाकिस्तानात जाऊन सिराज यांना भेटू शकू."

सिराज यांनी आत्मसमर्पण केलं तेव्हा...

सिराज यांनी 2009मध्ये स्वत:ला पाकिस्तानी सांगून भारतीय अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यानंतर या समस्येला सुरुवात झाली.

पाकिस्तानात जाऊन आई-वडिलांना भेटता यावं यासाठी सिराज यांनी आत्मसमर्पण केलं होतं. कारण त्यांचे आई-वडिल बऱ्याच वर्षांपासून सिराज यांना शोधत होते.

Image copyright BBC/SIRAJ

"2006मध्ये आम्हाला पहिलं मुल झालं. तेव्हापासून मला माझ्या आई-वडिलांची खूप आठवण यायला लागली. माझ्या भल्यासाठीच ते माझ्यावर रागावल्याची मला जाणीव झाली होती," सिराज सांगतात.

सिराज यांच्या मते, मुंबईच्या सीआयडी ब्रँचनं या प्रकरणाचा तपास केला आणि त्यांचं कुटुंब पाकिस्तानात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

पण पाकिस्तानात जायची परवानगी देण्याऐवजी फॉरेनर अॅक्ट अंतर्गत सिराज यांना पुन्हा जेलमध्ये डांबण्यात आलं.

5 वर्षं ते न्यायालयीन लढाई लढत राहिले. त्यात शेवटी पराभव झाल्यानंतर त्यांना पाकिस्तानात पाठवण्यात आलं.

मुस्लीम असल्यामुळे आम्हाला मदत मिळाली नाही

"सरकारच्या वतीनं कुणीही आमच्या मदतीला आलं नाही. आम्ही मुस्लीम असल्यामुळे असं झालं का? मी सरकारला विनंती करते की माझ्या मुलांवर दया करा आणि पासपोर्ट मिळण्यासाठी आमची मदत करा," साजिदा दु:खी होऊन सांगतात.

Image copyright JANHAVEE MOOLE
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक फोटो

पासपोर्ट मिळवण्यासाठी साजिदा यांना घर मालकाकडून ना-हरकत प्रमाणपत्र पाहिजे, पण घर मालक ते देत नाही, असं साजिदा यांचं म्हणणं आहे.

सिराज यांनी पाकिस्तानच्या ओळखपत्रासाठी अर्ज केला आहे, पण त्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे ते नाराज आहेत.

सिराज आणि साजिदा दोघंही कायदेशीर बाबींत अडकले आहेत आणि सीमेमुळे एकत्र होऊ शकत नाहीये.

खिन्न अवस्थेत असलेले सिराज सांगतात, "25 वर्षांपूर्वी मी माझ्या आई-वडिलांपासून वेगळा झालो आणि आता माझ्या स्वत:च्या मुलांपासून. 2 दशकांपूर्वी ज्या दु:खातून मी गेलो तेच दु:ख आज माझ्या मुलांच्या वाट्याला यावं, असं मला वाटत नाही."

'भारत-पाकिस्तान एकसारखेच'

"माझ्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही एकसारखेच आहेत," असं सिराज म्हणतात. "एका देशात माझा जन्म झाला तर दुसऱ्या देशानं माझं आयुष्य घडवलं," सिराज सांगतात. सिराज यांना कुटुंबाची खूप आठवण येते.

Image copyright RIZWAN TABASSUM/GETTY IMAGES

सध्या राहत असलेल्या आपल्या परंपरावादी गावात सिराज यांचं आयुष्य काहीसं अवघडल्यासारखं आहे. ज्या पश्तू संस्कृतीशी सिराज निगडित आहेत, तिच्याशी जुळवून घेणं त्यांना अवघड जात आहे. कारण लहानपणीच ते इथून निघून गेले होते.

'मीही या देशाचीच मुलगी'

साजिदा यांचं दु:ख काही वेगळं नाही. सिराज गेल्यानंतर घराचा सर्व भार त्यांच्यावरच आला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी साजिदा स्वयंपाकाचं काम करतात. शिवाय घरी इमिटेशन ज्वेलरी बनवण्याचं कामही करत आहेत.

"माझ्या मुलांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करू शकत असले, त्यांना हरप्रकारच्या सुविधा देऊ शकत असले, तरी मी त्यांच्या वडिलांची जागा घेऊ शकत नाही. त्या लोकांनी (सरकार) माझ्या मुलांना वडिलांच्या प्रेमापासून पारखं केलं आहे," साजिदा सांगतात.

साजिदा यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडेही मदत मागितली आहे.

सुषमा स्वराज यांना उल्लेखून साजिदा सांगतात, "मीही भारतीय आहे. याच देशाची मुलगी आहे. कृपा करून माझ्या नवऱ्याशी भेट घालून देण्यासाठी माझी मदत करा."

(या बातमीसाठी मुंबईतून जान्हवी मुळे, शरद बढे यांनी तर, इस्लामाबादमधून फकीर मुनीर, फरान रफी यांनी इनपुट दिले आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)