बालपण हरवतंय : जागतिक निर्देशांकात भारत 113व्या स्थानावर

मुलं, सेव्ह द चिल्ड्रन Image copyright Getty Images

गरिबी, युद्ध किंवा संघर्ष आणि लिंगभेद या तीन मुख्य कारणांमुळे जगातल्या अर्ध्या मुलांचं आयुष्य धोक्यात आहे, असं Save the Children या संस्थेनं नुकताच सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे.

1 जून हा आंतरराष्ट्रीय बालदिन म्हणून नोंदला गेला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांच्या परिस्थितीविषयी Save the Children या संस्थेनं सर्व्हे केलेल्या 175 देशांच्या यादीत भारताचा 113वा क्रमांक लागतो. जगातली तब्बल 30 टक्के गरीब मुलं भारतात राहतात, असं या संस्थेचं म्हणणं आहे.

यामध्ये, सिंगापूर आणि स्लोव्हेनिया देशांचा अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक लागतो. म्हणजे या देशांत बालकांची स्थिती तुलनेने सगळ्यांत चांगली आहे. त्याखालोखाल नॉर्वे आणि स्वीडन तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

नायजर, माली आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमधली मुलं सगळ्यात जास्त धोक्यात आहेत. त्याचबरोबर पश्चिम आफ्रिकेतल्या आणखी 8 देशांचा या यादीत सगळ्यात खाली क्रमांक लागतो.

Save the Children यांच्या End of Children Indexनुसार जगातल्या सुमारे 1.2 अब्ज मुलांचं आयुष्य धोक्यात आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदाची परिस्थिती सुधारली आहे, पण ही प्रक्रिया संथगतीनं सुरू आहे, असा या संस्थेचा दावा आहे.

1 जून रोजी जागतिक बालदिन साजरा केला जातो. त्याआधी हा अहवाल सादर केला आहे.

ही 1.2 अब्ज मुलं कुठं राहतात?

धोक्याच्या परिस्थितीत राहत असलेल्या 1.2 अब्ज मुलांपैकी 1 अब्ज मुलं गरिबीनं ग्रासलेल्या देशांत राहतात, तर 24 कोटी मुलं युद्धजन्य देशांत राहतात. 57.5 कोटी मुली लिंगभेद होत असलेल्या देशांमध्ये राहतात, असं या निर्देशंकात नमूद केलं आहे.

"तुम्ही कोण आहात? कुठं जन्माला आलात? यावरून बालपणावर आणि भविष्यावर गदा येत आहे," अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

बुधवारी (30 मे) प्रसिद्ध केलेल्या अहवालात, Save the Childrenनं सर्व्हे केलेल्या 175 देशांपैकी 95 देशांतील परिस्थिती सुधारत आहे. पण त्याचवेळी 40 देशातील मुलांची परिस्थिती बिघडलली आहे.

'End of Children Index' कसा ठरवाला जातो?

मुलांची हत्या, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, बालविवाह, कुमारीमाता, बाल कामगार यावरून 'मुलांचा अंत निर्देशांक' म्हणजे End of Children Index ठरवला जातो.

Image copyright AFP/GETTY
प्रतिमा मथळा जगभरात मुलांची परिस्थिती सुधारत आहे पण ही प्रक्रिया संथगतीनं सुरू आहे, असं Save the Children चं म्हणण आहे.

अमेरिका, रशिया आणि चीनमध्येसुद्धा मुलांची परिस्थिती बेताची?

जगात आर्थिकदृष्ट्या प्रगत देशातही बालकांची स्थिती फारशी चांगली नाही, असं हा अहवाल सांगतो. या निर्देशांकात अमेरिका 36व्या क्रमांकावर, रशिया 37व्या आणि चीन 47व्या क्रमांकावर आहेत,

यावर कशी मात करता येईल?

या अहवालानुसार, जगातल्या मुलांची परिस्थिती सुधारण्यासाठी काही ठरविक समस्यांवर एकजुटीनं मात करावं लागणार आहे.

यामध्ये बालविवाह, कुमारी मातृत्व, गरीब आणि श्रीमंत देशातली वाढती दरी, सबसहारन आफ्रिकेतील बालमृत्यूदर, बाल कामगार, शिक्षणाचा अभाव या समस्यांचा समावेश होतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)