ट्रंप यांनी स्टीलवरचा आयात कर वाढवला, भारतावर होणार असा परिणाम

प्रातिनिधिक छायाचित्र Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ट्रंप यांनी अमेरिकेत आर्यात होणाऱ्या स्टील उत्पादनांवर 25 % तर अॅल्युमिनियम उत्पादनांवर 10 % आयात कर लावला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यापार युद्धात पुन्हा एक नवा वार केला आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवरील कर वाढवण्याचा ट्रंप यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकन कंपन्या विदेशातल्या स्वस्त स्टील उत्पादनांचा फायदा घेऊ शकणार नाही.

ट्रंप यांनी स्टील उत्पादनांवर 25% तर अॅल्युमिनियम उत्पादनांवर 10 % आयात कर लावला आहे. ट्रंप यांच्या निर्णयावर अमेरिका, युरोप, कॅनडा आणि मॅक्सिकोसह अनेक देशांनी टीका केली आहे.

ट्रंप यांच्या या निर्णयाचा ज्या देशांवर परिणाम होणार आहेत, ते देशही जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेतून आयात होणाऱ्या स्लीपिंग बॅग्ज, बॉल पॉइंट पेनसारख्या उत्पादनांवर आयात कर वाढवण्याचा हे देश आता विचार करत आहेत.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी ट्रंप यांना फोन करून त्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे.

"युरोपियन महासंघ या निर्णयाचं तितकंच जोरदार प्रत्युत्तर देईल," असं मॅक्रॉन म्हणाले आहेत.

यावर ट्रंप यांचं मत आहे की "अमेरिकेत स्टील आणि अॅल्युमिनिअमचं उत्पादन होणं, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. विदेशातून होणाऱ्या स्टील पुरवठ्यामुळे अमेरिकेला धोका आहे."

भारताला तोटा

PTI वृत्तसंस्थेनुसार स्टील आणि अॅल्युमिनिअमवर आयात कर लागला तर भारतीय कंपन्यांना तोटा तर होईल, पण हा तोटा चीन आणि ब्राझीलच्या तुलनेत अतिशय कमी असेल. अमेरिकेत अॅल्युमिनिअम आणि स्टीलच्या एकूण निर्यातीत भारताची अंदाजे तीन टक्के भागीदारी आहे.

Image copyright Reuters

भारत अमेरिकेत करत असलेल्या स्टीलच्या निर्यातीत कायम उतार चढाव आहेत. पण अॅल्युमिनिअम क्षेत्रावर त्याचा निश्चित प्रभाव पडेल.

गेल्या काही वर्षांत अमेरिकेत निर्यात होणाऱ्या अॅल्युमिनिअमचं प्रमाण सातत्याने वाढलं आहे.

आर्थिक वर्ष अमेरिकेत अॅल्युमिनिअमची निर्यात
2013-14 210 मिलियन डॉलर
2014-15 306 मिलियन डॉलर
2015-16 296 मिलियन डॉलर
2016-17 350 मिलियन डॉलर

अॅल्युमिनिअमवर अमेरिकेत 10 टक्के आयात शुल्क च्या घोषणेमुळे निर्यातीत सुद्धा घट झाली आहे.

कॅनडा आणि ब्रिटिश पण विरोधात

ट्रंप यांच्या या तर्कात कॅनडाला कोणतंही तथ्य दिसत नाही. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले, "कॅनडाकडून अमेरिकेला कोणत्याही प्रकारचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल, ही गोष्ट माझ्या गळी उतरत नाही."

कॅनडाने सांगितलं की अमेरिकेतून आयात होणाऱ्या जवळजवळ 1,300 कोटी डॉलरच्या उत्पादनांवर ते 1 जुलैपासून 25 टक्के आयात कर लावतील. या उत्पादनात अमेरिकेतल्या स्टीलबरोबरच व्हिस्की, कॉफी आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.

कॅनडा, मेक्सिको आणि युरोपमधून अमेरिकेला स्टीलचा सर्वाधिक पुरवठा होतो. 2017 साली अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनिअमच्या एकूण 4,800 कोटी डॉलरच्या निर्यातीत या देशांची 50 टक्के भागीदारी होती.

ट्रंप यांच्या या निर्णयामुळे ब्रिटनच्या स्टील क्षेत्रावर तर फरक पडेलच पण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरदेखील त्याचा परिणाम होईल, असं ब्रिटनला वाटतं.

ब्रिटनच्या स्टील उत्पादकांनुसार सध्या त्यांच्या एकूण स्टीलच्या निर्यातीपैकी 7 टक्के निर्यात अमेरिकेला होते. पण ट्रंप यांच्या निर्णयानंतर हे प्रमाण घटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लोकांच्या नोकऱ्यांवरही गाज येईल.

युरोपियन कंपन्यांच्या मते जर अमेरिकेकडून स्टीलची मागणी कमी झाली तर सगळे व्यवहार युरोपकडे वळतील.

IHS Markit या संस्थेनुसार या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल आणि अमेरिकेबाहेर स्टीलच्या किमतीवर परिणाम होईल.

या निर्णयामुळे 4.7 लाख नोकऱ्यांवर परिणाम होईल आणि किमती वाढतील. त्यामुळे या निर्णयाचे परिणाम भोगण्यावाचून अमेरिकेला पर्याय नाही.

अनिश्चिततेमुळे अमेरिकेत स्टीलचे दर वाढले आहेत आणि आयातीवर फरक पडल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)