अमित शहा-उद्धव ठाकरे भेटीचं गूढ आणि शिवसेनेची मजबुरी

  • प्रकाश अकोलकर
  • राजकीय संपादक, सकाळ, मुंबईहून बीबीसी मराठीसाठी
अमितशाह

फोटो स्रोत, Amit Shah/Twitter

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या दोन पक्षांमध्ये गेली दोन-तीन वर्षं सुरू असलेल्या खडाखडीची अखेर शिवराज्यभिषेक दिनाच्या मुहूर्तावर झाली, जेव्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी 'मातोश्री' या शिवसेनेच्या गडावर जाऊन पायधूळ झाडली.

शहा यांनी 'मातोश्री'वर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. मात्र या चर्चेचा तपशील बाहेर न आल्यामुळे त्यावेळी नेमकं काय घडलं, याबाबत कमालीचं गूढ निर्माण झालं आहे. शिवाय, शिवसेना आणि भाजप या दोन तथाकथित मित्रपक्षांमधील गुंता सुटण्याऐवजी अधिकच वाढला आहे.

खरंतर हा गुंता शिवसेनेनं स्वत:हूनच तयार केला होता. 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा हे दोघं सख्खे मित्र होते आणि युतीधर्माचं पालन करून त्यांनी या निवडणुका लढवल्या होत्या.

मात्र नरेंद्र मोदी यांनी देशभरात उभ्या केलेल्या तुफानाची परिणती स्पष्ट बहुमत मिळण्यात झाली आणि भाजपला शतप्रतिशत महाराष्ट्राचं स्वप्न पडू लागलं. त्यांनी जागावाटपाच्या घोळात शिवसेनेला गाफील ठेवलं. मग शेवटच्या क्षणी सेना एकटी पडली आणि त्यांना एकट्यानेच निवडणुका लढवाव्या लागल्या.

शिवसेनेची सल

शिवसैनिकांसाठी तसंच उद्धव ठाकरे यांच्या मनातून हा सल अजून गेलेला नाही. मात्र शिवसेनेने कच खाल्ली नाही आणि उद्धव यांनी एकट्याच्या बळावर थोड्या थोड्क्या नव्हे तर चक्क 63 जागा निवडून आणल्या. पण भाजपच्या रणनीतीनं स्वप्नं बघणाऱ्या शिवसेनेला विरोधी बाकांवर बसवून ठेवलं.

अर्थात ही कामगिरीही मोठी होती. विरोधी पक्षनेतेपद आणि त्याखालोखाल येणारी लाल दिव्याची गाडी शिवसेनेला मिळाली असती. त्या गाडीत बसून शिवसेनेला राज्यभर भाजपच्या विरोधात रान उभं करता येणं सहज शक्य होतं.

मात्र शिवसेनेतील एका गटाची हाव सुटली. सलग 15 वर्षँ सत्तेबाहेर राहिल्यानं अनेकांची दुकानं बंद पडली होती. त्या गटाच्या दबावाखाली अख्खीच्या अख्खी शिवसेना त्याच विरोधीपक्षनेतेपदाच्या लाल दिव्याच्या गाडीत बसून अवघ्या महिन्याभरात सत्तेच्या मिळालेल्या चतकोर नितकोर तुकड्यावर समाधान मानून सरकारात सामील झाली.

गेल्या पाच वर्षांतील शिवसेनेची ही सर्वांत मोठी चूक होती. अर्थात पक्ष फुटण्याच्या भीतीने त्यांना तो निर्णय घ्यावा लागला होता.

मात्र मोदींच्या करिष्म्यामुळे भाजपचा रथ जमिनीपासून चार अंगुळे वरूनच चालू लागला होता. त्यामुळे पदोपदी अपमान पदरी येऊ लागला. सत्तेत सहभागी असूनसुद्धा अवहेलनेचाच वाटा मोठा दिसू लागला आणि कलगीतुऱ्याचे जाहीर प्रयोग होऊ लागले.

या लढाईची कारणं अर्थातच दोन होती आणि त्यास दोन्ही पक्षांच्या अर्थकारणाचा एक भला मोठा पदर होता. शिवसेनेच्या हातात गेली अनेक वर्षं मुंबई महापालिका आहे आणि त्या सत्तेच्या जोरावरच शिवसेनेचं अर्थकारण उभं आहे. मात्र युती तोडून विधानसभा स्वतंत्र लढल्यावरही भाजपचा शिवसेनेपेक्षा एक का होईना जास्त आमदार मुंबईतून निवडून आला, आणि भाजपला मुंबईवर कब्जा करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामागे अर्थातच पक्षाध्यक्ष अमित शहा यांची प्रेरणा होती.

फोटो स्रोत, Getty Images, Facebook

फोटो कॅप्शन,

शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री फडणवीस

अनेक जुने जाणते शिवसैनिक खासगीत सांगतात की शाह आणि मोदी या गुजराती नेत्यांच्या मनातून सुरतेच्या लुटीचा सल अद्यापही गेला नाही. शिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर मुंबईही हातातून गेली होती. त्यामुळे ही महापालिका ताब्यात घेण्याचे प्रयत्न प्रथम सुरू झाले ते गतवर्षी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत. त्यामुळेच उद्धव आणि फडणवीस यांच्यात मोठी खडाखडी झाली.

भाजपने मोठी मुसंडी मारली खरी, पण महापालिका कशीबशी का होईना हाती राखण्यात शिवसेना यशस्वी झाली आणि उद्धव यांचा आवाज एकदम वरच्या पट्टीत गेला. सत्तेतून बाहेर निघण्याची आणि राजीनाम्याची भाषा सुरू झाली. मात्र प्रत्यक्षात काम सुरू होतं ते सत्तेची मिळेल तेवढी फळं चाखण्याची.

तुझं माझं जमेना

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

अखेर सत्तेवर लाथ मारण्यासाठी टिंगल टवाळी सुरू झाली. आणि यदाकदाचित सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झालाच तर ती शिवसेनेची आणखी एक मोठी चूक ठरेल आणि शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर जाऊन उभी राहू शकते.

शिवसेनेची झालेली ही कोंडी भाजप पुरती जाणून आहे आणि त्यामुळेच रोजच्या रोज भाजप, अमित शहा तसंच पालघर पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावाने शिवसेना कडाकडा बोटे मोडत असेल तरी भाजप ते निमूटपणे सहन करत आहे. सत्ता राखण्यासाठी भाजपलाही शिवसेनेची सोबत हवीच आहे ना.

पालघर पोटनिवडणुकीत या खडाखडीनं कळस गाठला. फडणवीस यांच्या विरोधातील क्लिप व्हायरल करण्यात आली. त्यांच्या भाषणावर आक्षेप करणारी तक्रारही करण्यात आली आणि अखेर अमित शहा यांना मातोश्रीच्या दारात उभं राहण्यास भाग पाडलं. चर्चा चांगली दोन तास झाली.

आता सारं काही मुंबईतील मिठी नदीत वाहून गेलं आणि पुन्हा नव्यानं दोस्ताना उभा राहिला, असा याचा अर्थ लावायचा काय? कोणी तसा तो लावू पाहत असेल, तर ती मोठी चूक ठरेल.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेनेला सीमारेषेच्या पार पलीकडं नेऊन उभं केलं आहे. शिवाय, कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर युती नाही, असा ठरावही शिवसेनेनं मंजूर केला आहे. त्यामुळे आता युती करावयाची असेल तर शिवसेनेच्या वाघाला किती पावलं मागे यावं लागेल, ते सांगता येणं कठीण आहे.

शिवाय, शिवसेनेला हवंय ते भाजपनं पांढऱ्या शेल्यात हात बांधून मागे येणं, तेव्हा पुढे नेमकं होणार तरी काय?

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात ही तहाची बोलणी सुरू होती तेव्हा भाजप प्रवक्ते मात्र टीव्ही चॅनेलवरून 'आम्ही वेगळेवेगळे लढलो तेव्हा विधानसभेत औरंगाबाद आणि मुंबई महापालिकेत तर आमच्या जागा वाढल्याच, शिवाय पालघर तर आम्ही जिंकलीच,' असं उच्चारवानं सांगत होते.

मग बंद दाराआड झालेल्या या वाटाघाटी वेगवेगळं लढून आपापल्या जागा वाढवून घेण्याच्या तर नव्हत्या ना? असं लढल्यावरही पुन्हा सत्ता आणि त्यापाठोपाठ येणारं अर्थकारण यांच्यासाठी एकत्र येणं शक्य आहेच की.

पुढे काय होणार ते आजमितीला तर कोणालाच ठाऊक नाही, ना उद्धव ठाकरेंना आणि ना अमित शहांना. त्यामुळेच या भेटीचं गूढ अधिकच गडद होत चाललंय.

एक मात्र खरं. विधानसभेच्या वेळी गाफील राहण्यामुळे फसगतीपासून उद्धव यांनी चांगलाच धडा घेतला आहे. त्यामुळेच आता यापुढची त्यांची खेळी अगदी सावधगिरीची असेल... किंवा ती असायला हवी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)