फ्रेंच ओपन : राफेल नदाल लाल मातीवर नेहमी जिंकतो कसा?

टेनिस, राफेल नदाल Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राफेल नदाल

लाल माती, राफेल नदाल आणि जेतेपद हे समानार्थी शब्द वाटावेत असा नदालचा फ्रेंच ओपन स्पर्धेत दबदबा आहे. काय आहे नदालच्या लाल मातीवरल्या वर्चस्वाचं रहस्य? जाणून घेऊया.

खेळाचा सामना पाहायला येताना काय अनुभवायला मिळणार याची जराही कल्पना नसते. मात्र लाल मातीवर अर्थात फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत गेली 13 वर्षं नदालच्या विजयरथाची परंपरा राहिली आहे.

स्पेनच्या नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिइमचा सरळ सेटमध्ये पराभव करत 11वं फ्रेंच ओपनचं विजेतेपद मिळवलंय. त्याचं हे 17वं ग्रॅँडस्लॅम विजेतेपद आहे.

लाल मातीवर पाचव्या सेटपर्यंत जाणाऱ्या मुकाबल्यात नदालला चीतपट करणं क्रीडाविश्वातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे असं काहीजण सांगतात असं माजी सात ग्रँड स्लॅम विजेते जॉन मॅकेन्रो यांनी सांगितलं. मी याच्याशी सहमत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

प्रतिभाशाली उदयोन्मुख खेळाडू म्हणून 2005 मध्ये नदालने लाल मातीवर पदार्पण केलं. रोलँड गारोसवर नदालच्या नावावर 10 विक्रमी जेतेपदं आहेत. पुरुषांच्या टेनिसमध्ये एकाच ग्रँड स्लॅम स्पर्धेची एवढी जेतेपदं एकाच खेळाडूने पटकावण्याचं हे एकमेव उदाहरण आहे.

लाल मातीचा अनिभिषक्त सम्राट ही बिरुदावली नदालने पटकावली तरी कशी? लाल मातीवर नदालला पराभूत करणं एवढं अशक्यप्राय का व्हावं? लाल मातीवर त्याला लोळवण्याचा गुरुमंत्र मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना का गवसत नाही?

Image copyright BBC/Getty Images

यासंदर्भात आम्ही जॉन मॅकेन्रो, मायकेल चांग आणि पॅट कॅश यांना विचारलं. टेनिसचं वृत्तांकन करणाऱ्या जाणत्या पत्रकारांनीही बोलतं केलं.

ताकदवान फोरहँड

रोलँड गॅरोसवर नदालच्या नावावर सलग 37 सेट जिंकण्याचा पराक्रम आहे. सलग सेट जिंकण्याचा ऑल टाइम रेकॉर्ड बियॉन बोर्ग यांच्या नावावर आहे. बोर्ग यांनी 1974 ते 1981 या कालावधीत फ्रेंच खुल्या स्पर्धेची सहा जेतेपदं नावावर केली. त्यावेळी तो अनोखा विक्रम होता. नदालने 2012 मध्ये या विक्रमाला मागे टाकलं.

नदालने बोर्ग यांच्या विक्रमाला गवसणी घातली त्यावेळी मी तिथे होतो. तो क्षण मी याचि देही याचि डोळा अनुभवला. एका महान खेळाडूला सर्वोत्तम अशा फॉर्ममध्ये खेळताना मी पाहिलं अशा शब्दांत मॅकेन्रो यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा फोरहँडचा फटका मारताना नदाल

नदालची जमेची बाजू म्हणजे त्याचा ताकदवान फोरहँडचा फटका. प्रचंड ऊर्जेसह लक्ष्यभेद करणारा नदालचा फोरहँड प्रतिस्पर्ध्यांना घायाळ करतो. हा फोरहँड नदालच्या खेळाचे गुणवैशिष्ट्य आहे. नदालइतके ताकदवान फोरहँड विनर्स अन्य कुणीही मारलेले नाहीत. रोलँड गारोसवर यंदा खेळताना अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीत नदालने 12 टक्के पॉइंट्स फोरहँडच्या बळावर मिळवले आहेत.

फोरहँडच्या जोडीला अतिशय चपळ वावर आणि लवचिक शरीराची सोबत असल्याने लाल मातीवर नेहमी नदालचाच वरचष्मा राहतो असं चांग यांचं म्हणणं आहे.

सातत्याने पल्लेदार फोरहँडचे फटके लगावत कोर्टवर तितक्याच चपळतेने वावरण्याची हातोटी नदालकडे आहे असं 17व्या वर्षी रोलँड गारोसचं जेतेपद पटकावणाऱ्या चांग यांनी सांगितलं.

'प्रतिस्पर्धी खेळाडूला कोर्टवर पळवत ठेवायचं आणि त्याचवेळी अफलातून कोन साधत भेदक फटके मारायचे हा नदालचा गुरुमंत्र आहे. नदाल अत्यंत आक्रमकपणे खेळतो. मात्र ज्यावेळेला आवश्यकता असते तेव्हा तो खेळाचा वेग नियंत्रणात आणतो. तो बहुतांश काळ सामन्यावर नियंत्रण राखण्यात यशस्वी ठरतो', अशाप्रकारे चांग यांनी नदालच्या खेळाचं गुणवैशिष्ट्य मांडलं.

डावखुरा असण्याचा फायदा

तडाखेबंद खेळाबरोबरच डावखुरा असण्याचा फायदा नदालला मिळतो. त्याच्या यशात हा मुद्दा कळीचा आहे. नदाल उजव्या हाताने खेळत असता तर त्याचा खेळ एवढा प्रभावी झाला असता असे वाटत नाही असं चांग सांगतात. डावखुरा खेळाडू फटके लगावतो ते फिरुन समोरच्या खेळाडूच्या विरुद्ध दिशेने जातात.

नदालचा ताकदवान फोरहँड उजव्या हाताने खेळणाऱ्या खेळाडूसाठी बॅकहँडच्या पट्टयात येतो. अशा वेळी उजव्या हाताने खेळणाऱ्या खेळाडूला कोर्टच्या एका बाजूला जाऊन खेळावं लागतं. त्याचं संतुलन बिघडतं. पुढचा फटका खेळण्यासाठी कोर्टची दुसरी बाजू गाठेपर्यंत त्याची दमछाक उडते.

दुसरी सर्व्हिस

टेनिसविश्वात दुसरी सर्व्हिस प्रमाणभूत मानली जाते. पहिली सर्व्हिस करताना टेनिसपटू सर्वशक्तिनिशी आक्रमकपणे स्वत:ला सादर करतो. कारण काही चुकलं, फसलं तर दुसरी सर्व्हिस हातात असते.

'दुसरी सर्व्हिस पहिलीच्या तुलनेत संथ आणि कमी वेगवान असते. पुरुषांच्या टेनिसमध्ये दुसऱ्या सर्व्हिसमध्ये खऱ्या अर्थाने कस लागतो', असं टेनिसचं वृत्तांकन करणारे क्रीडापत्रकार अमी ल्युंडी यांनी सांगितलं.

गेल्या वर्षभरात नदालच्या दुसऱ्या सर्व्हिसचा ल्युंडी यांनी तपशीलवार अभ्यास केला. लाल मातीवर वर्चस्व गाजवण्यात या दुसऱ्या सर्व्हिसने नदालला मोठा हात दिल्याचं या अभ्यासाद्वारे स्पष्ट झालं आहे.

प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी नदाल या हुकूमी अस्त्राचा वापर करतो. व्यावसायिक टेनिसपटूंसाठी दुसऱ्या सर्व्हिसद्वारे मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी पन्नासपेक्षा जास्त असणं चांगलं मानलं जातं. क्ले अर्थात मातीच्या कोर्टवर दुसऱ्या सर्व्हिसद्वारे नदालने 66 टक्के गुणांची कमाई केली आहे.

मातीचा पायगुण

स्पेनच्या खेळाडूंसाठी क्ले अर्थात मातीच्या कोर्टवर खेळणं साहजिक आहे. कारण स्पेनमध्ये जवळपास एक लाख मातीची कोर्ट्स आहेत. छोट्या गावांमध्येही क्ले कोर्ट असतात.

फ्रेंच ओपनची लाल माती नदालला इतकी का भावते याचं गुपित स्पेनमधल्या क्ले कोर्ट्समध्ये आहे. स्पेनच्या खेळाडूंनी फ्रेंच ओपनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. नदालने या वारशावर कळस चढवत फ्रेंच ओपनमध्ये अद्भुत असं यश मिळवलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लाल मातीवर नदालची कामगिरी अफलातून अशीच आहे.

नदालची दहा जेतेपदं, सर्जी ब्रुगेरा (2), कार्लोस मोया, अल्बर्ट कोस्टा, ज्युआन कार्लोस फेरेरो अशा स्पेनच्या खेळाडूंनी मिळून फ्रेंच ओपनमध्ये 15 जेतेपदांवर नाव कोरलं आहे. फ्रेंच ओपनमध्ये पुरुष गटातल्या 25 विजेत्यांपैकी 15 जेतेपदं या खेळाडूंनी मिळवली आहेत. यावरून स्पेनचं वर्चस्व लक्षात यावं.

रोलँ गारोस आमच्यसाठी खास स्पर्धा आहे असं स्पेनचे टेनिस पत्रकार जोअन सोलसोना यांनी सांगितलं. 'मातीच्या कोर्टवर खेळणं, तयारी करणं स्पेनच्या खेळाडूंसाठी घरच्यासारखं आहे. त्यामुळे फ्रेंच ओपनमध्ये खेळताना आपण सर्वोत्तम सिद्ध व्हायला हवं अशी जबाबदारी स्पेनच्या टेनिसपटूंना वाटते', असं त्यांनी सांगितलं.

स्पेनमधल्या मार्जोकाच्या नदालने चौथ्या वर्षी टेनिसची रॅकेट हाती घेतली तीच मुळी क्ले कोर्टवर. काका टोनी नदाल यांच्या मार्गदर्शनाखाली नदालने मॅनाकोर क्लबमध्ये टेनिसची धुळाक्षरं गिरवली. काकांनीच नदालरुपी हिऱ्याला पैलू पाडले. मागच्या वर्षीपर्यंत टोनी हेच नदालचे प्रशिक्षक होते.

जेमतेम 40,000 लोकसंख्या असलेल्या मार्जोकातून नदालने कारकीर्दीची सुरुवात केली आहे. त्याच्या क्लबमध्ये सहा ते सात क्ले कोर्ट्स आहेत. स्पेनमध्ये सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणावर अनुभवायला मिळतो. त्याचा मोठा परिणाम होतो. संपूर्ण वर्षभर मातीची कोर्ट्स सुस्थितीत राहतात. हवामान निरभ्र असल्याने वर्षभर सातत्याने मातीच्या कोर्ट्सवर सराव करता येतो.

मातीवर टेनिस खेळायला शिकणं लहान मुलांसाठी फायदेशीर असतं. मातीवर हालचाल करणं सोपं असतं आणि पडलं, दुखापत झाली तरी गंभीर नसते.म्हणूनच लाल मातीवरचा नदालचा वावर घरच्यासारखा सहज आणि आत्मविश्वासपूर्ण असतो.

अनुकूल वातावरण

गवताच्या तुलनेत मातीवर बॉलचा वेग कमी असतो, राहतो. त्यामुळे नदालला वेगवान हालचाली करून प्रतिस्पर्ध्याला निरुत्तर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. मातीच्या कोर्टवर नदालचा फोरहँड प्रतिस्पर्धी खेळाडूला निष्प्रभ करतो.

संथ स्वरुपामुळे नदालला बॉल जोरात आणि अचूक ठिकाणी मारता येतो. युरोपात ज्या काळात क्ले कोर्टवरील स्पर्धा होतात त्या काळात उष्ण वातावरण असतं. या ठिकाणी खेळताना बॉलला मिळणारी उसळी अर्थात बाऊन्स नदालच्या पथ्यावर पडतो.

माँट कार्लो आणि रोम या क्ले कोर्टवर होणाऱ्या स्पर्धांमध्ये नदालची कामगिरी अफाट अशी आहे. मात्र याहीपेक्षा जास्त उंचीवर खेळल्या जाणाऱ्या माद्रिद स्पर्धेत नदालची कामगिरी आणखी बहरते. कारण इथे बॉलला चांगला वेग मिळतो.

फ्रेंच ओपन स्पर्धेत तापमान साधारण 20 सेल्सिअस असतं. संपूर्ण स्पर्धेदरम्यान तापमान असंच राहत असल्याने नदालची दमवणूक कमी होते. त्याची ऊर्जा वाचते.

यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये स्वार्टझमनविरुद्धच्या लढतीवेळी हवामान थंड आणि ढगाळ होतं. नदालला विजयासाठी संघर्ष करावा लागला अशी टीका झाली. मात्र पुढच्या सामन्यांमध्ये उबदार हवामान असताना नदालने झटपट विजय मिळवत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.

नदालला हरवायचं तरी कसं?

फ्रेंच ओपनच्या लाल मातीवर पाचव्या सेटपर्यंत गेलेल्या मुकाबल्यात नदाल केवळ तीनदा हरला आहे. यापैकी तिसरा सामना 2016 मध्ये झाला होता. मात्र त्यावेळी मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे मार्केल ग्रॅनोलर्सविरुद्धच्या लढतीतून त्याने माघार घेतली होती.

फ्रेंच ओपन स्पर्धेत नदालला शेवटचं नोव्हाक जोकोव्हिचने नमवलं होतं. 2015 मध्ये जोकोव्हिचने नदालला उपांत्यपूर्व फेरीत चीतपट करण्याची किमया केली होती.

फ्रेंच ओपन स्पर्धेत नदालचा पहिला पराभव झाला त्यावेळी जगभरातल्या टेनिस रसिकांना धक्का बसला होता. 2009 स्पर्धेत स्वीडनच्या रॉबिन सॉडर्लिंगने नदालला हरवलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 2009 मध्ये रॉबिन सॉडर्लिंगने नदालला नमवण्याची किमया केली होती.

त्या दिवशी सगळं काही माझ्या मनाप्रमाणे घडलं. फ्रेंच ओपन स्पर्धेत नदालविरुद्ध खेळताना प्रचंड आक्रमकपणे खेळावं लागतं. त्याला हरवण्यासाठी दुसरा काही उपाय नाही. नेहमी खेळतो त्यापेक्षा सपाट पद्धतीने फटके खेळावे लागतात. बेसलाइनच्या जवळून खेळावं लागतं. आणि तो चुका करेल असा आशावाद ठेवावा लागतो असं सॉडर्लिंगनं बीबीसीशी बोलताना सांगितलं.

त्यांनी पुढे सांगितलं, 'नदालविरुद्ध खेळताना छोटी छोटी उद्दिष्टं ठेवून खेळावं. धोका पत्करावा लागतो. बेसलाइनपासून दोन मीटर दूर राहून त्याच्याविरुद्ध जिंकता येणार नाही. त्याच्या बालेकिल्यात नमवण्यासाठी काहीतरी विशेष खेळ करावा लागतो'.

राऊंड प्लेयर स्कोअर
प्राथमिक फेरी सिमोन बोलेली 6-4, 6-3, 7-6 (9-7)
दुसरी फेरी गाइडो पेला 6-2, 6-1, 6-1
तिसरी फेरी रिचर्ड गॅस्क्वेट 6-3, 6-2, 6-2
चौथी फेरी मॅक्सिमिलान मार्टरर 6-3, 6-2, 7-6 (7-4)
उपांत्यपूर्व फेरी दिएगो श्वार्टझ्मन 4-6, 6-3, 6-2, 6-2
उपांत्य फेरी ज्युआन मार्टिन डेल पोट्रो 6-4, 6-1, 6-2

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)