माणसाने डायनासोर कधीच पाहिला नाही, मग ज्युरासिक पार्कने तो साकारला कसा?

अख्ख्या जगाला डायनासोर कळले ते ज्युरासिक पार्क या सिनेमामुळे. 1993 साली प्रथम आलेल्या या स्टीव्हन स्पीलबर्ग सिनेमाने 'डायनोसोर कसा असावा' ही कल्पना लोकांच्या डोळ्यांसमोर साकारली. एक प्रकारे जीवाश्मशास्त्राच्या अर्थात (palaeontology) संशोधनालाही या सिनेमानं चालना दिली.
पण या ज्युरासिक पार्कमध्ये किती शास्त्रीय सत्यता होती, किती विज्ञान खरं होतं? आणि आपल्याला डायनसोरसबद्दल किती माहिती त्यातून मिळाली आहे?
या सिनेमाला 25 वर्षं पूर्ण होत असताना बीबीसीने visual effect मधील तज्ज्ञ फिल टिपेट आणि जीवाश्मशास्त्रज्ञ स्टीव्ह ब्रुसेट यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या सिनेमाच्या निर्मितीनंतर आपण त्यातून काय शिकलो, यावर अधिक प्रकाश टाकला.
मायकेल क्रायटन यांच्या 'ज्युरासिक पार्क' या कादंबरीवर हा सिनेमा आधारित होता. पण त्यात काही चुकलं होतं का?
"यात दाखवण्यात आलेले बहुतेक डायनोसर क्रेटॅशिअस युगातले होते. पण ज्युरॅसिक जसं ऐकायला कानाला चांगलं वाटतं, तसं कदाचित क्रेटॅशिअस ऐकताना वाटत नाही," ते सांगतात.
ज्युरॅसिक पार्कमध्ये टायरॅनोसरस (T. rex), व्हेलोसिरॅप्टर, ट्रायसेरॅटॉप्स दाखवण्यात आले होते, पण ते क्रेटॅशिअस युगातले होते. हे युग ज्युरॅसिक युगानंतर आलं होतं.
पण या सिनेमातील खरी अडचणीची बाब म्हणजे जतन केलेल्या DNAमधून डायनासोरला पुन्हा जन्म देणं.
ब्रुसेट म्हणतात, "डायनासोरचं क्लोन करायचं असेल त्याचा पूर्ण जिनोम मिळायला हवा. पूर्ण जिनोम तर सोडाच, आतापर्यंत कुणाला डायनासोरसच्या DNAचं काहीही मिळालेलं नाही. म्हणजे आपण अशक्यप्राय जरी नाही म्हटलं तर फारच कठीण शक्यतेबद्दल बोलत आहोत."
ज्युरासिक पार्कमध्ये गतकाळातील प्राण्यांना विध्वंसक, राक्षसी प्राणी म्हणून न दाखवता चित्रपटातील एक पात्र म्हणूनच दाखवण्यात आली होती. हा चित्रपट सिनेमातील काल्पनिक विश्व आणि सत्यातली शास्त्रीय तथ्यं यांमधला समतोल राखण्याचाही प्रयत्न करतो, असंही ते म्हणतात.
डायनासोर साकारले कसे?
जो प्राणी माणसानं कधी पाहिलाचं नाही तो प्राणी शक्य तितका खराखुरा कसा दाखवावा, हा विचार करून सिनेमात तो साकारणं खरंच आव्हानं होतं. आज आपण सगळी भन्नाट अॅनिमेशन्स पाहतोच, पण त्या काळात म्हणजे नव्वदीच्या सुरुवातीला मात्र हे तितकं सोपं नव्हतं.
Computer animation आणि Animatronicsचा वापर, हेच या सिनेमाचं वैशिष्ट्य ठरलं. आणि यामुळे ज्युरासिक पार्कचं अॅनिमेशन एक मैलाचा दगड ठरला.
फिल टिपेट यांनी यापूर्वी 'स्टार वॉर्स'साठी काम केलं होतं. ते स्टॉप मोशनमधील तज्ज्ञ आहेत. तेव्हा 'ज्युरासिक पार्क'साठी डायनोसरचं पात्र निर्माण करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आलं.
जीवाश्मशास्त्रज्ञ जॅक हॉर्नर या चित्रपटासाठी सल्लागार होते. हॉर्नर यांच्यासह टिपेट यांनाही डायनासोरचं चांगलं ज्ञान आहे. ते सांगतात, "डायनासोरसवर त्यावेळी जी काही पुस्तकं उपलब्ध होती, मी ती सर्व वाचली. त्यामुळे त्या काळी विज्ञान जे सांगत होतं त्याच्या आम्ही फारच जवळ होतो."
T. rex
मायकेल क्रायटन यांच्या कादंबरीमधील काही संदर्भ गाळल्याची टिपेट सांगतात.
"'गॉडझिला'सारखं T. rex जीप उचलतो असा उल्लेख पुस्तकात आहे. पण तो असं खरंच करू शकतो का? भौतिकशास्त्राच्या नजरेतून पाहिलं तर नाही. म्हणून मग आम्ही तो भाग गाळला."
आतापर्यंत T. rex जसा दाखवला होता त्यासर्वांत अधिक अचूक टी रेक्स आम्ही साकारला, असं ते म्हणतात.
"मला आता हे माहीत आहे की T. rexची दृष्टी चांगली होती. तुम्ही खाली बसला तरी T. rex पासून तुम्ही लपू शकत नव्हता. त्याची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमताही अत्यंत उत्तम होती. अर्थात ही माहिती CAT स्कॅनमुळं मिळू शकली आणि ती 2000नंतर उपलब्ध झाली," असं ते म्हणतात.
काँप्युटर मॉडलिंगवरून T. rex ताशी 20 किमीपेक्षा जास्त वेगाने पळू शकत नव्हता, असं दिसून येतं. माणसांपेक्षा हा वेग जरी जास्त असला तरी T. rex भक्षाच्या मागे फार धावणं शक्य नाही. तरीही T. rex धावतानाच शॉट हा योग्य होता.
राप्टर्स
जीवाश्माच्या साहाय्याने प्राण्यांच्या हालचालींचा अंदाज लावणं फारच कठीणच. म्हणून टिपेट यांच्या टीमने सध्या अस्तित्वात असलेल्या डायनासोरसारख्या प्राण्यांच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास केला.
महाकाय आणि लांब मानेच्या ब्रॅकिएसोरसाठी चालत असावा, हे पाहण्यासाठी त्यांनी हत्तीच्या हालचालींचा अभ्यास केला. तर गॅलीमायमस कसा धावत असेल, याचा अंदाज बांधण्यासाठी शहामृगांचा अभ्यास करण्यात आला.
पण व्हेलॉसिरॅप्टर मात्र चित्रपटात जाणीवपूर्वक वेगळे दाखवण्यात आले. सिनेमात जे दाखवण्यात आले त्यापेक्षा ते फारच लहान होते, असं टिपेट म्हणाले.
पंख असलेला डायनोसरचे जीवाश्म 1990च्या दशकाअंती सापडले, तर T. rex चा पंख असलेला नातलग 2004मध्ये सापडला. त्यामुळे डायनोसर नेमके कसे दिसत असावेत, याची आपली समज 1993नंतर बरीच बदलेली आहे.
तरीसुद्धा 2015मध्ये ज्युरासिक वर्ल्डमध्ये पंख नसलेले डायनसोरसच दाखवण्यात आले. यावर टीकाही झाली होती.

ब्रुसेट यांना हे जराही रुचलेलं नाही.
"आपल्याला माहीत आहे की जवळपास सर्व डायनासोरना कुठल्यातरी प्रकारची पंखं होतीच. त्यामुळे डायनसोरना पंख नसलेलं दाखवणं मला तरी विचित्र वाटलं," असं ते म्हणाले.
2018मधील ज्युरासिक पार्क
टिपेट म्हणतात, "डायनसोर कसे दिसावेत या बद्दल माझ्या मनात आता नव्या कल्पना आहेत. आता जर डायनासोरवर सिनेमा बनवायचा झाला तर त्यातले डायनासोर ज्युरासिक पार्कमधल्या प्राण्यांसारखे नसतील. मी ते डायनासोर पूर्णपणे वेगळे रंगवेन. डायनासोरच्या पंखांबद्दल जे संशोधन झालं आहे, ते महत्त्वाचं आहे."
तरीही ज्युरासिक पार्ककडे पाहताना ब्रुसेट नापसंती व्यक्त करतात.
"तटस्थपणे विचार केला तर ज्युरासिक पार्कमुळे पॅलिएंटॉलॉजीचं खूप भलं झालं आहे. त्यात अनेक छोट्यामोठ्या चुका आहेत खऱ्या, पण त्यामुळे या प्रकल्पाचं योगदान काही कमी होत नाही. खरंच, ज्युरासिक पार्क नसता तर मला नोकरीच मिळाली नसती."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)