FIFA वर्ल्ड कप : अंतिम सामन्यातही झाली सेल्फ गोलची ऐतिहासिक घोडचूक

मॅचच्या 18व्या मिनिटालाच क्रोएशियाच्या मारियो मेंडजुकिचनं आत्मघातकी स्वयं गोल केला. Image copyright AFP
प्रतिमा मथळा मॅचच्या 18व्या मिनिटालाच क्रोएशियाच्या मारियो मेंडजुकिचनं आत्मघातकी स्वयं गोल केला.

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या FIFA वर्ल्डकप अंतिम सामन्यात क्रोएशियाला 4-2 हरवून फ्रान्सनं जेतेपद पटकावलं. मॅचच्या 18व्या मिनिटालाच क्रोएशियाच्या मारियो मेंडजुकिचनं आत्मघातकी स्वयं गोल केला. कुठल्याही सामन्यातली ही ऐतिहासिक घोडचूकच म्हणावी. आणि वर्ल्डकपमध्ये ओन गोल होण्याची ही काही पहिली वेळ नाही.

स्कॉटलंडचा टॉम बॉयड आणि ब्राझीलचा मार्सेलो यांच्यात काय साम्य आहे? तसं बघितलं तर काहीच नाही. पण दोघांच्याही नावावर वर्ल्डकपमधला एक नकोसा रेकॉर्ड आहे.

वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत सेल्फ गोल अर्थात स्वयंगोल करण्याचा नामुष्की रेकॉर्ड या दोघांच्या नावावर आहे.

टॉम निवृत्त होऊन आता बरीच वर्षं झाली आहेत पण मार्सेलो अजूनही खेळतो आहे. रशियात सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये मार्सेलो ब्राझीलच्या संघाचा भाग आहे.

सेल्फ गोलच्या यादीत भर पडू नये यासाठी तो प्रयत्नशील आहे. कारण वर्ल्डकपमध्ये ओन गोल करणारा ब्राझीलचा तो एकमेव फुटबॉलपटू आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 2014च्या वर्ल्डकपमध्ये मार्सेलोनं सेल्फ गोल केला. असं करणारा तो पहिला ब्राझीलचा खेळाडू ठरला.

'मला शांत राहावे लागेल. माझं संतुलन ढळलं तर संघासाठी ते आणखी अडचणीचं ठरू शकतं. परंतु समर्थकांनी माझ्या नावाने शंख केला', असं मार्सेलोने त्यावेळी सांगितलं होतं.

ब्राझीलचा संघ घरच्या मैदानावर क्रोएशियाविरुद्ध खेळत होता. ब्राझीलने हा सामना 3-1 जिंकला त्यामुळे मार्सेलोच्या सेल्फ गोलची चर्चा झाली नाही.

मात्र स्कॉटलंडच्या टॉमचं नशीब मार्सेलोप्रमाणे नव्हतं. कारण त्याच्या सेल्फ गोलमुळे स्कॉटलंडला ब्राझीलविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं.

दुर्मीळ घटना

फिफाच्या आकडेवारीनुसार 1930 ते 2014 यादरम्यान झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 2,300 गोल झाले आहेत. यापैकी 41 सेल्फ गोल अर्थात स्वयंगोल आहेत.

सेल्फ गोल होणं नेहमीच दुर्मीळ असतं. मात्र ज्या संघातर्फे सेल्फ गोल होतो त्या संघावर नामुष्की ओढवते.

वर्ल्ड कपमध्ये सेल्फ गोल होऊ देणं केवळ मैदानावर शरमेची बाब नसते. 1994 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेविरुद्धच्या लढतीत खेळताना कोलंबियाचा बचावपटू आंद्रेस इस्कोबार याच्या हातून चुकून सेल्फ गोल झाला. अमेरिकेने कोलंबियावर 2-1 असा विजय मिळवला. या पराभवामुळे कोलंबियाला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला.

आठवडाभरानंतर इस्कोबारची मेडेलिनमधील नाइटक्लबमध्ये हत्या करण्यात आली.

कोलंबियातील कुप्रसिद्ध ड्रग रॅकेटिअर गॅलन ब्रदर्ससाठी बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या हंबर्टो म्युनोझने इस्कोबारला मारलं. वर्ल्ड कपदरम्यान कोलंबियावर गॅलन ब्रदर्सतर्फे सट्टा लावण्यात येतो.

इस्कोबारच्या अंत्ययात्रेला 120,000 चाहते उपस्थित होते.

1934, 1958, 1962 आणि 1990 वर्ल्ड कपमध्ये सेल्फ गोलची नामुष्की कोणत्याही संघावर ओढवली नाही.

1998 वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सच्या खेळाडूंतर्फे सर्वाधिक अर्थात सहा सेल्फ गोल केले.

रशियात सुरू असलेला वर्ल्ड कप सगळ्यात खर्चिक आहे. या वर्ल्डकपमध्ये सेल्फ गोलची नांदी झाली आहे. या यादीत भर पडते का हे पाहायचं.

गेल्या वर्ल्ड कपमध्ये म्हणजेच ब्राझील 2014 वर्ल्ड कपमध्ये पाच सेल्फ गोल झाले. होंडुरास आणि नायजेरियाविरुद्ध फ्रान्सला याचा फायदा झाला.

वर्ल्ड कपविजेत्या संघांपैकी फ्रान्स असा एकमेव संघ आहे ज्यांच्या खेळाडूंकडून स्पर्धेत एकदाही ओन गोल झालेला नाही.

Image copyright Getty
प्रतिमा मथळा स्कॉटलंडच्या टॉम बॉइडनं 1998च्या वर्ल्ड कपमध्ये सेल्फ गोल केला.

वर्ल्ड कपमध्ये इटली आणि जर्मनीच्या बरोबरीने फ्रान्सला सेल्फ गोलचा फायदा झाला आहे. या तीन संघांना प्रत्येकी चार सेल्फ गोलचा फायदा मिळाला आहे.

बल्गेरियाच्या खेळाडूंनी 1966 वर्ल्ड कप स्पर्धेत दोन सेल्फ गोल केले होते. मेक्सिको, स्पेन (3) यांच्याबरोबरीने बल्गेरियाचा सेल्फ गोलच्या यादीत क्रमांक आहे.

नेदरलँड्सच्या इर्नी ब्रँड्ट्सने सेल्फ गोल केला होता मात्र इटलीविरुद्धच्या 1978च्या याच लढतीत त्याने गोल करत परतफेड केली. नेदरलँड्सने हा सामना 2-1 फरकाने जिंकला.

मात्र वर उल्लेखलेल्या कोणत्याही संघावर त्रिनिदाद अँड टोबॅगोसारखी नामुष्की ओढवलेली नाही.

2006 वर्ल्ड कपमधून त्रिनिदाद अँड टोबॅगोचा संघ एकही गोल न करता माघारी परतला. मात्र त्यांच्याविरुद्ध चार गोल झाले. यापैकी एक ब्रेंट सँचोचा सेल्फ गोल होता.

(हा लेख प्रथम 17 जूनला प्रसिद्ध करण्यात आला होता.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)