युरोपात स्थलांतरितांवरून वादंग : स्पेनमध्ये आलेल्या 134 मुलं, 7 गरोदर महिलांचं भविष्य अधांतरी

स्थलांतरित Image copyright Reuters

इटली आणि माल्टाने नाकारलेल्या 600 स्थलांतरितांचं स्पेनच्या वलेंसिया पोर्टवर आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. सुटका करण्यात आलेल्या स्थलांतरितांमध्ये 123 लहान मुलं, 13 वर्षं वयाखालील 11 किशोरवयीन मुलं आणि सात गरोदर महिला यांचा समावेश आहे.

इटली आणि माल्टाने प्रवेश देण्यास नकार दिलेलेल्या स्थलांतरितांना स्पेनने आश्रय देण्याचा निर्णय घेता आहे. या लोकांची भूमध्य समुद्रातून सुटका करण्यात आली आहे. याचं स्पेनच्या वालेन्सिया बंदरावर आगमन व्हायला सुरुवात झाली आहे.

जवळपास 629 स्थलांतरितांना घेऊन पहिल्या तीन बोटी आज पहाटेच बंदरात आल्या. अॅक्वारिअस जहाजाने गेल्या आठवड्यात लिबीयाजवळ या लोकांची सुटका केली होती.

बंदरावर मदतीसाठी आरोग्य अधिकारी आणि दुभाषकांची उपस्थिती आहे.

स्पेनमधील समाजवादी विचारांच्या सरकारने या सर्वांना मोफत आरोग्य सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिलं आहे. तसेच आश्रयाच्यादृष्टीनं प्रत्येक प्रकरण वैयक्तिकरित्या तपासलं जाईल, असंही सांगितलं.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा अॅक्वारियसने सुटका केलेले स्थलांतरीत

"आमच्या मानवी अधिकारांच्या जबाबदारीचं पालन करत असताना मानवी संकट टाळण्यासाठी मदत करणं तसेच या लोकांना सुरक्षित जागा मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे," असं पंतप्रधान पेद्रो सँचेझ यांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं.

दोन आठवड्यांपूर्वी सत्ता सांभाळल्यानंतर त्यांनी स्थलांतरितांच्या बाजूनं भूमिका घेतली आहे.

स्थानिक वेळेनुसार सकाळी 6.20 वाजता इटालियन कोस्ट गार्ड शिप 'डाटीलो'चं वालेन्सिया बंदरावर आगमन झालं. त्यात 274 स्थलांतरीत होते, अशी माहिती इटालियन वृत्तसंस्था अंसाने म्हटलं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा इटालियन कोस्ट गार्ड शिप 'डाटीलो'चं वेलेंसिया पोर्टमध्ये आगमन झालं.

ओरिओन नावाचं दुसरं जहाज आणि अॅक्वारिअस जहाज लवकरच उर्वरीत स्थलांतरितांना घेऊन बंदरात येणं अपेक्षीत आहे.

स्थलांतरितांना उतरवून घेण्यासाठी रेड क्रॉस सोसायटीचे 1000 कार्यकर्ते बंदरावर उपस्थित आहेत. याशिवाय पोलीस दलाचे अधिकारीही इथं उपस्थित आहेत.

सुटका करण्यात आलेल्या स्थलांतरितांमध्ये 123 लहान मुलं, 13 वर्षं वयाखालील 11 किशोरवयीन मुलं आणि सात गरोदर महिला यांचा समावेश आहे.

सोमवारी अॅक्वारिअस जहाज जेव्हा अडकून पडले होते, तेव्हा राजकीय पटलावर बरीच खळबळ उडाली होती.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा अॅक्वारियस

इटलीमधील आघाडी सरकारनं, विशेष करून गृहमंत्री आणि उजव्या विचारांच्या लीग पार्टीचे नेते माटेओ साविनी यांनी स्थलांतरित नागरिकांबद्दल कठोर भूमिका घेत जहाज उतरण्यास नकार दिला आहे.

ते म्हणाले, "जे देश युरोपीयन युनियनच्या सीमेवर आहेत त्यांनाच स्थालांतरित नागरिकांचं ओझं वाहावं लागत आहे. ही बाब योग्य नाही."

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा बंदारावर उतरत असताना स्थलांतरित

माल्टाने हे जहाज स्वीकारावं, अशी त्यांची भूमिका होती. पण हे जहाज इटलीच्या हद्दीत येत असल्याचं कारण देतं माल्टाने स्थलांतरितांना नकारलं.

वालेन्सियाचे महापौर जॉन रिबो यांनी जहाज उतरण्यासाठी परवानगी दिली. त्यांनी इटलीची भूमिका अमानवी असल्याची टीका केली.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की त्यांच्या निर्णयामुळे युरोपच्या स्थलांरितांशी संबंधित धोरणावर पुन्हा विचार होण आवश्यक आहे.

फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनीही इटलीवर टीका केली आहे. इटलीची भूमिका बेजबाबदार आहे, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की स्थलांतरितांच्या विषयावर त्यांच सरकार स्पेनसोबत काम करेल.

प्रतिमा मथळा स्थलांतरितांचा समुद्रातील प्रवास दर्शवणारा नकाशा

स्पेनचे उपपंतप्रधान कारमेन काल्वो म्हणाल्या ज्या स्थलांतरितांकडे आश्रय घेण्याचा कायदेशीर हक्क आहे आणि ज्यांना फ्रान्सला जायचं आहे त्यांना तिथं जाऊ दिलं जाईल.

अॅक्वरिस या बोटीने सुटका करण्यापूर्वी या स्थलांतरितांनी 20 तास एका रबरी बोटीवर घालवले होते. ही बोट क्षमतेपेक्षा जास्त भरली होती. खराब वातावरणात या स्थलांतरितांनी आठवडा घालवला असून त्यातील अनेक लोक आजारी आहेत.

युरोपीयन युनियनमधील देशांना स्थलांतरितांमुळे राजकीय संकटांना तोंड द्यावं लागत आहे. युरोपीयन युनियनच्या नेत्यांची पुढील आठवड्यात बैठक होत आहे. त्यामध्ये स्थलांरितांच्या धोरणांवर चर्चा होणं अपेक्षित आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)