दृष्टिकोन : 'ते वाजपेयींनाही पाकिस्तानाला पाठवणार नाहीत ना?'

अटलबिहारी Image copyright Getty Images

पूर्वी ब्रिटिश सरकारच्या काळात देशभक्तांच्या नजरेत हिरो असणाऱ्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे. आता भारतात इंग्रज नाहीत, अंदमानमधील काळ्या पाण्याचा तुरुंगही नाही. आता खतरनाक गुन्हेगारांना नागपूर किंवा दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठवलं जातं.

पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून नव्या काळ्या पाण्याचा शोध लागला असून त्याचं नाव पाकिस्तान आहे.

शाहरूख खानचं असं बोलण्याचं धाडस कसं झालं, त्याला पाकिस्तानला पाठवा. आमिर खानची पत्नी किरण रावला भारतात असुरक्षित वाटतं? अशा कृतघ्न लोकांना तातडीनं पाकिस्तानला धाडा. संजय लीला भन्साळीला खिलजीवर सिनेमा बनवण्याची हौस आहे ना तर पाठवा त्याला पाकिस्तानला. आणि हे जेएनयूमधले विद्यार्थी अफजल गुरूच्या समर्थनासाठी घोषणा देतात, त्यांनाही पाठवा पाकिस्तानला.

वंदेमातरम् न म्हणणाऱ्या सर्व देशद्रोह्यांनो पाकिस्तानला जा. हा पाकिस्तान नाही भारत आहे, इथं लव्ह जिहाद चालणार नाही. उत्तर प्रदेशातल्या शाळांत शिकणाऱ्या मुलांना त्यांचे वर्ग मित्र म्हणतात - 'अरे पाकिस्तानी, तू इथं काय करत आहेस.'

ज्यांना हिंदुत्व पसंद नाही, ज्यांना मोदी आवडत नाहीत त्या सर्वांनी पाकिस्तानला जावं.

Image copyright Reuters

अच्छा, तर तू 'देसी गर्ल' असूनही अमेरिकेच्या टीव्ही चॅनलवर काही पैशांसाठी हिंदूंना देशद्रोही म्हणून गद्दारी करतेस? अरे प्रियंका, पाकिस्तानला जाऊन राहा. परत मुंबईत येऊ नको, ऐकलस का तू.

माझे मित्र अब्दुला पनवाडी यांना 24 तास न्यूज चॅनल पाहायचा नाद आहे. अशा बातम्या ऐकून ते माझं डोकं खातात.

काल त्यांनी मला पुन्हा थांबवलं. "भाई मला जरा सांगाल का, भारतातले लोक हे काय बोलत आहेत. का हे सर्वांना पाकिस्तानात पाठवत आहेत? प्रियंका, शाहरूख, आमिर आदींचं ठीक आहे, पण हे लोक अडवाणींना पाकिस्तानात पाठवणार नाहीत ना? त्यांनी कराचीमध्ये जिन्नांच्या कबरीला भेट दिली होती."

आणि वाजपेयींना त्याच बसमधून तर पाकिस्तानला पाठवणार नाहीत ना ज्या बसमध्ये बसून ते थेट जिथं मुस्लीम लिगनं भारताच्या फाळणीचा प्रस्ताव ठेवला त्या 'मिनार ए पाकिस्तानला' आले होते. भाई, ज्या नेहरूंनी 6 पैकी 3 नद्यांवर पाकिस्तानचा हक्क मान्य केला त्यांच्या अस्थी तर ते पाकिस्तानला नाहीत ना पाठवणार.

Image copyright Getty Images

मी अब्दुल्ला यांना आश्वस्त करत म्हटलं की असं काही होणार नाही, तू जास्त काळजी करू नकोस. हे फक्त राजकारणात चमकण्याचे फंडे आहेत. प्रेमाला कुणी व्हिजा देत नाहीत आणि द्वेषाला व्हिजाची गरज नसते.

यावर अब्दुल्ला म्हणाले - मला यातलं काहीच कळालं नाही. पण तुम्ही जे म्हणालात ते मात्र फारच छान आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)