फुटबॉल मॅच जिंकल्यानंतर मेक्सिकोत आलेल्या भूकंपाची खरी गोष्ट

फुटबॉल, मेक्सिको

फोटो स्रोत, Getty Images

फिफा वर्ल्ड कपमध्ये मेक्सिकोच्या हिरविंग लोन्झानो यानं जर्मनीवर गोल केला. त्यानंतर लोकांच्या जल्लोषानं मेक्सिको शहरात हादरे बसले होते.

35व्या मिनिटाला जेव्हा फुटबॉल जाळीला धडकला तेव्हा प्रेक्षक हावेत उड्या मारत होते.

लोकांचा जल्लोष हा एखाद्या भूकंपाचं कारण ठरू शकतं का? पण काही मीडिया संस्थांनी भूकंप आल्याची बातमीसुद्धा दिली.

मेक्सिकोच्या भूकंप मापन केंद्रानंही असं ट्वीटही केलं होतं, "रशियात होत असलेल्या 2018 वर्ल्ड कपमध्ये जर्मनीला हरवल्यावर मेक्सिकोत कृत्रिम भूकंप आला होता," असं ट्वीट करण्यात आलं.

सिस्मोग्रामचा फोटो ट्वीट करून गोल झाल्यावर जमिनीत कशी कंपनं निर्माण झाली याची माहिती दिली आहे. त्यामुळे शहराला हादरे बसले होते, असंही सांगण्यात आलं. याच ट्वीटमध्ये स्पॅनिश भाषेतल्या एका ब्लॉगची लिंकही देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

जर्मनीविरुद्ध गोल केल्यानंतर लोक मेक्सिको शहराच्या चौकात आनंदाने नाचू लागले. त्यावेळी शहरात लावलेल्या दोन भूकंपमापक यंत्रावर जमिनीतल्या हालचाली टिपल्या गेल्या.

"मेक्सिकोच्या संघानं 35 मिनिटं आणि 7व्या सेकंदाला गोल केल्यावर मेक्सिको शहरातल्या दोन सेन्सरनी 37 मीटर पर सेकंद स्क्वायरची जमिनीतली हालचाल नोंदवली. ते हादरे कदाचित शहरातल्या जल्लोषाचे असावेत," असं भूकंपमापक केंद्राच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

त्यादिवशी मेक्सिको शहरातल्या मुख्य चौकात हजारो लोक एकत्र आले होते.

दरम्यान, "ही घटना खूप मोठी नाही," असं भूकंप मापन केंद्रानं नंतर स्पष्टही केलं आहे.

जल्लोष करणाऱ्या जमावाच्या जवळ अतिसंवेदनशील उपकरण असल्यावरच या हालचालींची नोंद होऊ शकते, असं ब्लॉगमध्ये लिहिण्यात आलं आहे.

मेक्सिकोमधल्या Angle of Independence statue जवळच जल्लोष सुरू होता आणि तिथून भूकंप मापक यंत्र अगदी थोड्याच अंतरावर होतं.

फोटो स्रोत, David Ramos - FIFA/Getty Images

फोटो कॅप्शन,

गोल केल्यावर लोन्झानोला विश्वासच बसला नाही.

खरच भूकंप झाला होता?

अशा घटना सहजासहजी लक्षात येत नाहीत. हे हादरे तिव्रतेच्या पातळीवर मोजता येत नसल्यानं याला भूकंप म्हणता येणार नाही. त्यामुळे हा कृत्रिम हादरा होता असं म्हणता येईल. त्यामागे कुठलीही भूगर्भीय घटना नव्हती हेही ब्लॉगमधून स्पष्ट करण्यात आलं आहे.

रविवारी (17जून) झालेल्या मॅचमध्ये मेक्सिकोनं जर्मनीचा 1-0 ने पराभव केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)