करा हिशोब : पृथ्वीच्या पाठीवर दररोज किती प्राणी जन्माला येतात?

प्राणी Image copyright Wolfgang Kaehler/Getty Images

उन्हाळयात एक राणी मधमाशी दररोज 1500 अंडी घालते. युनायटेड किंगडममध्ये जानेवारी 2018मध्ये नॅशनल बी युनिटनं केलेल्या पाहणीत यूकेमध्ये 2,47,461 इतके मधमाशांचे पोळे आढळून आले होते. आता विचार करा निव्वळ यूकेमध्ये जर इतक्या मधमाशा असतील तर जगात दररोज किती मधमाशा जन्माला येतं असतील? आकडेवारी करणं खरंच कठीण आहे ना? पृथ्वीच्या पाठीवर तर अनेक प्राणी, पक्षी आणि जीवजंतू आहेत आणि दररोज अनेक प्राण्यांना पिलं होत असतील. मग जगात दररोज जन्माला येणाऱ्या प्राण्यांची संख्या असेल तरी किती?

जगाची लोकसंख्या जवळपास 7.6 अब्ज आहे. UNICEFच्या आकडेवारीनुसार जगात दररोज 3 लाख 53 हजार मुलं जन्माला येतात. पण प्राण्यांच्या बाबतीत ही संख्या किती असेल.

बीबीसीच्या More or Less या कार्यक्रमात हाच प्रश्न विचारण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्नही झाला.

या प्रश्नाची उकल करण्यापूर्वी आपण अगदी साध्या प्रश्नाचं उत्तर शोधू. हा प्रश्न म्हणजे प्राणी कुणाला म्हणायचं. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार, 'जैविक घटकांवर जगणारा, विशेष प्रकारची ज्ञानेंद्रीय आणि मज्जासंस्था असलेला आणि उत्तेजनांना प्रतिसाद देणारा सजीव म्हणजे प्राणी,' होय.

स्तन असणारे किंवा नसणारे, पाठीचा कणा असणारे किंवा नसणारे, अंडी देणारे किंवा थेट पिलांना जन्म देणारे सगळ्या जीवांचा प्राण्यांत समावेश होतो.

आता आपण मुख्य प्रश्नाकडे वळू. हा प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी या प्रश्नाचा आवाका किती मोठा आहे हे पाहू.

निव्वळ ब्रिटनचा जर विचार केला तर जननक्षम जंगली सशांची संख्या 4 कोटी इतकी आहे. एका सशाची मादी एकावेळी 3 ते 7 पिलांना जन्म देते. म्हणजे दररोज जवळपास 1,917,808 इतकी सशांची पिलं दररोज जन्माला येत असावीत. असं असेल तर सशांची संख्या प्रचंड वाढेल का? तसं होत नाही कारण सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने कारण यातील बरीच पिलं लहान असतानाच विविध कारणांनी मरतात.

ससा हा प्राणी जवळजवळ सगळ्या देशांत आढळणार प्राणी आहे. पण जगात असे अनेक प्राणी आहेत, जे काही भागांतच दिसतात. यातीलच एक प्राणी म्हणजे हंबोल्ट पेग्विन होय. हा प्राणी चिली आणि पेरू या देशांतच सापडतो.

हा प्राणी एकाचवेळी दोन अंडी घालतो. असं वर्षभरातून काही वेळा ते अंडी देतात. पण प्रत्येक अंड्यातून पेंग्विन जन्माला येईलच असं नाही. आतापर्यंतच्या अंदाजनुसार दरवर्षी 14 हजार 400 हंबोल्ट पेंग्विन जन्मला येतात. म्हणजे दिवसाला केवळ 40 हंबोल्ट पेंग्विन जन्म घेतात.

Image copyright ZSL

संख्येनं जास्त नसल्याने ते सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत.

आता जरा जगात अमाप संख्येने असलेल्या प्राण्यांविषयी बोलू. जसं की कोंबडी. जागतिक खाद्य संघटने दिलेल्या माहितीनुसार दररोज 6 कोटी 20 लाख कोंबडीची पिलं जन्माला येतात.

मधमाशीविषयी बोलायचं झाल तर उन्हाळयात एक राणी मधमाशी दरदिवशी 1500 अंडी घालते. जानेवारी 2018 मध्ये ब्रिटनमधल्या नॅशनल बी युनिटने गणना केली तर त्या देशात 2 लाख 47 हजार 461 मधमाशांची पोळी सापडली. म्हणजे उन्हाळ्यात एकट्या ब्रिटनमध्येच दरदिवशी 37 कोटी, 11 लाख, 19 हजार 500 मधमाशा जन्म घेतात, असं म्हणता येईल.

अर्थात ही आकडेवारी अगदी बरोबर असेलच असं नाही. लंडन झू इन्स्टिट्यूटच्या मोनिका बोहम म्हणतात, दररोज जन्मणाऱ्या प्राण्यांचा हिशेब लावणं शक्य नाही. कारण बहुतेक प्राण्यांच्या प्रजनन क्षमतेविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही आहे.

Image copyright Science Photo Library

पण क्विन मेरी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक एक्सेल रॉसबर्ग यांच्या मत वेगळ आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एखादा प्राणी जर दुसऱ्या प्राण्यांपेक्षा हजारोंच्या संख्येत असेल तर त्याची संख्या हजारोंमध्ये असते.

याचा अर्थ, जगात हत्तीपेक्षा मधमशांची संख्या जास्त आहे, साळसापेक्षा वाळवी जास्त आहे. मुंग्या खाणाऱ्या प्राण्यांपेक्षा मुंग्यांची संख्या जास्त आहे. जगात सर्वाधिक संख्येने असणारा जीव म्हणजे कृमी होय. जगात गोलकृमींची संख्या जास्त आहे. एक चौरस मीटर जमिनीत जवळपास 30 लाख कृमी आहेत. यामधली नस्ल सी. इलेगन्स ही प्रजातीची मादी तासाला पाच अंडे घालते. या अंड्यातून पिली जन्माला येण्याचं प्रमाण 1 टक्के आहे.

Image copyright Science Photo Library

म्हणजे या प्रकारच्या गोलकृमीची दररोज किती पिलं जन्माल येत असतील? 6 वर 20 शून्य.

आपण फक्त काही प्रजातींवर बोललो.

आजच्या घडीला 77 लाख प्राण्यांच्या जाती आपल्याला माहिती आहेत.

समुद्रातल्या 95 टक्के आणि किनाऱ्यावरच्या 99 टक्के प्रजातींविषयी अजूनही काही कल्पना नाही. National Oceanic and Atmospheric Administrationच्या मते समुद्रातील 95 टक्के आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील 95 टक्के प्राण्यांबद्दल आपल्याला अजूनही माहिती नाही.

म्हणजेच जोपर्यंत पृथ्वीच्या पाठीवरील सर्व जीवांविषयी जोपर्यंत आपल्याला माहिती मिळत नाही दररोज जन्मणाऱ्या प्राण्यांचा हिशोब लागणं कठीण आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)