भारतीय मेडिकल विद्यार्थ्यांच्या 'चलो रशिया' मोहिमेचा जोर ओसरला

  • नितीन श्रीवास्तव
  • मॉस्कोहून बीबीसी प्रतिनिधी
रशिया, मेडिकल शिक्षण, डॉक्टर
फोटो कॅप्शन,

भामिनी रशियात शिक्षण घेत आहेत.

रशियात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी होत आहे. काय आहेत नेमकी कारणं? याचा थेट मॉस्कोहून घेतलेला आढावा.

"मुलगा डॉक्टर होण्यासाठी रशियाला गेला आहे," एकेकाळी हे वाक्य देशभरात विविध ठिकाणी वारंवार ऐकू यायचं.

आपल्यापैकी अनेकांनी आजूबाजूला, परिसरात, बस-रेल्वेत, नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये कोणाचं तरी रशियात शिक्षणासाठी असल्याचं तुम्ही नक्की ऐकलं असेल, विशेषतः डॉक्टर होण्यासाठी.

मात्र गेल्या काही वर्षांत हा ट्रेंड कमी होताना दिसत आहे. हे असं का झालं असावं, हा विचारभुंगा माझ्याही डोक्यात होता. म्हणूनच मॉस्कोला पोहोचल्यावर या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी कामाला लागलो.

पोहोचलो त्या दिवशी संध्याकाळी RUDN युनिव्हर्सिटीला गेलो. शहरातल्या गर्दी गोंधळापासून थोडं दूर कॅम्पस आहे, त्यामुळे जायला एक तास लागला. मिखलुको-मकलाया असं विद्यापीठाचं नाव होतं.

रशियाच्या या भागात रात्री 11.30 वाजेपर्यंत नैसर्गिक उजेड असतो. त्यामुळे संध्याकाळी 6.30 वाजताही लोकांची बरीच वर्दळ होतीच.

आत जाताच आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आल्याचं जाणवलं... दक्षिण आशियापासून आफ्रिकेपर्यंत आणि अगदी चीनपर्यंतचे विद्यार्थी या कॅम्पसमध्ये शिक्षण घेतात.

रशियात कोणत्याही बिल्डिंगमध्ये, ऑफिसमध्ये किंवा विद्यापीठात परवानगीशिवाय आपण बॅगेतून कॅमेराही काढू शकत नाही. मी माझ्या कॅमेऱ्याची जुळवाजुळव वगैरे करत असतानाच मागून हिंदीत कुणीतरी बोललं - "स्वागत है आपका, मॉस्को के ट्रैफ़िक से बचकर पहुँच ही गए."

मागे वळून पाहिलं तर विशाल शर्मा आणि भामिनी यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला.

रशियातले भारतीय विद्यार्थी

मेरठच्या भामिनी यांना रशियात येऊन तीन वर्षं झाली आहेत. पहिल्या वर्षी त्यांनी रशियन भाषा शिकली आणि गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं मेडिकलचं शिक्षण सुरू आहे.

"रशियात येऊन मेडिकलचं शिक्षण घ्यायचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं आहे. मात्र स्वप्न जगताना काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागते," भामिनी सांगते.

फोटो कॅप्शन,

हे भारतीय विद्यार्थी रशियात शिक्षण घेत आहेत.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

ती पुढे सांगते, "इथे स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी लागते. स्वत:च्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावं लागतं. इथे आपल्या घरचे नाहीत. स्वत:चं घर नसतं. प्रचंड अंतरामुळे चटकन घरी जाणंयेणंही शक्य नसतं. कुणाशी बोलायचं, कुणाशी नाही, ते पाहावं लागतं. जेवण स्वत:च तयार करायला लागतं. सगळं चांगलं आहे इथे, पण जगातल्या सगळ्यांत मोठ्या देशाची ही राजधानी आहे. त्यामुळे शंभर टक्के सुरक्षित असू शकत नाही."

भामिनीबरोबर विशालही आम्हाला भेटला. मूळ दिल्लीचा विशाल सात वर्षांपासून रशियात आहे. तो रशियात इंडियन स्टुडंट्स असोसिएशनचा अध्यक्षही आहे.

थोड्या वेळाने आम्ही कॅम्पसमधून बाहेर पडलो आणि विशालने एका बिल्डिंगकडे बोट दाखवलं. सोव्हिअत काळाचं प्रतीक वाटणाऱ्या इमारतींपैकी ही एक होती - ग्रे किंवा क्रीम रंगांच्या या इमारतींना बाल्कनीचा भाग कमी आणि चौकोनी काचेच्या खिडक्याच जास्त असतात.

हे इथलं स्टुडंट हॉस्टेल होतं. आम्हाला इथंच तर जायचं होतं. आत जाण्यासाठीची परवानगी विशालने आधीच मिळवली होती.

आठ मजली असलेल्या या हॉस्टेल बिल्डिंगमध्ये लिफ्ट नाही. एसी मात्र आहे. लॉबीमध्ये एक डिपार्टमेंटल स्टोअर आहे आणि ATMही आहे.

शिक्षणाचा खर्च

हे मुलींचं हॉस्टेल होतं आणि इथे आमची भारतातून आलेल्या असंख्य विद्यार्थिनींशी भेट झाली. हॉस्टेलचं स्वरूप असं की एका खोलीत दोन जणी राहतात, कॉमन एरियामध्ये पॅन्ट्री आहे जिथे जेवण बनवता येऊ शकतं. तिथेच वॉशिंग मशीनचीही सोय आहे.

महिन्याकाठी इथे राहण्याचा खर्च 12,000 ते 15,000 पर्यंत येतो.

फोटो कॅप्शन,

अनेक देशातले विद्यार्थी रशियात शिक्षणासाठी येतात.

रशियात 50 हून अधिक मेडिकल कॉलेज आहेत. मेडिकल शिक्षणासाठी इथे वर्षाला दोन ते चार लाख रुपये खर्च येतो. मॉस्को प्रमुख शहर असल्याने इथे शिकणं खर्चिक आहे, मात्र तुलनेने छोट्या शहरांमध्ये शिक्षण घेतलं तर कमी पैशात होऊ शकतं.

विद्यार्थ्यांची संख्या घटली

काही वर्षांपूर्वी भारतीय विद्यार्थी प्रचंड संख्येने रशियात मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी जायचे. तो शीतयुद्धाचा काळ होता. भारत आणि रशियात घट्ट मैत्री होती.

मात्र काळ बदलला तसं विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडे वळवला, आणि या शर्यतीत रशिया मागे पडू लागलं.

रशियात येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी 90 टक्के जण मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठीच येतात. पण ही संख्या घटण्यामागचं कारण काय, मी भामिनीला विचारलं.

फोटो कॅप्शन,

रशियातल्या मॉस्को येथील मेडिकल कॉलेज हॉस्टेलमधलं एक दृश्य

ती म्हणाली, "इथे येण्यातला प्रमुख अडसर म्हणजे भाषा. रशियन भाषा शिकून घेतली तर अनेक गोष्टी सोप्या होतात. नाही तर पदोपदी अडथळे येतात."

विशालच्या मते इथे येणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना सगळं शिक्षण रशियन भाषेतून घ्यायचंय, याची कल्पनाच दिली जात नाही.

आजही सव्वाशेहून अधिक देशातले विद्यार्थी मेडिकलसह अन्य कोर्सेससाठी रशियाची वारी करतात. कारण हेच की अन्य देशांच्या तुलनेत शिक्षणाचा खर्च इथे थोडा कमी आहे, आणि मेडिकलसारख्या अभ्यासक्रमाला तुलनेने सहज प्रवेश मिळतो.

मात्र असं असूनही गेल्या काही वर्षांतला भारतीय विद्यार्थ्यांचा अनुभव फारसा चांगला नाही.

2017 मध्ये 'स्मोलेंस्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी' मध्ये शिकणारे शंभरहून अधिक भारतीय विद्यार्थी वर्षभरातच मायदेशी परतले, कारण सगळं शिक्षण रशियन भाषेतून दिलं जाणार आहे, याची त्यांना कल्पना देण्यात आली नव्हती.

संख्येत घट का?

हे सगळं रशियातल्या भारतीय दूतावासापर्यंत पोहोचलं. रशियातील भारताचे राजदूत पंकज सरन यांनी बीबीसीला सविस्तर माहिती दिली - "सोव्हिएतच्या काळात इथे खूप सारे भारतीय विद्यार्थी शिकायला यायचे. त्यानंतर या संख्येत घट झाली. आता हे प्रमाण वाढत आहे. दोन्ही देशांमध्ये इन्फॉर्मेशन गॅप निर्माण झाली आहे. ती कमी करणं हाच आमचा उद्देश आहे."

"दुसरा प्रश्न रशियन भाषेत शिकण्याचा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे दोन्ही देशांच्या सरकारमध्ये डिग्रीला मान्यता प्राप्त करण्याविषयी काही धोरण निश्चित झालेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी इथे येण्यापूर्वी आता विचार करतात."

फोटो कॅप्शन,

विशाल रशियातल्या भारतीय स्टुडंट्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे.

रशियन भाषेच्या बरोबरीने भारतातल्या एज्युकेशन एजंट्सवरचा विश्वास कमी होणं, हेही गेल्या काही काळातलं यामागचं एक मुख्य कारण आहे.

रशियालाच का जायचे भारतीय विद्यार्थी?

काही दिवसांनंतर मॉस्कोतल्या रेड स्क्वेअर या प्रसिद्ध ठिकाणी आमची भेट काही मेडिकल विद्यार्थ्यांशी झाली. तेव्हा विशालही तिथे पोहोचला. चर्चेदरम्यान त्याने सांगितलं, "भारतातून येणारे मुलंमुली कन्सलटंट्सच्या माध्यमातून येतात. अनेकदा त्यांना तपशीलवार माहिती आणि मार्गदर्शनाशिवायच पाठवलं जातं. या विद्यार्थ्यांना जे सांगितलं जातं तसं प्रत्यक्षात नसतं. ते बॅगाबोजे घेऊन प्रवेशाच्या रांगेत उभे राहतात, पण पुढची प्रक्रिया नक्की कशी आहे, याची त्यांना माहितीच नसते."

फोटो कॅप्शन,

रशियात पन्नासहून अधिक मेडिकल कॉलेजं आहेत.

गेल्या काही वर्षांत यासंदर्भातील तक्रारी वाढल्यानंतर सरकारने याप्रकरणी लक्ष घातलं. त्यांनी असं बजावून सांगितलं की रशियात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत मध्यस्थांद्वारेच प्रवेश मिळवावा.

आम्ही त्या दिवशी रेड स्क्वेअरला ज्या विद्यार्थ्यांशी भेटलो, त्यापैकी बरेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यतून तिथे आले होते.

इंदूरच्या अनामिकाने सांगितलं की, "हा गैरसमज आहे की इथे येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. रशियातल्या मेडिकल शिक्षणाचा दर्जा जगभरात अव्वल आहे, याकडे दुर्लक्षून चालणार नाही."

भारतात परतल्यानंतर काय?

मुलांव्यतिरिक्त घरच्यांना मायदेशी परतल्यावर काय, ही काळजीही भेडसावते.

Medical Council of Indiaच्या (MCI) नियमाप्रमाणे रशियातून मेडिकलचं शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी एक पात्रता परीक्षा देणं अनिवार्य आहे. मात्र भारतीय विद्यार्थी देशात होणारी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकल्याची अनेक उदाहरणं आहेत. आणि रशियात मेडिकलचं शिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिस करणं अवघड आहे. यामुळे अडचणी निर्माण होतात.

फोटो कॅप्शन,

रशियात आजही अनेक भारतीय मुलं शिक्षण घेत आहेत.

मी अनामिकाला याविषयी विचारलं तेव्हा तिच्या हसतमुख चेहऱ्यावर काळजी नक्कीच दिसली.

ती म्हणाली, "ती परीक्षा पास होईन अशी आशा आहे. नाही होऊ शकले तर बघूया काय होतंय ते."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)