टीकेनंतर डोनाल्ड ट्रंप यांचे स्थलांतरितांवर कारवाई शिथिल करण्याचे संकेत

अमेरिकेत घुसखोरी करू पाहणाऱ्या कुटुंबांना यापुढे विभक्त केलं जाणार नाही, असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप म्हणाले आहेत. "तसा आदेश लागू करणाऱ्या एका कागदावर मी थोड्याच वेळात सही करणार आहे," असं ट्रंप व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

अमेरिकेचं डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्युरिटी या आशयाचा एक मसुदा तयार करत असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र या आदेशाची नेमकी व्याप्ती काय असेल, हे अजूनही स्पष्ट नाही. ट्रंप यांनी यापूर्वीच अमेरिकेच्या संसद सदस्यांना कुटुंबांची अशी ताटातूट थांबवणारं बिल मंजूर करण्याची विनंती केली होती. पण स्थलांतरितांसंदर्भातला कायदा अधिक सशक्त करण्यावर त्यांचा भर होता.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

अमेरिकेतलं एक टेंट शहर जिथे स्थलांतरितांच्या मुलांना ठेवण्यात आलंय

अमेरिकेत घुसखोरी थांबवण्याचं आश्वासन डोनाल्ड ट्रंप यांनी 2016च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिलं होतं. त्यासाठी आखलेल्या Zero Tolerance धोरणाअंतर्गत नुकतीच सहा आठवड्यांसाठी एक कारवाई करण्यात आली होती. त्या कारवाईनंतर जवळपास दोन हजार कुटुंबं विभक्त झाली आहेत.

याआधी बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसू पाहाणाऱ्या लोकांवर पहिल्यांदा पकडले गेल्यास किरकोळ कारवाई व्हायची. पण आता प्रौढांविरुद्ध गुन्हेगारी कलमांअंतर्गत कारवाई केली जात असून त्यांना तुरुंगात डांबलं जात आहे. दुसरीकडे त्यांच्या मुलांना वेगळ्या डिटेन्शन सेंटर्समध्ये ठेवलं जात आहे. हे सेंटर्स अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा मंत्रालयाअंतर्गत येतात, तर काही मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवण्यात येत आहे.

पण या डिटेन्शन सेंटर्सच्या नुकत्याच जाहीर झालेल्या काही गुप्त रेकॉर्डिंगमध्ये लहान मुलं रडताना दिसत आहेत, तर इथले सुरक्षारक्षक त्यावर हास्यविनोद करताना दिसत आहेत. ProPublica मीडियानं हे व्हीडिओ उघड केल्यानंतर ट्रंप सरकारच्या या धोरणावर मोठी टीका होत आहे.

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : अमेरिकेच्या सीमेवर पिंजऱ्यात बंद मुलांचं रडणं कॅमेऱ्यात कैद

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप यांनीसुद्धा सोमवारी या मुद्द्यावरून ट्रंप सरकारला सुनावलं होतं. "आपण केवळ कायद्यांचं काटेकोरपणे पालन करणारं राष्ट्र नव्हे संवेदनशीलतेनं कारभार करणारं राष्ट्र निर्माण करायलं हवं," असं मेलानिया एका निवेदनात म्हणाल्या होत्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)