व्हीडिओ : रॅलीत झालेल्या स्फोटातून असे थोडक्यात बचावले झिंबाब्वेचे अध्यक्ष

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
व्हीडिओ : राष्ट्राध्यक्ष मंगाग्वा यांना लक्ष्य करणारा स्फोट झाला तो क्षण

झिंबाब्वेचे अध्यक्ष इमरसन मंगाग्वा यांच्या रॅलीदरम्यान स्फोट झाला आहे. या स्फोटात अध्यक्ष बचावले आहेत. 15 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे.

या स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अध्यक्ष मंगाग्वा यांच्यावर कथित हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचं वृत्त स्थानिक माध्यमं देत आहेत. ZBC या राष्ट्रीय वृत्तवाहिनीनं अध्यक्षांच्या हत्येच्या दृष्टीने झालेला हल्ला असं या घटनेचं वृत्त दिलं आहे.

सभा संपल्यावर मंगाग्वा स्टेजवरून उतरत असतानाच हा स्फोट झाला. "त्यात 15 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे," असं आरोग्य मंत्री डेव्हिड पारिन्येत्वा यांनी सांगितलं.

"माझ्यापासून काही अंतरावरच हा स्फोट झाला. पण मी बचावलो," असं मंगाग्वा यांनी स्पष्ट केलं आहे. त्याबद्दल त्यांनी ट्वीटही केलं आहे.

रॉबर्ट मुगाबे यांच्या 37 वर्षांच्या एकछत्री सत्तेनंतर झिंबाव्वेचे अध्यक्ष म्हणून इमरसन मंगाग्वा गेल्या नोव्हेंबरमध्येच निवडून आले.

बुलावायो शहरातल्या व्हाईट सिटी स्टेडियममध्ये एका रॅलीला ते उपस्थित होते. तेव्हा हा स्फोट झाला. अध्यक्षांना या स्फोटात इजा झाली नसल्याचं त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. पण उपाध्यक्ष केंबो मोहादी यांच्या पायाला दुखापत झाली आहे, असं वृत्त राष्ट्रीय टीव्हीनं दिलं आहे.

अध्यक्षांचे प्रवक्ते जॉर्ज कारंबा यांनी या स्फोटासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. "गेल्या पाच वर्षांत अध्यक्षांवर जीवघेण्या हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न झाले," असं यात म्हटलं आहे.

Image copyright EPA

झिंबाब्वेच्या दोन उपाध्यक्षांपैकी पहिले कॉन्स्टँटिनो चिवेंगा आणि त्यांची पत्नी यांना किरकोळ दुखापत झाल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे.

विरोधी पक्षनेते नेल्सन चमिसा यांनी या स्फोटाचा निषेध केला आहे. राजकीय हिंसा मग ती कोणत्याही प्रकारची असो, अमान्य असल्याचं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics