स्वतःच्या बलात्काऱ्याला तुरुंगात डांबणाऱ्या महिला पोलिसाची कथा

प्रातिनिधक फोटो Image copyright ANDRE VALENTE BBC BRAZI

तब्ब्ल 12 वर्षांनंतर तबाता आणि त्या बलात्काऱ्याची भेट झाली. पण यावेळी तबाता यांच्या हातात बंदूक होती. त्यांनी त्याला हातकडी घातली आणि तुरुंगात डांबलं. ब्राझीलच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ही गोष्ट.

तबाता... 9 वर्षांची ती खूप बोलकी मुलगी होती. तिच्याजवळ अनेक बाहुल्या होत्या आणि त्यांच्यासोबत ती भातुकली खेळत असे.

तिला सायकल चालवायला आवडत असे. टीव्ही वगळता इतर कोणतंही इलेक्ट्रिक उपकरण तिच्याकडे नव्हतं.

त्या फोटोग्राफरचं वय तेव्हा 39 वर्षं होतं. त्याचं लग्न झालेलं होतं. निसर्गाची त्याला खूप आवड होती. त्यामुळे तो नेहमी फिरतीवर असायचा. समुद्र, नदी आणि प्रवास यांच्या गोष्टी सांगून तो लोकांचा विश्वास संपादन करून घ्यायचा.

या फोटोग्राफरची आणि तबाताची (बदललेलं नाव) पहिल्यांदा ओळख झाली ती 2009मध्ये. तो तबाताच्या आईवडिलांचा मित्र होता. तो तबाताच्या घरी यायचा आणि सतत 2 वर्षं तो तबातावर बलात्कार करत होता.

9 वर्षाची तबाता त्या वेळी अजाण होती. असहाय्य होती. शेवटचा बलात्कार झाल्यानंतर तब्बल 12 वर्षांनंतर तबाता पुन्हा या फोटोग्राफरला भेटली.

पण आता परिस्थिती वेगळी होती. तबाताच्या हातात बंदूक होती. तिनं या फोटोग्राफरचा हात घट्ट पकडला आणि त्याच्या हातात बेड्या घातल्या.

त्या बलात्काऱ्याला तुरुंगात टाकल्यानंतर तबाता यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या जीवनातील एका मोठ्या कथेला पूर्णविराम मिळाला होता.

26 वर्षांच्या तबाता आता पोलीस अधिकार आहेत. दक्षिण ब्राझीलच्या सेंटा कॅतरिना भागात त्यांची नियुक्ती आहे. 21 डिसेंबर 2016चा दिवस त्यांना आजही आठवतो.

त्या लहान असताना ज्या व्यक्तीनं त्यांचं लैंगिक शोषण केलं त्याला त्यांनी तुरुंगात धाडलं होतं. याबद्दलची माहिती प्रथम त्यांनी बीबीसी ब्राझीलला दिली.

त्या म्हणाल्या, "मी याविषयी बोलण्याचा निर्णय घेतला. याचं कारण म्हणजे इतर महिलांनाही यातून प्रेरणा मिळावी हे आहे."

कॅम्पपासून शोषणास सुरुवात

या फोटोग्राफरची तबाताच्या वडिलांसोबत ओळख झाली होती. त्यावेळी तबाता यांचं वय 9 वर्षं होतं. हा फोटोग्राफर त्यांच्या कुटुंबांचा मित्र झाला होता.

उन्हाळ्यात दोन्ही कुटुंबांनी नदी किनाऱ्यावर कँपला जाण्याचं नियोजन केलं होतं. ते दर आठवड्याला कॅम्पला जाऊ लागले. तबाता नदीत खेळत असत.

दोन्ही कुटुंब कारनं जायचे, जंगलातल्या खराब रस्त्यांनी ते कँपच्या ठिकाणी जायचे आणि तिथं निसर्गजीवनाचा आनंद घ्यायचे. कँपला जाऊ लागल्यानंतर काही आठवड्यांनी हा फोटोग्राफर तबाता यांचं शोषण करू लागला.

"मला या गोष्टीचा त्रास होत होता. पण माझ्यासोबत जे घडतं होतं तो गुन्हा आहे, हे मला त्यावेळी माहीत नव्हतं." तबाता सांगतात.

"मी त्यावेळेस माझ्या कुटुंबीयांना काही सांगितलं नाही. पण मला याचा पश्चाताप होतोय. मी कुटुबीयांना का सांगितलं नाही, असं आता वाटतं," त्या सांगतात.

तबाता यांची एक 8 वर्षांची सावत्र बहीण होती. पण ती कँपसाठी त्यांच्यासोबत येत नसे.

Image copyright ANDRE VALENTE BBC BRAZIL

"ती माझ्या वडिलांच्या जास्त जवळ नव्हती कारण ती त्यांची सावत्र मुलगी होती. ती घरीच टी.व्ही पाहत बघायची अथवा अभ्यास करत बसायची."

तो फोटोग्राफर त्यांच्या असहायतेचा, कँपमधील एकांताचा आणि जंगलातील अंधाराच फायदा उठवायचा, असं त्या सांगतात.

"कँपिंगदरम्यान एकदा मी पाणी आणायला गेले होते. त्यावेळी रस्त्यात त्यानं माझं शोषण केलं. मी कसंतरी तिथून निघून आले. मी त्याच्या आधी का आले, असं माझ्या आईवडिलांनी विचारलं. त्यांच्या विश्वासातला व्यक्ती त्यांच्या मुलीसोबत गैरकृत्य करेल असा त्यांनी कधीच विचार केला नव्हता."

शोषण वारंवार व्हायला लागलं आणि हे तबाता यांना सहन होतं नव्हतं. वडिलांना त्यांना सांगायचं होतं.

"वडील नेहमीच चिंतेत असायचे. ते या फोटोग्राफरचा खून करतील, त्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागेल, अशी भीती मला वाटायची. आईवडील माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवतील का नाही, असंही मला वाटतं असे."

आईला सांगणार होतेच पण...

तबाता केव्हा एकटी असते हे बघण्यासाठी फोटोग्राफर नियमितपणे त्यांच्या घरी यायला लागला.

"बहीण अभ्यासात व्यग्र असते आणि आई रात्री काम करते, असं त्याला समजलं." तबाताचे वडील रात्रीच्या वेळी केव्हा फुटबॉल खेळायचे हेही त्याला माहिती होती. याच वेळेचा फायदा उठवत तो तबाताचं शोषण करायचा.

"अजून थोडंसं, बस अजून थोडसं, असं तो म्हणायचा. मला त्यानं कधी मारलं नाही, पण तो माझ्या शरीराशी लगट करायचा, मला घट्ट दाबून ठेवायचा", तबाता सांगतात.

अडीच वर्षं हा प्रकार सुरू होता. "वयाच्या 11व्या वर्षी मला समजायला लागलं की, तो माझं लैंगिक शोषण करत आहे. मी त्याला विरोध करत असे, ओरडत असे. पण माझ्या विरोधाचा काहीच उपयोग होत नसे."

एक दिवस तबाता यांनी आईला हा प्रकार सांगायचं ठरवलं. पण आईला बायपोलर डिसऑर्डर (एक मानसिक आजार) असल्याचं समजल्याने त्यांनी हे आईला सांगितलं नाही.

सावत्र बहिणीला सांगितलं

तेव्हाच तबाता यांना एक धक्कादायक गोष्ट कळाली. त्यांच्या वडिलांचं फोटोग्राफरच्या पत्नीसोबत अफेअर सुरू होतं. हीच गोष्ट दोन्ही कुटुंबाना कळाली आणि त्यानंतर तबाता यांचं शोषण बंद झालं. तबाता यांनी जवळच्या मैत्रिणीला सर्व काही सांगितलं आणि इतर कुणालाही हे सांगू नकोस, असंही म्हटलं.

Image copyright ANDRE VALENTE BBC BRAZIL

तो अवघड काळ होता. तबाता यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या आईला सांभाळावं लागत होतं. सावत्र बहिणीशी फारस पटत नसल्याने त्यांनी तिलाही हे सांगितलं नव्हतं.

पण आईच्या आजारामुळे त्या दोघी जवळ आल्या. तबाता यांनी 2006मध्ये बहिणीला हा प्रकार सांगितला.

"हा प्रकार कळाल्यानंतर बहीण रडू लागली. तिनं लगेच वडिलांना फोन लावला. माझ्या वडिलांनी 2 वर्षांपूर्वीच आईला घटस्फोट दिला होता. त्यामुळे त्यांना हे सांगायला हवं का, असं मला वाटलं. यामुळे माझ्या कुटुंबीयांच्या समस्या अजून वाढतील, असं मला वाटलं."

तबाता यांनी ते सर्व विसरायचा प्रयत्न केला. पण वाईट आठवणी त्यांच्या डोक्यातून काही जात नव्हत्या.

तबाताच एकट्या पीडित नव्हत्या

यामुळे मग तबाता यांना शाळेतल्या मित्र-मैत्रिणींना सर्व काही सांगायचं ठरवलं.

2008मध्ये तबाता 16 वर्षांच्या होत्या तेव्हा एका मैत्रिणीनं तबाताबद्दल तिच्या आईला सांगितलं. त्या मुलीची आई फोटोग्राफरला ओळखत होती. त्यामुळे त्यांनी तबाताला भेटायला बोलावलं.

मला अशा काही मुली माहिती आहेत ज्यांचं फोटोग्राफरनं लैंगिक शोषण केलं आहे, त्यांनी तबाताला सांगितलं. "हे ऐकून तर मला धक्काच बसला. मला वाटलं हे सर्व त्यानं फक्त माझ्यासोबतच केलं. पण त्याने अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं," तबाता सांगतात.

लैंगिक शोषणाच्या 7 वर्षांनंतर तबाता यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी चौकशी तर सुरू केली, पण काही कालावधीनंतर केस बंद केली.

तबाता एका वकिलाला भेटल्या. पण केसमध्ये काही दम नाही, असं सांगत त्यानं ही केस लढवण्यास नकार दिला. "घटना खूपच गंभीर आहे, पण माझ्याजवळ कसलेच पुरावे नाहीत", असं वकिलाने त्यांना सांगितलं.

तबाता त्या दिवशी खूप रडल्या. आता आपल्या गुन्हेगाराला कधीच शिक्षा होऊ शकणार नाही, असं त्यांना वाटलं.

एका व्यापाऱ्याच्या 9 वर्षांच्या मुलीचंही फोटोग्राफरनं लैंगिक शोषण केलं आहे, असं काही दिवसांनंतर कुणीतरी तबाता यांना सांगितलं. तबाता त्या मुलीच्या आईकडे मदत मागायला गेल्या.

"मी त्यांना न्यायालयात साक्ष द्यायची विनंती केली आणि त्यांनी ते मान्य केलं," तबाता सांगतात. यानंतर तबाता परत वकिलाकडे गेल्या.

आरोपीनं अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे, असं पब्लिक मिनिस्ट्रीनं मान्य केलं. एका वर्षानंतर 2013मध्ये पहिली सुनावणी झाली.

न्यायालयाचा निकाल

न्यायालयात सुनावणीदरम्यान फोटोग्राफरनं आरोप फेटाळले. तबाताच्या वडिलांचं माझ्या पत्नीसोबत अफेअर होतं, त्यामुळे ती बदला घेण्यासाठी हे करत आहे, असा युक्तिवाद त्याने केला. पण न्यायालयानं फोटोग्राफरला दोषी ठरवत साडे सात वर्षांची शिक्षा सुनावली.

24 वर्षांच्या वयात तबाता यांनी सिव्हिल पोलीस अकॅडमीचा कोर्स पूर्ण केला होता आणि पोलीस म्हणून भरती झाल्या होत्या.

Image copyright ANDRE VALENTE BBC BRAZIL

22 डिसेंबर 2016ला 8 ते 10 पोलीस सहकाऱ्यांच्या मदतीनं त्या फोटोग्राफरला अटक करण्यासाठी गेल्या. एका नदी किनाऱ्यावरल्या फार्म हाऊसमध्ये तो लपलेला होता.

आपल्या संघर्षानंच आपल्याला पोलीस बनण्याची प्रेरणा दिली, असं तबाता सांगतात.

19 डिसेंबर 2017ला फोटोग्राफरची सुटका झाली. तुरुंगातल्या योग्य वर्तणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती.

आता तो मुक्त आहेत. त्यामुळे तबाता असमाधानी आहेत.

"ज्या व्यक्तीनं लहानपणी माझ्यावर 2 वर्षं सतत बलात्कार केला, तो इतक्या सहज आणि लवकर कसा काय मुक्त होऊ शकतो," असं तबाता यांना वाटतं.

मानसिक नुकसान

तबाता लहानपणी इतर लोकांमध्ये मिळून-मिसळून वागत असे. पण लैंगिक शोषणानं त्यांच्या स्वभावात फरक पडला.

"मी लोकांसोबत जास्त बोलत नसे. मला भीती वाटत असे. मला माझ्या शरीराचीच लाज वाटत होती. माझे मित्र सेक्स आणि मुलांना जन्म देण्याबद्दल बोलत तेव्हा मला अस्वस्थ वाटायचं. कारण मी सेक्सचं वाईट रूपच पाहिलं होतं."

पोलीस अधिकारी असलेल्या तबाता लैंगिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांवर काम करत नसत. कारण अशा गुन्ह्यांचा त्यांना मानसिक त्रास होत असे.

पण जे घडलं ते इतर कुटुंबांसाठी एक धोक्याची सूचना आहे, असं तबाता यांना वाटतं.

"मी जगभरातल्या पालकांना सांगेन की, मुलामुलींशी बोलत राहा. काही वाईट झालं असंल तर ते सांगायला हवं, असं त्यांना पटवून द्या. मुलांवर आपण विश्वास ठेवतो, याची त्यांना जाणीव करून द्या."

"लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांना मला सांगायचं आहे की त्यांनी शोषणासाठी स्वत:ला जबाबदार समजू नये," असं त्या सांगतात.

"पीडित व्यक्तीलाच दोषी मानायला नको, असं मला नेहमी वाटतं. जे काही होतं त्याला पीडितेच्या कपडे जबाबदार नसतात. उलट लैंगिक शोषण करणाऱ्याची मानसिकता याला जबाबदार असते," तबाता सांगतात.

हे बघितलं का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
मुंबईतल्या सेक्स वर्कर महिलांच्या मुलींची यशोगाथा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)