पाकिस्तानच्या निवडणुकीत एकापेक्षा एक 'गरीब' उमेदवार

पाकिस्तान निवडणूक Image copyright Getty Images

पाकिस्तानमध्ये नेत्यांच्या श्रीमंतीचं गणित सामान्यांच्या आकलनाबाहेरचं आहे. थेट पाकिस्तान निवडणुकींपूर्वीचा आँखो देखा हाल सांगणारा ब्लॉग.

पाकिस्तानचा निवडणूक प्रचार आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. निवडणुकांत जितके उमेदवार आहेत त्यांनी आपली संपत्ती, जमीन, मालमत्ता यांची माहिती निवडणूक आयोगाला अगदी शपथेवर दिली आहे.

त्यावरून हे कळतं की, ज्यांना आपण श्रीमंत समजत होतो ते बिचारे आपल्यासारखे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय निघाले आणि ज्यांना आपण गरीब समजत होतो ते इतके श्रीमंत निघाले की त्यांची इच्छा असेल तर थेट IMFलासुद्धा कर्ज देऊ शकतील.

उदाहरणादाखल पंजाबमधील मुजफ्फरगढ मधले एक अपक्ष उमेदवार मोहम्मद शेख हुसैन यांनी घोषणापत्रात लिहिलं आहे की 4000 कोटीपेक्षा जास्त किमतीच्या जमिनीवर त्यांची मालकी आहे. असं असेल तर निवडणूक लढवणारे ते सगळ्यांत श्रीमंत उमेदवार असतील.

इम्रान खान यांना आपण ओळखतोच. त्यांच्या घराची किंमत 30 लाख आहे. त्यांची स्वत:ची गाडी नाही. आजोबा आणि वडिलांकडून त्यांना 14 घरं मिळाली आहेत. विमानाच्या तिकिटाचे पैसे त्यांचे मित्र देतात. ते इतके गरीब आहेत की त्यांनी मागच्या वर्षी फक्त 1 लाख 4 हजार इतका इन्कम टॅक्स भरला.

Image copyright Getty Images

आसिफ झरदारी यांच्याबाबत तर अशी अफवा उडवली जाते की, सिंध भागात असलेले अर्धे अधिक साखर कारखाने त्यांच्याच मालकीचे आहेत. दुबई आणि ब्रिटनमध्ये त्यांची मोठी घरं आहेत. हजारो एकर जमिनी आहेत. कोट्यवधी रुपयांच्या बेहिशोबी गुंतवणुका आहेत. मात्र त्यांच्या घोषणापत्रांत असं काहीच नाहीये.

Image copyright Getty Images

त्यांच्या संपत्तीची एकूण किंमत 75 कोटी आहे. म्हणजे भारताच्या हिशोबाने त्याची किंमत 38 कोटी आहे.

झरदारी यांचा मुलगा बिलावल भुट्टो कराची भागातील '4000 गज' एवढ्या जागेतल्या इतक्या घरात राहतो. त्या घराच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावर त्यांचीच गाडी असते. पण या घराची किंमत 30 लाख इतकी जाहीर करण्यात आली. पण आसपासच्या गल्लीत जितकी घरं आहे त्यांची किंमत 30-40 कोटींपेक्षा कमी नाही.

माझ्यासकट अनेकांनी सांगितलं आहे की, ते बिलावल यांचं 30 लाखाचं घर 60 लाख ते 1 कोटी रुपयांत घेण्यासाठी तयार आहेत. मात्र बिलावल ते विकायला तयार नाही.

नवाज शरीफ यांची परिस्थिती तर आणखी बिकट आहे. ते लाहोरला जातात तेव्हा आईकडे राहतात, मरी (पाकिस्तानातील एक गाव) येथे जातात तेव्हा बायकोच्या घरात राहतात आणि लंडनला जातात तेव्हा ते आपल्या मुलाच्या घरी अंथरूण पसरणं पसंत करतात.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा असिफ अली झरदारींबरोबर मुलगा बिलावल भुट्टो

ते कोणताही व्यवसाय करत नाही. त्यांची मुलं त्यांना खर्चासाठी पैसै देतात. त्यांचा मुलगा शाहबाज शरीफ आणि त्यांचा मुलगा हमजा यांची एकूण संपत्ती दीडशे कोटींची संपत्ती आहे.

हे सगळे नेते सगळ्यांत मोठ्या तीन राजकीय गटांचे सर्वोच्च नेते आहेत. प्रत्येक पाच वर्षांनंतर ते एक असा पाकिस्तान बनवू इच्छितात जिथला प्रत्येक नागरिक नियमित कर भरेल, आणि खरं बोलेल. ते सगळे आश्वासन देतात की, त्यांचा पक्ष सत्तेत आला तर ते असा कायदा करतील जेणेकरून श्रीमंत आणखी श्रीमंत होत जाणार नाहीत आणि गरीब आणखी गरीब होत जाणार नाहीत.

तसंच पाकिस्तानची अर्थव्यवस्था अशी व्हावी की ती अगदी आशियाई देशांमध्ये वाघासारखी डरकाळी फोडणारी असावी आणि राहता राहिली सामान्य जनता, ती तर काय जुनी स्वप्नं नवीन वेष्टनं लावून तयार असतेच.

आता जनते हे केलं नाही तर या मूर्खांना जनता तरी कसं म्हणणार? नाही का!

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)