इराण : एका डॉलरसाठी मोजावे लागत आहेत हजारो रियाल, व्यापारी उतरले रस्त्यावर

इराणचं चलन रियालच्या मूल्यात खूप घसरण झाली आहे

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

इराणचं चलन रियालच्या मूल्यात खूप घसरण झाली आहे

इराणची राजधानी तेहरानमधील ग्रँड बझारमधल्या व्यापाऱ्यांनी वाढत्या किंमती आणि इराणचं चलन असलेल्या रियालच्या ढासळणाऱ्या मूल्याविरोधात निदर्शनं केली. व्यापार पूर्ण बंद ठेवून हजारो व्यापाऱ्यांनी या मोर्चात भाग घेतला.

आंदोलक संसदेकडे जात असताना पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.

2012नंतर तेहरानमध्ये झालेलं हे सर्वांत मोठं आंदोलन आहे. 2012ला आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती, त्या विरोधारात नागरिकांनी मोठी निदर्शनं केली होती.

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीच्या कसरा नाजी म्हणतात, "या आंदोलनामुळे सरकारच्या भूमिकेत लगेच बदल झाला असून सरकारनं अण्विक धोरणावर जागतिक शक्तींशी चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे."

इराणवरील निर्बंध 2016मध्ये उठवण्यात आले होते. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मे महिन्यात या करारातून अमेरिका बाहेर पडणार असल्याची घोषणा केली.

फोटो स्रोत, ATTA KENARE/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन,

इराणची राजधानी तेहरान इथं झालेली व्यापाऱ्यांची निदर्शन.

अमेरिकेच्या या नव्या निर्बंधांचे परिणाम ऑगस्टपासून दिसण्यास सुरुवात होईल. शिवाय हा अण्विक करार कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इराणचं चलन रियालचं डॉलरच्या तुलनेतलं मूल्य घटलेलं आहे. अनधिकृत चलन बाजारात तर मोठीच किंमत मोजावी लागत आहे. एका डॉलरची किंमत 90 हजार रियाल इतकी खाली उतरली आहे.

ट्रंप यांनी अण्विक करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी 1 डॉलरची किंमत 65 हजार रियाल इतकी होती. तर 2017च्या अखेरीस हे मूल्य 42,890 रियाल इतकं होतं.

मोबाईल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तेहरानमधल्या 2 शॉपिंग सेंटरच्या व्यापाऱ्यांनीही संप केला.

माहिती आणि संवाद तंत्रज्ञान मंत्री मोहंमद जावेद अझारी जहरोमी म्हणाले, "व्यापाऱ्यांना निर्यातीसाठी चलन उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं."

इराणच्या सरकारनं रियालचं ढासळणारं मूल्या रोखण्यासाठी प्रयत्न केले. पण व्यापाऱ्यांचा असा दावा आहे की इराणच्या सरकारला रोख चलनाची मागणी पूर्ण करता आलेली नाही.

इराणमधल्या आर्थिक समस्यांमुळे गेल्या डिसेंबरमध्ये आणि जानेवारी महिन्यात सरकार विरोधात आंदोलनं झाली होती. पण ही आंदोलनं ईतर प्रांतातील शहरांत झाली होती.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)