अफगाणिस्तान, पाकिस्तानपेक्षा भारतात महिला असुरक्षित : सर्वेक्षण

महिलांची स्थिती Image copyright Getty Images

भारत महिलांसाठी सर्वांत असुरक्षित देश असल्याचं थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशननं केलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. भारतानंतर युद्धग्रस्त अफगाणिस्तान आणि सीरिया या देशांचा क्रमांक लागतो. त्यानंतर सोमालिया आणि सौदी अरेबियाचा यांना स्थान मिळालं आहे.

लैंगिक अत्याचार आणि महिलांना मोलकरणींसारखी वागणूक देण्यात भारत सर्वांत आघाडीवर आहे, असं यात दिसून आलं आहे.

महिलांच्या विषयांवर काम करणाऱ्या 550 महिला तज्ज्ञांच्या मदतीनं थॉमसन रॉयटर्स फाऊंडशेननं ही चाचणी घेतली आहे.

या चाचणीत असं दिसून आलं आहे की महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत भारत हा अफगाणिस्तान आणि सीरियाच्याही मागं आहे.

भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगानं हे दावे फेटाळले आहेत.

भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यावर म्हणाल्या, या सर्वेमध्ये फार कमी लोकांचा सहभाग होता. त्यामुळे भारताच्या स्थितीचं खरं आकलन यातून होऊ शकत नाही.

त्या पुढे म्हणाल्या, "भारतीय महिला जागृक आहेत. भारत महिलांसाठी जगातील सर्वांत असुरक्षित देश असूच शकत नाही. ज्या देशांत महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचाही हक्क नाही, त्या देशांना भारताच्या पुढं दाखवण्यात आलं आहे."

वृत्तसंस्था रॉयटर्सनं म्हटलं आहे की भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्रायलयानं या चाचणीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा अहवाल शेअर केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "आमचे पंतप्रधान योगाचा व्हीडिओ बनवण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे महिलांविरोधातल्या हिंसा आणि बलात्काराच्या घटनांत भारताची स्थिती अफगाणिस्तान, सीरिया आणि सौदी अरेबिया या देशांपेक्षाही बिघडली आहे. भारतासाठी ही लाजिरवाणी बाब आहे."

पाश्चात्य देशांमधल्या फक्त अमेरिकेचा या यादीतल्या पहिल्या 10 देशांमध्ये समावेश आहे. पाकिस्तान या यादीत 9व्या क्रमांकावर आहे.

2011मध्येही या फाऊंडेशननं ही चाचणी घेतील होती. त्यावेळी पहिल्या स्थानावर अफगाणिस्तान त्यानंतर काँगो, पाकिस्तान, भारत आणि सोमालिया या देशांचा क्रमांक होता.

तज्ज्ञांच मत असं आहे की भारतात महिलांची स्थिती खराब होण्यामागे असलेलं महत्त्वाचं कारण म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते प्रयत्न होत नाहीत.

निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर असं वातावरण निर्माण झालं होत की भारतात महिला सुरक्षेच्या मुद्द्याला प्राथमिकता मिळेल. पण या चाचणीतून अगदी उलट चित्र पुढे आलं आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.

सरकारी आकडेवारी पाहिली तरी 2007 ते 2016 या कालावधीत महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये 83 टक्के वाढ झाली आहे. भारतात प्रत्येक चार तासानंतर एका महिलेवर बलात्कार होतो.

महिलांच्या तस्करीमध्ये भारतचा क्रमांक लिबिया आणि म्यानमारच्याही वर आहे.

गेली काही वर्षं युद्धसदृश परिस्थिती असलेले सोमालिया, अफगाणिस्तान आणि सीरिया हे देश महिलांसाठी आरोग्याच्या खराब व्यवस्था आणि युद्धाशी संबंधित हिंसा यात पुढे आहेत.

Image copyright Getty Images

तज्ज्ञांच्या मते सौदी अरेबियात महिलांच्या स्थितीत गेल्या काही दिवसांत सुधारणा दिसत आहे, पण हे पुरेसं नाही.

तर #MeToo मोहिमेमुळे अमेरिका पहिल्या 10मध्ये आला आहे.

या चाचणीत सहभागी झालेल्यांमध्ये आरोग्य कर्मचारी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, एनजीओ, धोरणकर्ते आणि सामाजिक विषयांतील जाणकार यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)